Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी न्यायाधीश ॲड. सचिन जोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर, मुंबई येथे घेणार शरद पवारांची भेट

धनगर समाजाचा नवा चेहरा म्हणून ओबीसी वर्गातून त्यांना वाढता पाठिंबा

नॅशनल फोरम/मुंबई/दि/ प्रतिनिधी/
माजी न्यायाधीश ॲड. सचिन जोरे हे शिवसेना शिंदे गटाचे नेते असून ते लवकरच शिंदेना रामराम ठोकुन राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. ते माढा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे समजते. तसेच ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे सुत्रांकडून माहिती समोर येत आहे.

कोण आहेत हे सचिन जोरे –
ॲड.सचिन जोरे हे माजी न्यायाधीश असून, एमपीएसी मध्ये राज्यात प्रथम आले आहेत. टॉपर असलेले श्री. जोरे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आहे. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीकडून इंदापुर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविली. त्यात त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. सत्ताधारी भाजपा व काँग्रेसच्या उमेदवाराच्या तोडीची मते त्यांना मिळाली आहेत.

ॲड. सचिन जोरे हे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कमिटीवर कार्यरत असतांना, त्यांनी महाराष्ट्रभर दौरे व मेळावे घेवून प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. तसेच त्यांचा राज्यभर दांडगा लोकसंपर्क आहे. 

एक उच्चशिक्षित न्यायाधीश म्हणून कार्यरत राहिलेले ॲड. जोरे माढा लोकसभा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. अलीकडील काळात मतदान मतदानाची टक्केवारी कमी होत असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी संपूर्ण माढा मतदारसंघात मतदान करणे हा माझा अधिकार आहे आणि मी मतदान करणारच असे मतदार जनजागृती अभियान राबवले असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.  तरूण, सुशिक्षित बेरोजगारांसाठी व्यवसाय मार्गदर्शन, कायदेविषयक शिबिरे, करिअर मार्गदर्शन, शिबिरे, रक्तदान शिबिरे आयोजित करून त्यांनी सामाजिक कार्यात एक वेगळाच ठसा उमटवला आहे.

दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतदार बांधव तुलनेने जास्त आहेत व सद्यःस्थितीमध्ये एक धनगर समाजाचा नवा चेहरा म्हणून ओबीसी वर्गातून त्यांना वाढता पाठिंबा दिसून येत आहे.