वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांविरूद्ध आजीवन कारावासाची शिक्षा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
गुन्हे करणारा आणि गुन्हे करवुन घेणाऱ्याविरूद्ध कठोर कारवाई करणारे कायदे अस्तित्वात आहेत. परंतु कायदयांच्या परिणामकारक अंमलबजावणी अभावी गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. यामुळेच संपूर्ण देशातील न्यायालयात कोट्यवधीचे कोर्ट केसेस आजही प्रलंबित आहेत. दरम्यान पोलीसांनी कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी केली तर गुन्हे करणारा आणि गुन्हे करवुन घेणाऱ्यांची गुन्हे करण्याची हिंमत होणार नाही. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सामाजिक सुरक्षा विभागाने महिला व मुलींच्या देहव्यापाराविरूद्ध मागील सप्ताहात जबरी कारवाया केल्यामुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
महिला व मुलींच्या देहव्यापाराविरूद्ध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध अधिनियम अतिशय सक्षम असा कायदा आहे. त्याच बरोबर फौजदारी कायदे व भादविमधील परस्पर पुरक कायदे असतांना देखील मागील 30/35 वर्षाच्या कालावधीत महिला व मुलींचा देहव्यापार करणाऱ्यांविरूद्ध केवळ अनैतिक मानवी वाहतुक यातील कलम 3, 4 व 5 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्याला तत्काळ जामीन असल्यामुळे संपूर्ण पुण्यासह राज्यात महिला व मुलींचा देहव्यापार वाढला आहे. पुण्यामुंबई सारख्या मोठ्या शहरात मसाज सेंटर, स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू आहेत. सेक्स टूरिझम या व्यवसायाने देखील कोट्यवधी रुपयांचे आकडे पार केले आहेत. एखादया राज्याचे बजेट असावे एवढी या देहव्यापाराची उलाढाल आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाचे पुढचे पाऊल –
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सामाजिक सुरक्षा विभागाने पुणे शहरातील मसाज पार्लर, स्पा सेंटर मध्ये महिला व मुलींचा अपव्यापार अर्थात वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांविरूद्ध आजपर्यंत मागील 30/35 वर्षात केवळ कलम 3,4 व 5 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. परंतु मागील सप्ताहात सामाजिक सुरक्षा विभागाने पुढचे पाऊल उचलले आहे. महिला व मुलींचा अपव्यापार अर्थात वेश्याव्यवसाय करणाऱ्यांविरूद्ध अनैतिक मानवी वाहतुक कलम 3, 4 व 5 सह भादवी कलम 370 व 34 नुसार गुन्हे दाखल करून वेश्याव्यवसाय करणाऱ्यांविरूद्ध कायदयाचा बडगा उगारला आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाने कुठे केल्या कारवाया –
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सामाजिक सुरक्षा विभागाने मागील 30/35 वर्षात महिला व मुलींचा अपव्यापार अर्थात वेश्याव्यवसाय करणाऱ्यांविरूद्ध किंवा मटका जुगार अड्डे चालविणाऱ्यांविरूद्ध कमी शिक्षेचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आज संपूर्ण पुणे शहरात मसाज सेंटर व स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट निर्माण झाले आहे. तसेच मटका जुगार अड्डयांचे गल्लीबोळात पेव फुटले आहे. दहा बारा वर्षापूर्वी बंद पडलेले बोल्डर,लालकाळा आता नव्याने सुरू झाले आहेत. मटका, सोरट, ऑनलाईन लॉटरी तर सगळीकडे सुळसुळाट झाला आहे. जुगार अड्डयांवर देखील केवळ जुगार बंदी कायदातील 12 (अ) नुसार लुटूपुटूची कारवाई केली जात आहे. जुगार बंदी कायदा सक्षम असतांना देखील केवळ 12 (अ) चा वापर करून गुन्हेगारांना मोकळीक दिली जात आहे. दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाचे तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी जुगार खेळणारे व खेळविणाऱ्यांविरूद्ध जुगार बंदी कायदयातील सक्षम कलमासह इन्फॉरमेशन कायदयान्वये कारवाया केल्या होत्या.
दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाने महिला व मुलींचा देहव्यापार अर्थात वेश्याव्यवसाया विरूद्ध कठोर कारवाई केल्याचे दिसून येत आहे.
1) विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत स्पा सेंटरवर छापा, 6 पिडीत महिलांची सुटका-
विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील अमायरा स्पा. शॉप नं. डी-60 सॉलीटर बिझनेस हब विमाननगर, पुणे येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असले बाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने, सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमेलदार यांनी बनावट गिऱ्हाईक पाठवुन खात्री केली असता, नमुद मसाज सेंटर मध्ये स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ छापा कारवाई करून या ठिकाणावरून एकुण 06 पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.
मोबाईल व रोख रक्कमेसह एकुण 1 लाख 28 हजार 500 रूपये किंमतीचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यावेळी स्पा मॅनेजर यांना ताब्यात घेवुन व पाहिजे आरोपी स्पा चालक असे एकुण 04 इसमांविरूध्द विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुरनं. 212/2023.भादवि 370.34, सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम 3.4.5 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता विमानतळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
2) सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीतील आयुर्वेदिक उपचार केंद्रवर छापा,2 पिडीत महिलांची सुटका-
सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीतील ऑफिस नं. 1, तिसरा मजला, अभिमन्यु पुरम, माणिकबाग सिंहगढ रोड, पुणे येथे आयुर्वेदिक उपचार सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असलेबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी बनावट गिऱ्हाईक पाठवुन खात्री केली असता, नमुद आयुर्वेदिक उपचार केंद्रा मध्ये आयुर्वेदिक उपचाराचे नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ छापा कारवाई करून, या ठिकाणावरून एकुण 02 पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.
मोबाईल व रोख रक्कमेसह एकुण 1 लाख 52 हजार रुपयांचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यावेळी मालक व चालक यांना ताब्यात घेवुन त्यांच्याविरूध्द सिंहगड पोलीस स्टेशन येथे गुरनं 192/2023 भादवि 370,34 सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम 3,4,5 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता सिंहगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
3)पश्चिम बंगाल येथील दाखल गुन्हयातील लग्नाचे आमिष दाखवुन पुण्यात आणलेल्या अपहृत अल्पवयीन बालिकेचा तात्काळ शोध –
दि.25/04/2023 रोजी वरीष्ठांच्या आदेशाने बोसिरहाट पोलीस स्टेशन (पश्चिम बंगाल) गुरनं 227/2023 भादवि 363.365 मधील पश्चिम बंगाल येथील अपहृत बालिकेचा सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अनिकेत पोटे, पो.हवा, भिवरकर, पो. अमंलदार कोळगे, कुमार, जमदाडे यांनी तांत्रिक विश्लेषनाचे आधारे या बालिकेचा सोपानबाग ढोबरवाडी रेल्वे पटरीच्या शेजारी शोध घेवुन, अपहृत बालीका मिळुन आल्याने तिला बाल कल्याण समिती पुणे याचे आदेशाने बोसिरहाट पोलीस स्टेशन (पश्चिम बंगाल) चे पो.उप निरीक्षक प्रतिबिंदु दास व त्याचा स्टाफ यांचे ताब्यात पुढील तपास कामी देण्यात आले आहे.
ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोट, अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, रेश्मा कंक संदिप कोळगे, अमित जमदाडे, ओंकार कुंभार, अजय राणे, बाबा कर्पे, इम्रान नदाफ, इरफान पठाण या पथकाने यशस्वी केली आहे.
काय आहे कलम 370 ः
भारतीय संविधानातील कलम 370 हे जम्मु आणि काश्मिर या राज्यांकरीता होते. हे कलम आता रद्द झाले आहे. परंतु भादवि मधील कलम 370 काय आहे…
भादवी मधील 370 कलमानुसार जो कोणी पिळवणूक करण्यासाठी 1. धमक्यांचा वापर 2. बळाचा किंवा जबरदस्तीचा वापर 3. अपहृत करणे 4. लबाडी करणे, फसवणूक करणे 5. अधिकाराचा गैरवापर 6. भरती केलेल्या, वाजुक केलेल्या, आसरा दिलेल्या, स्थानांतर केलेल्या किंवा स्वीकार केलेल्या व्यक्तीवर नियंत्रण असणाऱ्या व्यक्तीची संमती मिळविण्यासाठी प्रलोभन दाखवुन तसेच लाभ देऊन घेवून किंवा एखादया किंवा अनेक व्यक्तींची भरती करेल, वाहतुक करेल, आसरा देईल, स्थानांतर करीत किंवा स्वीकार करील तर त्याच्याविरूद्ध अपव्यापाराचा अपराध केला असे मानले जाईल अशी नवीन सुधारणा फौजदारी कायदयात 2013 रोजी अधिनियम क्र 13 नुसार करण्यात आलेली आहे. यानुसार जर कुणीही पिळवणूक या संज्ञेमध्ये शारिरीक पिळवणूकीची कोणतीही कृती, लैंगिक पिळवणूकीचा, गुलामगिरीचा किंवा गुलामसदृष्य प्रथेचा, दास्याचा कोणताही प्रकार किंवा जबरदस्तीने अवयव काढुन घेईल त्याच्ा विरूद्ध 1. अपव्यापाराचा अपराध करील त्याला 7 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु 10 वर्षांपर्यंत असू शकेल एवढी कारावास व दंडासही पात्र ठरेल.
