Tuesday, December 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मार्केटयार्ड-बिबवेवाडी पोलीस हद्दीत जुगार अड्डयांची चलती हाय…
खाजगी सावकारांची मस्ती जोर्रात हाय…

पुणे/दि/ नॅशनल फोरम प्रतिनिधी/
मराठीतील अजरामर सामना या चित्रपटातील निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागु यांची भूमिका आजही वास्तवात असल्याचा भास जाणवत असतो. निळु फुले यांची बेरकी भूमिका सर्वांना ज्ञात असेल. बाई वाड्यावर या पासून ते भिंगरी- सामना पर्यंत च्या भूमिका सर्वांना ज्ञात असतील. अगदी तशीच अवस्था मार्केटयार्ड आणि बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील जुगार अड्डे आणि ऑनलाईन लॉटरच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्डयांच्या मालकांची झालेली दिसत आहे. तर डॉ. श्रीराम लागुंची भूमिका म्हणजे सामाजिक सुरक्षा सुरक्षा विभागाचे तत्कालिन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांची आहे. सहा महिन्याच्या कालावधीत संपूर्ण पुणे शहरातील अवैध जुगार, मटका अड्डे, ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली सुरू असलेली शासनाची फसवणूक, देशी विदेशी दारूची तस्करी, तीन पत्ते, बावन्न पत्यांचे जुगार अड्डे पूर्णतः बंद केले होते. परंतु निळु फुलें सारखी बेरकी भूमिका वठविणाऱ्या जुगार अड्ड्े मालकांनी पोलीसातील बेरकी अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांचा काटा काढण्यात आला. राजेश पुराणिक यांच्या बदलीनंतर, संपूर्ण शहरात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. आणि कॅलेंडरमधील एक तारखेची वाट न पाहता, ताबडतोब बेकायदा व अवैध धंदे सुरू झाले.


मार्केटयार्ड आणि बिबवेवाडी या दोन पोलीस स्टेशन हद्दीत 50 च्या आसपास जुगार अड्डे, मटका अड्डे, ऑनलाईन लॉटरीसह पत्यांचे क्लब सुरू झाले आहेत. त्यात भर म्हणून खाजगी सावकारी देखील भरभरून वाहत आहे. वसुलीसाठी पोरासोरांच्या हातात कोयते, सत्तुर आणि बंदुका दिल्या असल्याने, खाजगी सावकारांच्या वसुलीचा तर थयथयाट सुरू आहे. एवढ्यावरच ही यंत्रणा थांबली नाही, तर रेशननिंगचा गहु, तांदूळ बिबवेवाडी, कोंढवा व स्वारगेट पोलीस स्टेशन मार्गे मार्केटयार्डात येत आहे हे माहिती असतांना देखील त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे.


पुराणिकांची बदली आणि अच्छु के अच्छे दिन –
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागात मागील सहा महिन्यांपासून कार्यरत असलेले श्री. राजेश पुराणिक यांच्या कारवाईच्या भितीने मार्केटयार्डातील सर्व अवैध धंदे बंद झाले होते. त्यातच मार्केटयार्डात दोन वेळा कारवाई व बिबवेवाडी मध्ये तीन वेळा सामाजिक सुरक्षा विभागाने धाडसी कारवाई केल्यामुळे सर्वच प्रकारचे अवैध धंदे बंद झाले होते. तथापी श्री. पुराणिक यांच्या बदलीनंतर मात्र अच्छुसहित अनेक अवैध धंदेवाल्यांचे अच्छे दिन आले आहेत. यामागे दुसरे तिसरे कुणी नसुन सन्माननिय पोलीस आयुक्तांचीच ही मेहेरबानी आहे असेच म्हणावे लागणार आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत धाडसीपणे कारवाई करणाऱ्या श्री. राजेश पुराणिक यांची बदली करून, पोलीस आयुक्तांनी सर्वच पोलीस स्टेशनला धडा दिला आहे, तो धडा म्हणजे, अवैध धंदयावर कारवाई करूच नका, जर कारवाई करायची असेल तर कागदोपत्री दिसेल एवढीच कारवाई करा- हाच संदेश श्री गुप्ता यांनी, पुराणिक यांच्या अपमानजक बदलीच्या निमित्ताने पुणे शहर पोलीसांना दिला आहे. त्यातून यापेक्षा वेगळा अर्थ घ्यायचा तरी कसा….. आता सध्या सामाजिक सुरक्षा विभागाची लुटूपुटूची कारवाई दिसत आहे. क्राईम युनिटसह खंडणी विरोधी पथक, अंमली पदार्थ विरोधी पथकांच्याही कारवाया सुरू आहेत. परंतु अगदी नावालाच कारवाया आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
दरम्यान पुराणिक यांनी कायदयातील तरतुदीनुसारच, तसेच पोलीस मॅन्यूअल भाग क्र. 3 व सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्या नुसारच- अपराध करणारे व अपराधासाठी चिथावणी देणारे, त्यात सहभाग घेणारे देखील जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यकच असल्याचे श्री. राजेश पुराणिक यांनी दाखवुन दिले आहे. थोडक्यात कायदयाव्दारे स्थापित कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी करणारा अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. त्यालाच पुराणिक पॅटर्न हे नाव दिले आहे.
सध्या दोन्ही पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व बेकायदेशिर धंदयांची चलती आहे, खाजगी सावकार आणि खाजगी सावकारांची वसुली करणारे एजंट ठाई ठाई हातात शस्त्रे घेवून फिरत आहेत. पोलीसांची कारवाई देखील शून्य /शून्य पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे मार्केटयार्ड व बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील जुगार अड्ड्यांवर कारवाई होणार किंवा नाही हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असला तरी ज्यांच्या अवैध धंदयाच्या पाठीशी पोलीस आयुक्त, उपायुक्त असतील त्यांना कशाची भिती आहे. धंदा तर चालुच राहणार आहे… कारवाई तर अगदीच कागदावरची राहणार आहे….
ह्यालाच कायदा आणि सुव्यवस्था म्हणतात ही ओळख पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्त परिमंडळ यांनी करून दिली आहे असे उद्वेगाने नमूद करावे लागत आहे. (पोलीस आयुक्तांच्या मेहेरबानीमुळे दोन्ही पोलीस स्टेशन हद्दीत कुठे काय काय सुरू हे पुढील बातमीत पाहूयात. क्रमशः)