Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे ….आता वाजले की बारा

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील खून, हत्याकांड, दरोडा, घातपात, फसवणूक, देहव्यावारासह अमली पदार्थांचा खुलेआम बाजार…
कोरेगाव पार्क मध्ये खुलेआम वेश्याव्यवसाय

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
ब्रिटिश काळापासून ते आज पर्यंत पुण्यातील कोरेगाव पार्क हा परिसर जिल्हाधिकारी पुणे यांच्या निरीक्षणाखाली असलेला भूभाग आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालय व जिल्हाधिकारी पुणे यांच्या स्वतंत्र निरीक्षणाखाली असलेल्या कोरेगाव पार्क, कल्याणी नगर परिसरात शेकडोंच्या आसपास स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असताना. त्याच्यावर कारवाई केली जात नाही. सेक्स टुरिझम च्या नावाखाली संपूर्ण कोरेगाव पार्क हद्दीत दिवस-रात्र 24 तास देश विदेशातील मुली व महिलांचा बाजार भरविला जात असताना, त्याच्यावर कायद्यातील कठोर तरतुदींचा वापर केला जात नाही. दरम्यान मागील एक दीड वर्षात संपूर्ण कोरेगाव पार्क परिसराचा कुंटनखाना होण्यात कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन मधील स्थानिक पोलिसांचा सहभाग असल्याखेरीज अशा प्रकारचा महाउद्योग जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भूप्रदेशात होणे शक्य नाही. त्यामुळे कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनची झाडाझडती तातडीने घेऊन पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान मे महिन्याच्या चालू आठवड्यात पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत खून, हत्याकांड, चोरी, दरोडा, घातपात, अमली पदार्थांची विक्री याचा भयंकर परिणाम शहरात दिसून आलेला आहे. सर्व पोलीस स्टेशन हद्दीत याच प्रकारचे जबरी गुन्हे दाखल झाल्याचे पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावरून दिसून येत आहे.

कोरेगाव पार्कमध्ये पोलीस आणि विभागीय प्रशासकीय कार्यालयांचे नियंत्रण आहे काय-
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अधिनस्त असलेले कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील बहुतांश भागात आज मितीस स्पा आणि मसाज पार्लर आणि त्यातीलही वेगवेगळ्या थेरपीच्या नावाखाली देश विदेशातील महिलांकरिता वेश्याव्यवसाय सुरू आहे. सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा यांनी मागील काही महिन्यांमध्ये आलेल्या तक्रार अर्जावरून अनेक कारवाया करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर दिवस-रात्र 24 तास देहव्यापारा सोबतच हुक्का पार्लर, रेस्टोबार, क्लब यामध्ये सतत नशिल्या पदार्थाची झिंग आल्यासारखे युवक युवती झिंगत असल्याचे दिसून येत आहे.
थोडक्यात कोरेगाव पार्कमध्ये अमली पदार्थांचा देखील सर्रास वापर होत असल्याचे तरुण-तरुणींच्या झिंग.. झिंग.. झिंगाट… वर्तनामुळे दिसून येत आहे. पुण्यातील देशी दारू दुकानाच्या बाहेर पूर्वी आणि आजही जसे दारूडे झिंगलेले असतात, आता हे चित्र उच्चभू्र अशा कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत दिसत आहेत. जिल्हाधिकारी पुणे यांच्या नियंत्रणाखालील असलेल्या या भागावर पोलीस कारवाईचे अधिकार पोलीस आयुक्तालयास असताना देखील त्यावर अद्याप पर्यंत नियंत्रण ठेवण्यात अपयश आले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरेगाव पार्कमध्ये महसुली प्रशासन व पोलिसांचे नियंत्रण कुठे आहे असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान कोरेगाव पार्कच्या मानगुटीवर बसलेला विक्रम वेताळाचा खेळ थांबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

मागील आठवड्यात पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा-
पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन कडून आलेल्या प्रेसनोट वरून असे दिसून येते की, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या बहुतांश सर्वच्या सर्व पोलीस स्टेशन हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचे 12 वाजल्याचे दिसून आले आहे. त्याचा हा वृत्तांत….

