Wednesday, December 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

कात्रज, भारती विद्यापीठ अवैध धंदे, गुन्हेगारी आणि बरेच काही… कळसकरांपेक्षा तीन पट अवैध धंदे आणि बेसूमार गुन्हेगारी… तरीही कुंभारांचा विजयी थाट…

भारती विद्यापीठ मध्ये- आरटीओ-उत्पादन शुल्क-पोलीस- वाहतुक पोलीसांचे… हम साथ, साथ है…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
कात्रजसह भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बोकाळल्याचे कारण सांगुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तत्कालिन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जगन्नाथ कळसकर यांच्यावर मानहानीकारक कारवाई करण्यात आली होती. सात दिवसांसाठी शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न करून त्यांचा पदभार पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. दरम्यान आज सव्वा वर्षानंतर, त्याच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत श्री. कळसकरांपेक्षा तीन पट गुन्हेगारी आणि अवैध धंदे वाढले असतांना, त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलीस आयुक्त पुढे का येत नाहीत असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत.

19 फेबु्रवारी 2022 रोजी काय घडले –
कात्रजसह भारती विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याचे कारण सांगुन तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जगन्नाथ कळसकर यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सात दिवस नियंत्रण कक्षाशी संलग्न सह कळसकरांकडील पदभार पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता.
तसेच कोणत्याही पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे सुरू होता कामा नये तसेच कुठेही अवैध धंदा आढळुन आल्यास संबंधित पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशा स्वरूपाच्या केवळ बातम्या तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता व सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्या कार्यकाळात येत होत्या. तसेच पोलीस बैठकीत अशा प्रकारचे आदेश दिले असल्याच्याही बातम्या आलेल्या होत्या. तथापी लेखी स्वरूपात कुठलेही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे समजते. तरी देखील श्री. कळसकर यांच्या कार्यकाळात कात्रज, भारती विद्यापीठ परिसरात अनेक अवैध धंदे असल्याचे कारण सांगुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

आज जुन 2023 मध्ये काय सद्यःस्थिती आहे –
श्री. कळसकर यांच्यानंतर एक महिला पोलीस निरीक्षकांसह, सध्या श्री. विजय कुंभार यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यापासून ते आज जुन 2023 या कालावधीत श्री. कळसकर यांच्या कार्यकाळात असलेल्या अवैध धंदयाची संख्या आणि आता अस्तित्वात असलेली संख्या पाहता, ही संख्या दुप्पट किंवा तीनपट झाली असल्याचे सांगण्यात येते. पुण्यातील रेड लाईट एरियात जेवढी घरे नसतील तेवढी घरे ( अपवाद कोरेगाव पार्क, कल्याणी नगर) आज भारती विद्यापीठ परिसरात कार्यरत आहेत. एवढ्या मोठा आकाराचा देहव्यापार मसाज पार्लर आणि स्पा च्या नावाखाली सुरू आहे. सेवा पुरविणाऱ्या कंपन्याच्या मोबाईलवर एक मॅसेज केल्यानंतर पाच/पन्नासची यादी सहज मिळते. एवढी भयावह परिस्थिती आज भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील आहे.
मटका, जुगार, पत्त्यांचा क्लब यांची तर गणतीच नाही. कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, यासह पुणे महापालिकेत समाविष्ठ झालेल्या गावांपैकी मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभुळवाडी, काळेवाडी, थोडक्यात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पासून ते जुन्या बोगद्यापर्यंत सर्वत्र थयथयाट पहावयास मिळतो. संडे हो या मंडे, अगदी ड्राय डे असला तरी मदयाचा इथुन पुर नव्हे तर महापुर वाहत असतो. देशी विदेशी दारूसह हातभट्टीच्या पहिल्या धारेसाठी तर रांगा लागलेल्या असतात असे अनेकांचे म्हणणे आहे. व्हेज असो नाहीतर नॉन व्हेज, ढाबा म्हणा किंवा हॉटेल सर्वत्र सुकाळ सुरू आहे.
खाजगी प्रवासी वाहनांचा तर दिवस-रात्र धुमाकुळ सुरू असतो. काय कुणी म्हटलं तर आम्ही काय फुकट थांबत नाही, पैसे मोजतो म्हणून गिऱ्हाईक घेवून जात आहे अशी उर्मट भाषेचा वापर होत आहे. मी केवळ त्यांचे म्हणणे शिष्टाचारात नमूद केले आहे, प्रत्यक्षात त्यांची आरेरावी…. त्यांच्याच शब्दात इथे नमूद केली तर प्रत्यक्षात भारतीची काय सद्यःस्थिती आहे समजले असते. परंतु अशा प्रकारच्या भाषेचा वापर किंवा उच्चार करण्यास बंदी आहे.

आता कारवाई का होत नाही –
तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारांसमोर काहीही सांगितले तरी, प्रत्यक्षात पुणे शहरात सर्वत्र सर्व धंदे सुरूच होते. एव्हेच कशाला पोलीस खात्यातील काही गैर महसुली अंमलदारांचे मटका जुगार अड्डे सुरू होते व आजही सुरू आहेत. त्यामुळे पब्लिसिटी पुरतीच कारवाईचे स्वरूप होते. बाकी सगळे सर्वांनाच ज्ञात आहे. असे असले तरी आता भारती मध्ये कारवाई का केली जात नाही. तसेही सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा यांनी तर भारतीमध्ये कारवाई करणे बंद केल्याचे चित्र दिसत आहे. त्यातही सद्या कार्यरत पोलीस निरीक्षक हे पूर्वी सामाजिक सुरक्षा विभागात होते. त्यामुळे देखील सामाजिक सुरक्षा विभाग, भारती मध्ये कारवाई करीत नसेल अशीही शक्यता वाटते. किंवा काहीही कारण असू शकते. परंतु सामाजिक सुरक्षा विभाग आणि इतर गुन्हे युनिटस भारती मध्ये कारवाई करीत नाहीत एवढे मात्र नक्की. मग एकट्या श्री. कळसकरांवर कारवाई करणे उचित नव्हते असे आज अनेकांत मत होत आहे.

तसेही लगत असलेल्या कोंढव्यातील हुक्क्याचा धुर आणि गुटख्याच्या पिचकाऱ्या शहरभर पसरलेल्या आहेत, बिबवेवाडी आणि सहकारनगरमध्ये पोलीसांचेच अवैध धंदे असल्याचे बोलले जात आहे, पलिकडे सिंहगड मधील गडगडाट सतत कानावर येत असतो. थोडक्यात काही विशिष्ठ हेतूने काही विशिष्ठ पोलीसांवर कारवाया करण्यात आल्या एवढचं यातून दिसून आलं आहे. 

दरम्यान मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्याच्या कालावधीत भारती मधील गुन्हेगारी किती वाढली आहे, त्यात सीआरपीसीतील 12/12 तासांचे, दिवस/रात्रीतील खुन, खुनाचा प्रयत्न, हत्याकांड, जबरी चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी यासह जबरी गुन्ह्यांचा तपास आणि गुन्ह्याची उकल किती झाली, आजची सद्यःस्थिती काय, यासह सर्वच अवैध व बेकायदेशिर गैरकृत्यांचा पंचनामा नॅशनल फोरमच्या अंकात पहा.