Thursday, September 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेतील सामान्य प्रशासनचे कार्यालय की कोंडवाडा,

*अ वर्ग पुणे महापालिकेतील प्रशासकीय कार्यालयाची अवस्था, मुंबईतील बीडीडी चाळ आणि पुण्यातील जनता वसाहतीसारखी…
*एसटी आणि रिक्षात प्रवाशी कोंबुन भरावे तसे, प्रशासकीय सेवक व फाईलचे गठ्ठे ठेवले आहेत, पावसाळ्यात तर कागदांच्या कुबट वासाने थांबुही वाटत नाही… मग सेवक कसे काम करीत असतील…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यात हडपसर ते स्वारगेट, कात्रज ते स्वारगेट, मार्केट ते मंडई, मंडई ते स्वारगेट या प्रवासा दरम्यान शेअर ऑटो रिक्षामध्ये जसे प्रवाशी कोंबुन भरले जातात किंवा पुणे शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना जसे रिक्षावाले काका कोंबुन-कोंबुन भरतात तशी अवस्था सध्या पुणे महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाली आहे. मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळ आणि पुण्यातील जनता वसाहतीमधील घरे जशी एकमेकांना चिकटून आहेत, आणि त्यातुन जसा कुबट वास दुरपर्यंत पसरलेला असतो तशी अवस्था सामान्य प्रशासन विभागाची झाली आहे. तशाही अवस्थेत अधिकारी आणि कर्मचारी काम करीत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.

काय विषय आहे… कसली ही बोंबाबोंब-
विषय तसा गंभीरच आहे. सांगताही येत नाही आणि बोंबही मारता येत नाही. बोंब मारली तरी एैकायला आहे तरी कोण.. म्हणून मान खाली घालून काम करायचे, एवढेच हातात आहे एवढच वर्णन करावे लागेल, त्याच झालं अस्सं की, दीड दोन महिन्यांच्या आजारानंतर कालच शुक्रवारी पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात जुन्या माहितीसाठी आलो असता वरील सर्व बाबी प्रकर्षाने दिसून आलेल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर सामान्य प्रशासन/ आस्थापना विभागाचे कार्यालय आहे. पुणे महापालिकेतील 18 ते 20 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पदोन्नती, बदल्या, सेवातपशील, रजा, निलंबन, बडतर्फी, विभागीय चौकशी या सारख्या महत्वाच्या विषयांचे दस्तऐवजांची हाताळणी केली जाते. एकन्‌‍एक कर्मचाऱ्यांची सर्व माहिती या कार्यालयात ठेवली व जतन केली जाते. अशा अतिमहत्वाच्या व अतिसंवेदनशील कार्यालयाची अवस्था अतिशय आेंगाळवाणी झाली आहे.

पाऊन कोटी पुणेकरांचा गाडा हाकणाऱ्यांची अशी ही अवस्था –
दोन अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयापासून पुढे गेल्यानंतर, सामान्य प्रशासन विभाग सुरू होतो. उपआयुक्त सामान्य प्रशासन कार्यालयापासून ते शेवटपर्यंत असलेल्या कार्यालयांची अवस्था बिकट आहे. संपूर्ण कार्यालयात जवळ-जवळ दाटीवाटीने बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यातच मोठ मोठ्या फाईलेच गठ्ठे, टेबलवर कॉम्प्युटर, प्रिंटर, आणि फाईल्सचे गठ्ठे, खाली / जमीनीवर गठ्ठे, टेबलवर कागदाचे गठ्ठे, जाईन तिथे फाईल्सचे गठ्ठे…. एसटी महामंडळाच्या लालपरीत आल्यासारखा भास व्हावा अशी इथली अवस्था दिसून येत आहे.
सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे कागदांना कुबट वास येणे स्वाभाविक आहे. इथे तर कागदांचे गठ्ठेच गठ्ठे असल्याने हा कुबट वास तर बाहेर पर्यंत अगदी जिन्यातही येत आहे. सगळीकडे धुळीचे साम्राज्य… त्यातच थोडावेळ जरी या कार्यालयात थांबले तरी अंगाला खाज येते. अशा अवस्थेत एका/एका कार्यालयात सुमारे 25 पेक्षा अधिक कर्मचारी कसे काम करीत असतील हे त्यांचे त्यांनाच माहिती, त्यातच हजारो फाईल्सचे गठ्ठे हाताळणे म्हणजे एक प्रकारचे दिव्यच म्हणावे लागेल. नवीन सेवकाची इथे नियुक्ती केल्यास, कुठे काय ठेवले आहे, याचा सहा महिने तरी थांगपत्ता लागणार नाही. सेवकांवर कारवाईचा बडगा उगारणे सोप्पे आहे, परंतु ते काय सहन करीत आहेत याचाही विचार आयुक्त, अति. आयुक्तांनी करणे आवश्यक ठरत आहे.

25 वर्षात एकदा तरी आयुक्त/अति. आयुक्त आस्थापनेच्या कार्यालयात आले आहेत काय –
पुणे महापालिकेच्या मागील 25 वर्षांच्या इतिहासात एकदा तरी आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त एवढेच नव्हे तर सामान्य प्रशासन/ आस्थापनेचे उपआयुक्तांनी त्यांच्या कार्यालयातील सेवकांच्या भेटी घेतल्या आहेत काय, ते कसे काम करतात हे एकदा तरी पाहिले आहे काय असाही प्रश्न साहजिकच निर्माण होत आहे. त्यामुळे सध्या नुतन आयुक्त व प्रशासक श्री. राजेंद्र भोसले व इतर तीन अतिरिक्त आयुक्तांनी त्यांच्याच दुसऱ्या मजल्यावरील प्रशासकीय सेवा संवर्गातील कर्मचारी कसे काम करतात, त्यांच्या कार्यालयाची काय अवस्था आहे हे पाहण्यासाठी यावे असे अगत्याचे निमंत्रण पुणेकर नागरीक म्हणून आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना देत आहोत.