चोरी- दरोड्याचे गुन्हे –
विश्रांतवाडी पोलीस स्टेशन-

फिर्यादी 73 वर्षाची महिला रा. आळंदी रोड साप्रस पुणे या गावी गेलेल्या असताना त्यांचा राहता फ्लॅटचा दरवाजा अज्ञात इसमाने तोडून बेडरूमच्या लाकडी कपाटातील एक लाख 13 हजार 750 रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज घरफोडी चोरी करून नेला. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध 132/2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

स्वारगेट पोलीस स्टेशन-
स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील नेहरू स्टेडियम शेजारील पीएमपीएल बस स्टॉप येथे सकाळी 11 वाजता शनिवार पेठ येथे राहणारी एक 31 वर्षीय महिला थांबलेली असताना, अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या नकळत सोन्याचे मंगळसूत्र व 2500 रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख 42 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरी करून नेला आहे. फिर्यादी यांच्या शेजारी उभे असलेल्या महिलेने फिर्यादी यांना उजव्या बगलेतील पर्स डाव्या बगलत घेण्यास सांगितले असल्याने तिने सदरची चोरी केली असावी असा फिर्यादीत संशय आहे.

चंदननगर पोलीस स्टेशन-
चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील श्री. सावलिया ज्वेलर्स, वडगाव शेरी येथे फिर्यादी भैरू कुमावत वय -23 रा. सोमनाथ नगर वडगाव शेरी हे त्यांच्या दुकानात हजर असताना, एका अनोळखी पुरुष इसमाने त्यांच्या दुकानात सोन्याची अंगठी खरेदी करण्याचा बहाणा करून दुकानात असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन दुकान असलेल्या सोन्याच्या ट्रे मधील एक सोन्याची अंगठी किंमत 79 हजार चोरी करून नेली आहे.

खडक पोलीस स्टेशन-
खडक पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुवार पेठ येथील कल्याणी सोसायटी शांतीनगर पार्किंग मध्ये 29 वर्षीय फिर्यादी महिला पार्किंग मध्ये थांबले असताना, आरोपी महेश उर्फ राहुल लक्ष्मण सावंत वय 23 वर्ष रा. थेरगाव पुणे यांच्या जवळ येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची 60 हजार रुपये किमतीची चैन जबरीने चोरी करून नेली आहे.

वानवडी पोलीस स्टेशन-
वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील आर्किस कॅफे लुल्लानगर चौक, इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ वानवडी पुणे येथे फिर्यादी एक 25 वर्षीय सज्ञान मुलगी त्यांच्या मित्रासोबत गप्पा मारत असताना अज्ञात इसमाने जवळ येऊन फिर्यादी यांना … तू माझ्याशी लग्न करत नाहीस असे म्हणून फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून, शिवीगाळ, मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचे धमकी देऊन फिर्यादी यांच्याकडील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरी चोरी करून नेला आहे.

शिवाजीनगर पोलीस स्टेशन-
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे महापालिका बस स्टॉप वर एक 64 वर्षीय जेष्ठ महिला पीएमपीएमएल बस ने प्रवास करण्यासाठी बस स्टॉप वर थांबले असताना, बसमधील गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या हातातील सोन्याची 50 हजार रुपये किमतीची बांगडी चोरी करून नेली आहे.
हडपसर पोलीस स्टेशन-
हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील अण्णासाहेब मगर उपबाजार आवार सोलापूर रोड मांजरी बुद्रुक हडपसर येथे एक 53 वर्षीय इसम कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे येथे विभाग प्रमुख म्हणून काम पाहत असून, या ठिकाणी व्यापारी हे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल टेम्पोमध्ये भरत असताना अनोळखी इसमांनी संगनमत करून जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या टेम्पो मधील कॅरेट खाली काढून घेऊन व्यापाऱ्यांना धक्काबुक्की, करून त्यांच्या खिशातील बाराशे रुपये जबरदस्तीने घेऊन गेले आहेत.

सिंहगड रोड पोलीस स्टेशन-
सिंहगडरोड पोलीस स्टेशन हद्दीतील शांतीनगर, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड येथे फिर्यादी जगदीश घारे वय- 44 वर्ष यांचा राहता फ्लॅट कुलूप लावून बंद असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा दरवाजा उचकटून बेडरूम मधील दोन हजार रुपये व सोन्याच्या दागिने असा एकूण दोन लाख 90 हजार 700 रुपये किमतीचा ऐवज घोरफोडी, चोरी करून नेला आहे.