- अपराधात एकापेक्षा अधिक व्यक्तीचा अपव्यापार करणारांविरूद्ध 10 वर्षापेक्षा कमी नाही परंतु आजीवन (मरेपर्यंत) कारावासाची सश्रम दंडासह शिक्षा
- अपराधामध्ये अज्ञान व्यक्तीचा अपव्यापार केल्यास, 10 वर्षापेक्षा कमी नाही परंतु आजीवन मरेपर्यंत सश्रम कारावास.
- अपराधामध्ये एकापेक्षा अधिक अज्ञान व्यक्तींचा अपव्यापार केल्यास याला 14 वर्षापेक्षा कमी नाही परंतु आजीवन मरेपर्यंत कारावासाची सश्रम दंडासह शिक्षा.
- जर अपव्यापारात अधिकवेळा सिद्धदोष ठरवले असेल तर त्याला आजीवन याचा अर्थ संबधित व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित कालावधीसाठी कारावासाची दंडासह शिक्षा.
- याच गुन्हयात जर एखादा सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीसांचा अपव्यापारात सहभाग असेल तर असा लोकसेवक, पोलीस अधिकारी याला आजीवन कारावासाची शिक्षा होईल याचा अर्थ त्या व्यक्तीच्या नैसर्गिक आयुष्याच्या उर्वरित कालावधीसाठी कारावासाची दंडासह शिक्षा अशी या कलम 370 ची तरतुद आहे. तसेच कलम 370 अ मध्ये देखील ह्या तरतुदी आहेत. महिला व मुलींचा अपव्यार अर्थात मसाज पार्लर, स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्यांविरूद्ध अशा प्रकारचा कठोर कायदा अस्तित्वात आहे. परंतु पुणे शहर पोलीसांनी आजपर्यंत ह्या कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी केली नाही हे वास्तव आहे. आज 2023 मध्ये प्रथमच कलम 370 कलमाचा वापर करून वेश्याव्यवसाय करणाऱ्यांविरूद्ध कायदयाचा बडगा उगारला आहे. आता ह्याच कारवाया सतत सुरू ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा कलम 3, 4 व 5 नुसार कारवाया करून आरोपींना मोकाट सोडण्याची प्रथा बंद व्हावी अशी सामाजिक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
दरम्यान याच सप्ताहात अलंकार पोलीस स्टेशन हद्दीत मटका जुगार अड्डयावर कारवाई करण्यात आली. तेथे देखील महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदयातील कलम 12 (अ) नुसार करावाई करण्यात आली आहे. वास्तविक पाहता, सदरील मटका जुगार अड्डा पूर्णतः बंदिस्त जागेवर वर्षानुवर्षे चालणारा धंदा आहे. त्यावर जबरी कलमे अपेक्षित आहेत. तसेच ऑनलाईन लॉटरी चालविणाऱ्यांविरूद्ध इन्फॉर्मेशन टेक्नो. अंतर्गत गुन्हे दाखल होऊ शकतात हे राजेश पुराणिक यांनी दाखवुन दिले आहे. त्यामुळे अशा प्रकारची लुटूपुटची कारवाई न करता कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी पुणे शहरात होणे आवश्यक आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने मानवी अपव्यापार कायदयासह भादवी तील कायदयाचा परिणामकारक वापर केवळ काही व्यक्तीविरूद्ध न करता सरसकट सर्वच देहव्यापार करणाऱ्यांविरूद्ध करणे अपेक्षित आहे.