पुण्याच्या नाना पेठेत राहणारा अमन युसूफ पठाण उर्फ खान याची अमरावती कारागृहात रवानगी
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
समर्थ व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रास्त्रे बाळगणे, दुखापत, दंगा या सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगारावर पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी एमपीडीए कायदयानुसार कारवाई करण्यात आली आहे. अमन युसुफ पठाण उर्फ खान, वय-22 राहणार- अशोक चौक, नाना पेठ, पुणे असे त्याचे नाव आहे. पोलीस आयुक्तांची ही 85 वी कारवाई आहे.
आरोपी अमन युसुफ पठाण उर्फ खान याच्यावर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी अमन पठाण याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
नाना पेठेच्या अशोक चौकात राहणारा अमन युसुफ पठाण उर्फ खान याने त्याच्या साथीदारांसह कोंढवा, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी कोयता, तलवार पिस्टल या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दुखापत, दंगा यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील दोन वर्षात त्याच्यावर तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 85 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. आगामी काळात देखील सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सागितले.