जीवे ठार मारणे, खुनी हल्ला, घातपात-
उत्तमनगर पोलीस स्टेशन-

उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीतील उत्तमनगर विठ्ठल मंदिरासमोर, झऱ्याजवळील भवानी मंदिराजवळ रोडवर फिर्यादी सुशांत गायकवाड वय- 19 वर्ष, मोरे कॉम्प्लेक्स शिवणे पुणे हे मित्राच्या वाढदिवसाला गेले असता, तेथे आरोपी 1. बाळा अरविंद पाटील वय- 30 2.प्रशांत बाबु रायकर वय -25 3. शुभम नंदा कदम वय- 22 वर्ष, सर्व रा. उत्तमनगर यांनी काही कारण नसताना, फिर्यादी सुशांत गायकवाड याच्या मित्राला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगडी पेव्हिंग ब्लॉक, बांबू व लाथा बुक्क्याने जबर मारहाण करून डोक्यास गंभीर दुखापत करून, शिवीगाळ व दमदाटी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच संपूर्ण भागात दहशत निर्माण केली आहे. आरोपींविरुद्ध भादविक 307, 323, 504, 506, 34 सह कलम सात प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

येरवडा पोलीस स्टेशन-
येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील सिद्धार्थ नगर झोपडपट्टी, रामवाडी पुणे येथे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी बाळू बनसोडे वय 55 वर्ष, रा. रामवाडी यांनी जुन्या भांडणाच्या वादावरून फिर्यादी हे घरी जात असताना रामवाडी येथे तीन इसमांनी बाळू बनसोडे यांच्या डोक्यामध्ये लोखंडी हत्याराने मारून त्यांच्याबरोबर असलेले इतर अनोळखी इसमानी फिर्यादी यांना पकडून मारहाण केली.संबंधिताविरूद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे भादविक 324, 327, 143, 144, 147, 148, 149 महा.पो.क 37 (1) 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सिंहगड रोड पोलीस स्टेशन-
सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीतील वीआर कॅफे व्हिजन स्कूल जवळ जे एस पी एम रोड दुर्गा कॅफे नऱ्हे येथे रात्री पावणे अकराच्या सुमारास फिर्यादी सागर लोखंडे वय 32 वर्ष रा. कृष्णकुंज सोसायटी नऱ्हे हे त्यांचा मित्र ऋषिकेश याच्या भावाच्या लग्नाचा मांडवटाळा कार्यक्रमांमध्ये ऋषिकेश व यातील आठ इसम यांच्यामध्ये झालेल्या वादावादी वरून फिर्यादी सागर लोखंडे व मयूर गावडे असे त्यांच्यामधील वाद मिटवून जेवण करण्यासाठी गेले असताना, इतर सात साथीदारांनी एकत्र येऊन प्रथम हाताने मारहाण करून त्यानंतर धारदार हत्यारांनी मारून, दगड फेकून मारून, कॅफेवर दगड मारून, कॅफेची तोडफोड केली. तसेच तिथे जमलेल्या लोकांमध्ये दहशत निर्माण करून त्यांच्या हातातील लोखंडी कोयते फिर्यादी सागर लोखंडे याच्यावर उगारून … थांब तुला मारून टाकतो… असे मोठमोठे ओरडून लोखंडी कोयत्याच्या सहाय्याने फिर्यादी यांच्या डोक्यास व दोन्ही हाताच्या मनगटावर मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. आठ आरोपींविरुद्ध भादविक 307, 323, 336, 427, 141, 142, 143, 144, 146, 147, 148, 149, 34 महा.पौ.का 37 (1) 135 आर्म ॲक्ट 4 (25) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

खडकी पोलीस स्टेशन-
खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील गोपी चाळीच्या समोर खडकी पुणे येथे सकाळी साडेदहा वाजता फिर्यादी अरबाज शेख, वय 18 वर्ष, रा. गोपी चाळ,खडकी पुणे हे जैन बेकरी खडकी बाजार येथे घरातील साहित्य घेण्यासाठी नमूद ठिकाणाहून जात असताना तीन अनोळखी इसम यांना खुन्नस देऊन पाहिले असा गैरसमज करून त्यांना शिवीगाळ व हाताने मारहाण करून त्यांच्या खिशातील चाकू काढून फिर्यादी यांच्या छातीवर वार करून, त्यांना गंभीर जखमी केले.

