Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यात मोक्काने शंभरी गाठली, एमपीडीएने देखील अर्धशतक पार केले तरीही पुण्यात गुन्हेगारी सुसाट,थ्री-नाईन-फाईव्ह (395)च्या विशेष ट्रेनमुळे खास पोलीस सुखावुन गेले

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
आज बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे 16 डिसेंबर 2022 रोजी पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार तत्कालिन मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून स्वीकारला. अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळापासूनच पुणे शहरात मकोका आणि एमपीडीए कायदयाखालील दाखल गुन्ह्यांचे काऊंटींग सुरू झाले. श्री. गुप्ता यांच्या दोन वर्षाच्या काळात त्यांनी मोक्का व एमपीडीएचे प्रत्येकी शतक काढले होते. मात्र एक वर्षापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेले श्री. रितेश कुमार यांनी एका वर्षाच्या आत मोक्काची शंभरी गाठली आहे तर एमपीडीए चे तर अर्धशतक पूर्ण करून आता शंभरीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध एवढ्या जबरी कारवाया सुरू असतांना देखील पुण्यात गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता भादवीच्या 395 चे चक्रीवादळाचे तांडव वेगवान सुरू आहे. मुंबईहुन मोठ मोठ्या टोळ्या थ्री नाईन फाईव्ह ट्रेनने पुण्यात सक्रीय झाल्या असल्या तरी पुण्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुण्यातीलच गुन्हेगारांवर अधिक लक्ष केंद्रीत झाले आहे.

पुणे शहर पोलीसांनी जाहीर केल्या प्रमाणे, पुणे शहर पोलीस पदाचा पदभार श्री. रितेश कुमार यांनी स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरूद्ध व मालमत्तेविरूद्ध गुन्हे करणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळेच पदभार स्वीकारल्याच्या एक वर्षाच्या आतच मोक्काचे 100 तर एमपीडीए ची अर्धशतकाहून अधिक हनुमान उडी मारली असल्याचे दिसून येत आहे. 

एवढ्या कारवाया झाल्या तरी गुन्हेगारांमध्ये पोलीस व कायदयाबद्दल भिती का वाटत नाही-
पुण्यात देशातील प्रचलित सर्व कायदे अस्तित्वात आहेत. भादवी ते संहितेखाली गुन्हे दाखल करून न्यायालयात हजर करणे आणि पुढे येरवडा विद्यापीठात प्रवेश…. हा इथपर्यंत प्रवास होता. आता मात्र त्याच्याही पुढे 1999 साली अस्तित्वात आलेला मोक्का आणि 1980 सालातील एमपीडीए खाली कारवाया करण्यात येत आहेत. भादवी किंवा संहिते खाली गुन्ह्याची शिक्षा व द्रव्य दंडापेक्षा मोक्का खालील शिक्षा ही आजिवन ते कमीत कमी 10 वर्षापर्यंतची असून सुमारे 5 लाखापासून ते 10 लाख रुपयांपर्यंत द्रव्य दंडाची तरतुद असतांना देखील पुण्यातील गुन्हेगारांवर त्याचा काही परिणाम झाला असल्याचे दिसून येत नाही.
मागील सलग दोन वर्षात 200 पेक्षा अधिक मोक्का कायदयाखाली कारवाया केल्या असतांना देखील गुन्हे कमी होत नाहीयेत. गुन्हे अधिक वाढत आहेत. त्यामुळे कायदयाचा धाक कमी झाला आहे की अंमलबजावणी करण्यात काही कमतरता राहिली आहे याचे मुल्यमापन होतांना दिसत नाहीये असा अंदाज व्यक्त होतोय. भादवी-संहितेखालील अपराधांची मालिका वाढत चालली आहे. त्यामुळे नुसती आकडेवारी वाढत असली तरी प्रत्यक्षात त्याचे परिमाण व परिणाम दिसून येत नसल्याचे दिसून येत आहे. त्याच्याही पुढे जावुन विचार करता, याच कायदयाखालील अनेक इसम जामीनावर बाहेर आहेत हे विशेष.

थ्री-नाईन-फाईव्ह ची बुलेट ट्रेन –
सध्या पुणे शहरात मोक्का आणि एमपीडीए चे चक्रीवादळ वेगवान असले तरी थ्री-नाईन-फाईव्ह ची बुलेट ट्रेन देखील तितकीच सुसाट चालली असल्याचे दिसून येत आहे. यात 35 पोलीस स्टेशन हद्दीत ही ट्रेन वेगवान सुरु आहे. त्यातील काही विशेष ट्रेन ह्या येरवडा पोलीस स्टेशन, बंडगार्डन पोलीस स्टेशन, विमानतळ पोलीस स्टेशन, स्वारगेट पोलीस स्टेशन, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन तसेच काही मध्यम पल्ल्याच्या ट्रेन ह्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन सिंहगड पोलीस स्टेशन, बिबवेवाडी पोलीस स्टेशन, सहकारनगर पोलीस स्टेशन, सिंहगडरोड पोलीस स्टेशन, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीतून जात आहेत.
त्यापैकी काही विशेष थांबे असून लोणी काळभोर पोलीस स्टेशन, लोणीकंद पोलीस स्टेशन, कोंढवा पोलीस स्टेशन, मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत आहेत. त्यामुळे या थ्री-नाईन-फाईव्ह ट्रेनचा सगळेच आनंद घेत आहेत. पोलीस आणि सराईत गुन्हेगारांच्या सहमतीने ह्या थ्री-नाईन-फाईव्ह च्या ट्रेन चालविल्या जात आहेत. त्यामुळे यावर नियंत्रण आणणे सध्यातरी कुणालाही शक्य नाही. कुण्या ऐकेकाळी तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. पाठक यांच्या कार्यकाळात एवढ्या ट्रेन चालविल्या जात होत्या. परंतु प्रचंड ओरड झाल्यानंतर, नंतरच्या काळात ह्या ट्रेन त्या त्या काळात बंद करण्यात आल्या आहेत. आता मात्र ह्या थ्री-नाईन-फाईव्ह च्या ट्रेन वेगवाने सुरू आहेत. पुढील काळात त्या त्या पोलीस स्टेशन हद्दीतील थ्री-नाईन-फाईव्ह ट्रेन बाबत खुलासेवार आणि रंजक बाबी पुणेकरांसमोर मांडत आहोत.

थ्री-नाईन-फाईव्ह बुलटे ट्रेनच्या काही वेळा –
येरवडा पोलीस स्टेशन- दुपारी 4.00 ते मध्यरात्रौ 12.30, बंडगार्डन पोलीस स्टेशन = मध्यरात्रौ 2.30 ते सकाळी 9.00 वाजेपर्यंत, विमानतळ पोलीस स्टेशन = दुपारी 2.00 ते मध्यरात्रौ 1.00, स्वारगेट पोलीस स्टेशन पहाटे 4.00 ते सकाळी 8.00, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन – पहाटे 4.00 ते सकाळी 7.00 वाजेपावेतो इतरही थ्री-नाईन-फाईव्ह च्या ट्रेन वेगवान असून पुढील काळात त्यांच्याही कामकाजाच्या वेळा आणि कतृत्व पुणेकरांसमोर येणे आवश्यक ठरत आहे.