- गुन्हेगारांचा सर्वाधिक वावर हॉटेल, लॉज, ढाबे, रेल्वे स्टेशन, एस.टी व बस स्थानकांवर…
- ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेच्या पथकांनी 110 हॉटेल, लॉज तर पोलीस स्टेशनच्या पथकाने 427 हॉटेल, लॉज तपासुन सुमारे 3 हजार 765 गुन्हेगारांपैकी 698 गुन्हेगारांची धरपकड
पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या स्तरावरून सोमवार व मंगळवार या दोन दिवशी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले असून, यामध्ये सर्व गुन्हे शाखा व सर्व पोलीस स्टेशनने सहभाग नोंदविला आहे. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेच्या पथकांनी 110 हॉटेल, लॉज तर पोलीस स्टेशनच्या पथकाने 427 हॉटेल, लॉज तपासुन सुमारे 3 हजार 765 गुन्हेगारांपैकी 698 गुन्हेगार मिळून आले आहेत.तसेच सराईत गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलीस उपआयुक्त विशेष शाखा यांनी दि. 23 जानेवारी 2023 रोजीपर्यंत पुणे शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेला आहे.
पुण्यामध्ये होत असलेली जी 20 परिषद तसेच 33 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा या निमित्ताने संपूर्ण पुणे शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले आहे. गुन्हेगारांचा वावर असलेली ठिकाणे तसेच हॉटेल, लॉजेस, रेल्वे स्टेशन, एस.टी बस टर्मिनल, सार्वजनिक बसस्टँड, रिक्षा स्टँड तपासण्यात आले आहेत. या सर्व तपासणी व कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 55 हजार 300 रुपयांचे 145 कोयते, 1 हजार 350 रुपयांच्या 3 तलवारी, 40 हजार रुपयांचे गावठी पिस्टल, 400 रुपयांचे एक काडतुस जप्त केले. गुन्हे शाखेने 9 आणि पोलीस स्टेशनने 34 असे एकूण 43 केसेस दाखल केले आहेत. तसेच 90 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हे शाखेने तीन व पोलीस स्टेशनने 12 असे एकूण 15 तडीपार गुन्हेगारांवर कारवाई केली. नाकाबंदी कारवाईमध्ये 1531 संशयित वाहन चालकांची तपासणी करुन 77 जणांवर कारवाई करुन 40 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर वाहतूक शाखेने 1095 संशयित वाहन चालकांची तपासणी करुन त्यांच्याकडून सुमारे 98 हजार 980 रुपयांची दंडात्मक कारवाई केली.
कधी कधी होणाऱ्या ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशनने निर्माण केलेले काही प्रश्न-
1) पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखांचे पेट्रोलिंग कमी पडत असल्यामुळेच गुन्हेगारांचा सार्वजनिक वावर वाढला आहे काय…
2) गुन्हेगारांमध्ये कायदयाची -पोलीसांची भीती आणि धाक कमी झाला आहे काय
3) पोलीस पेट्रोलिंग अभावी, अल्पवयीन मुले देखील भाई बनण्यासाठी हातात कोयते घेवून दहशत निर्माण करीत आहेत काय…
4) प्रत्येक वेळी कोंम्बिग ऑपरेशन का राबवावे लागते.
5) प्रत्येक कोंम्बिग ऑपरेशनमध्ये तडीपार, फरार व पाहिजे आरोपी आढळुन येतात याचा निश्चित अर्थ काय समजुन घ्यायचा…
6) पोलीस स्टेशन स्तरावर दर किती दिवसांनी कोम्बिंग ऑपरेशन व पेट्रोलिंग केले जाते, त्यात तडीपार व फरार आरोपींची माहिती दैनंदिन व साप्ताहिकस्तरावर पोलीस आयुक्तालयास कळविली जाते काय…
23 जानेवारी पर्यंत पुणे शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी…
पुण्यामध्ये होत असलेली जी 20 परिषद तसेच 33 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा या निमित्ताने संपूर्ण पुणे शहरात दि. 10 जानेवारी ते 23 जानेवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त विशेष शाखा यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
या कालावधीत सर्वच राजकीय पक्ष व संघटना यांना पाच किंवा पाच पेक्षा अधिक जमाव करण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन पुणे शहर पोलीस आयुक्त वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.