चंदननगर पोलीस स्टेशन-
चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वोदय हॉटेल समोर, जुना मुंडवा रोड, चंदननगर येथे एक 24 वर्षीय महिला फिर्यादी यांचे पती रोशन यांच्या ओळखीचा आरोपी क्र. 1. संजय कारभारी शिंदे वय- 31 वर्ष याच्याकडून त्याचे दाजी प्रतीक धुरंदर यांच्याकडून व्याजाने घेतलेल्या पैशाचे पोटी घाण म्हणून ठेवलेला एसपी कंपनीचा लॅपटॉप माघारी घेण्यासाठी थांबून व त्याच्याकडून यापूर्वी गेल्या तीन महिन्यापासून लॅपटॉपची मागणी करीत असताना, या गोष्टीचा राग मनात ठेवून फिर्यादी यांचे पती रोशन यांना शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच त्यांचे चार चाकी गाडी ठेवलेले धारदार हत्यार बाहेर काढून, रोशन यांच्या अंगावर जात असताना फिर्यादी ह्या मध्ये आले असता, धारदार हत्याराने त्यांच्या उजव्या दंडास लागून जखमा झाले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर असलेला आरोपी क्र. दोन शंकर हरिदास साबळे वय- 20 वर्ष याने पॅन्टच्या खिशातून चाकू काढून फिर्यादी व त्यांचे पती रोशन असे दोघांच्या दिशेने रोखून धरून, जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. आरोपीविरुद्ध चंदननगर पोलीस स्टेशन येथे भादविक 337, 324, 504, 506, महा.का.क 37 (1) 3 135 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट तीन व सात सावकारी अधिनियम 39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

खडक पोलीस स्टेशन-
खडक पोलीस स्टेशन हद्दीतील लोहियानगर एपी 54 कल्याणकर पुलाजवळ एक 40 वर्षिय इसम महेश त्यांच्या राहत्या घराच्या बाहेर आरडाओरडा येत असल्याने त्यांचे घरासमोर मोठ मोठ्याने शिविगाळ व आरडाओरडा करीत असणारा यातील नमूद इसम व त्याचे इतर चार साथीदार यांनी फिर्यादीस महिलेस कोठे आहेत तुमचे भाईलोग…. तुमच्या भाई लोकांना मी मारतो… असे म्हणून त्याने त्यांच्या हातामध्ये असणारे हॉकीस्टिक 40 वर्षीय महिलेच्या डाव्या कानावरती व हातावरती मारून जखमी केले. तसेच फिर्यादी यांचा भाऊ मुस्तफा रौफ शेख याने, तुम्ही माझ्या बहिणीला का मारले असा जाब विचारल्याच्या कारणावरून त्यांना तेथे पडलेले दगड उचलून मारल्याने, फिर्यादी यांचा भाऊ मुस्ताक रौफ शेख यांची मुलगी संजना परदेशी व परिसरात राहणारी महिला यांना दगड लागून दुखापत करून शिविगाळ करून जीव मारण्याचे धमकी दिली. खडक पोलीस स्टेशनमध्ये भादविक 324, 141, 142, 144, 146, 147, 148, 149, 504, 506 महा.पौ.का क 37 (एक) 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन-
विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील आर अँड डी इ गेट समोरील मेवाड आईस्क्रीम आळंदी रोड पुणे येथे रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राहुल जमादार वय- 19 आळंदी रोड पुणे हे त्यांचे मित्र 1.गोपाल गुंडेकर वय-20 वर्ष 2.तुषार जठार वय- 19 वर्ष, 3.सनी पवार वय- 20 वर्ष यांच्यासह मेवाड आईस्क्रीम आळंदी रोड येथे एकत्र आइस्क्रीम घेत असताना, राहुल जमादार यांच्या परिचयातील एक इसम व त्याचा साथीदार त्यांच्या ओळखीची मुलगी हीच फिर्यादी यांनी मेसेज का केला, या कारणावरून त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

तसेच त्यांचा साथीदाराने राहुल जमादार याला तुला आता सोडणार नाही, असे सांगून त्याच्याकडील चाकूने उजव्या हाताच्या दंडावर मारून फिर्यादी जखमी केले. फिर्यादी यांना वाचवण्यासाठी त्यांचे मित्र तुषार जठार व गोपाल गुंडेकर हे मध्ये आले असता त्यांनाही जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांच्या हातातील चाकूने पोटात मारून दोघांना गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या ऑटो रिक्षाच्या काचा फोडून आरडाओरडा करून दहशत पसरण्याचा प्रयत्न केला. तसेच या इसमांनी जाताना फिर्यादी यांना शिवीगाळ करून तिला पुन्हा मेसेज केल्यास बघून घेण्याची धमकी दिली आहे. संबंधितांविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे भादविक 307, 326, 323, 504, 506, 427, 34 महा.पौ.का क 37 (1) 3 135 आर्म ऍक्ट 4(25) क्रिमिनल अमेंडमेंट तीन व सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

लबाडी, फसवणूक, ज्यादा व्याजाच्या पैशांचे आमिष –
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन-

कोरेगावपार्क पोलीस स्टेशन हद्दीतील ऑनलाइन माध्यमाद्वारे एक 40 वर्षे महिला ह्या ऑनलाइन जॉब शोधत असताना त्यांना जॉब देण्याचे आमिष दाखवून एक अज्ञात मोबाईल धारक याने स्वतःची ओळख लपवून फिर्यादीच्या अकाउंट वरून तीन लाख 67 हजार 541 भरायला लावून ते पैसे परत न करता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली आहे.

चंदननगर पोलीस स्टेशन-
चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीतील एक 28 वर्षे इसम रा. खराडी पुणे नोकरीच्या शोधात असताना एक अज्ञात मोबाईल धारकाने नोकरी देण्याचे आमिषाने फिर्यादी यांना वेगवेगळ्या टेलिग्राम चे टास्क पूर्ण करायला लावण्याचा बहाना करून, वेगवेगळे कारण सांगून फिर्यादी यांच्याकडून नऊ लाख 75 हजार रुपयांचे फसवणूक केली.

चंदननगर पोलीस स्टेशन-
चंदननगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील फिर्यादी वय 68 वर्ष रा. खराडी यांनी 19 जानेवारी 2023 रोजी ऑनलाईन औषधे कुरियरने मागवले होते. कुरिअर कुठपर्यंत आली आहे तपासण्यासाठी फिर्यादी यांनी ऑनलाइन गुगलवर सर्च करून मोबाईल क्रमांक मिळवून त्यातील मोबाईल धारक याला फोन करून, विचारणा केले असता, मोबाईल धारक यांनी फिर्यादी यांना पार्सल बाबत माहिती देण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून या लिंक वर क्लिक करायला लावून फिर्यादी यांची एक लाख 23 हजार 999 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याविरूद्ध चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

फिर्यादी यांची फसवणूक झालेल्या पैशाबाबत तसेच बँक खातेधारकांबाबत माहिती घेतली असता बँक खातेधारक हा पश्चिम बंगाल या राज्यातील असल्याचे समजून आले. सदर बँक खात्याला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांक व जीमेल आयडी ची माहिती घेतलेली असता, मोबाईलचे लोकेशन व जीमेलच्या आयपी ऍड्रेस वरून प्राप्त झालेल्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन हे पश्चिम बंगाल राज्यातील दक्षिण दिनासपूर येथील असल्याचे समजून आले. चंदन नगर पोलीस स्टेशन येथील सायबर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. रामेश्वर रेवले, पोलीस शिपाई शिंदे, पोलीस हवालदार उकिर्डे असे तपास कामी जाऊन मोबाईल क्रमांकाचे लोकेशन नुसार स्थानिक पोलिसांची मदत घेऊन आरोपी समीर नरेश रॉय वय- 21 वर्ष रा. पश्चिम बंगाल या ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन-
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे 6 मे 2023 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कात्रज हायवे वरील आर्यन स्कूल जवळ मोबाईल धारक इसम व त्याचे पाच सहा मित्रांनी मिळून फिर्यादी यांच्याकडून 50 लाख रुपयांची खंडणी उकळण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांची कार आडवून त्यांना गाडीतून खाली उतरून त्यामध्ये एका इसमाने फिर्यादीना चाकूचा धाक दाखवून बाकीच्यांनी फिर्यादीस मारहाण करून शिवीगाळ केली व जाताना त्यातील एकाने लक्षात ठेव… अशी धमकी दिली. तसेच 12 मे 2023 रोजी दुपारी सव्वा दोन वाजता मोबाईल धारक इसमाने फिर्यादी यांना व्हाट्सअप कॉल करून त्यांना 50 लाख रुपयांची खंडणी मागून खंडणी नाही दिली तर फिर्यादी व त्याच्या कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिली. म्हणून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस जमादार हर्षल शिंदे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे यांना बातमीदरामार्फत समजले की सौरभ संजय बनसोडे वय -21 वर्ष 2.पवन मधुकर कांबळे वय -22 वर्ष 3.संकेत योगेश जाधव वय- 24 वर्ष 4.कृष्णा भीमराव भाबट वय- 19 वर्ष यामध्ये सहभागी असल्याचे दिसून आल्याने त्यांना अटक करण्यात आलेले आहे.

खंडणी विरोधी पथक दोन-
चंदननगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांची सॉफ्टवेअर कंपनी असून त्यांचे बदनामी करण्याची भीती घालून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन, आरोपी महेश सौदागर हनमे राजेश्वरी नगर उत्तर सोलापूर याने तीन लाख 80 हजार रुपये स्वीकारून आणखी पाच कोटी रुपयांची मागणी करीत असल्यामुळे फिर्यादी यांनी पोलीस उपायुक्त गुन्हे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. खंडणी विरोधी पथक क्र. दोन गुन्हे शाखा यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी केली असता, आरोपी महेश हाणमे याच्या विरुद्ध चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यानच्या काळामध्ये आरोपी महेश हनमे रा. सोलापूर पुण्यातील फिर्यादी यांना वारंवार फोन करून पैशाची मागणी करत होता. व तत्काळ 50 लाख रुपये घेऊन पाटस परिसरात बोलवत असल्याने अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे व पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी खंडणी विरोधी पथकांची तीन वेगळे पथके तयार करून नमूद आरोपी याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे.

अमली पदार्थ विरोधी पथक, दोन –
अमली पदार्थ विरोधी पथक क्र. दोन यांच्याकडे अंमलदार हे डेक्कन पोलीस स्टेशनच्या परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार संदीप शेळके व योगेश मांढरे यांना मिळालेल्या माहितीवरून सेंट क्रिस्ट होम चर्च व शाळा यास लागून असलेल्या फुटपाथवर एरंडवने येथील सार्वजनिक रोडवर संकल्प सकपाळ रा.वरळी मुंबई यांच्या ताब्यातील 11 लाख रुपये किमतीचे 55 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त करून त्याचे विरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तसेच 18 मे 2023 रोजी पोलीस जमादार योगेश मांढरे यांना मिळालेल्या माहितीवरून कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील मुंडे व्यायाम शाळेसमोर हगवणे वस्ती कोंढवा येथे शाहरुख मुस्तफा बेग वय- 21 रा. कोंढवा याला संशयावरून ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख 40 हजार रुपये किमतीचे मेफेड्रॉन (एमडी) व 81 हजार रुपये किमतीचा चरस हा अमली पदार्थ जप्त करून त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 तसेच 20 मे 2023 रोजी पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेला माहितीवरून पुणे रेल्वे स्टेशन पार्सल गेट समोरील सार्वजनिक रोडवर दोन बिहार राज्यातील इसम 1. मंटू रामबाबू राय 2. राकेश कुमार रामनाथ दास वय- 19 वर्ष रा. बिहार यांना बंडगार्डन यांचे ताब्यात 12 लाख 73 हजार 880 चा 63 किलो 694 ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ जप्त करून त्याचे विरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
दरम्यान कोरेगाव पार्क हद्दीतील खुलेआम सुरू असलेल्या वेश्याव्यवायासह वरील प्रमाणे सर्व पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे दाखल झाले आहेत.तर असा गेला मागील आठवडा. पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत वरील प्रमाणे गुन्हे दाखल झालेले आहेत. आता चालू आठवड्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, आणि सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत किती हद्दीत कोणकोणते गुन्हे दाखल होत आहेत, गुन्हे घडण्याच्या अगोदर पोलीस नेमकी कोणती कार्यवाही करणार आहेत, याच्यावर पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.