Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

125 कोटीच्या झाडणकामांच्या टेंडरमध्ये 7 कोटीचा मलिदा नेमका कुणाला…
पुणे महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत व्हाईट कॉलर क्राईमने उच्चांक गाठला..

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum
पुणे महानगरपालिकेत नगरसेवकांची राजवट संपुष्टात आल्यानंतर प्रशासक असलेल्या विक्रम कुमार, रविंद्र बिनवडे, कुणाल खेमणार या प्रशासकांव्दारा महापालिकेचा कारभार सुरू आहे. स्थायी समिती, मुख्य सभा, इस्टीमेट कमिटी यांचे सर्व अधिकार आता प्रशासकांकडे आलेले आहेत. कोणताही निर्णय घेतात आता नगरसेवकांची कोणतीही अडचण नसल्यामुळे प्रशासकांनी पुणे महापालिकेच्या तिजोरीवर बोजा वाढविण्याचे काम वेगाने सुरू ठेवले आहे. पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयांच्या 125 कोटी रुपयांच्या झाडण कामांच्या निविदेमध्ये पर्यवक्षकीय शुल्क म्हणून 6 टक्क्यांची तरतुद करण्यात आलेली आहे. 125 कोटी मधुन हे (7.5) साडेसात कोटी रुपये नेमकं कुणाच्या खिशात जाणार हे मात्र समजु शकलेले नाही. त्यामुळे पर्यवेक्षकीय शुल्काची तरतुद रद्द करून नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्याची मागणी होत आहे.


नगरसेवकांची राजवट संपुष्टात आल्यानंतर इस्टीमेट कमिटीची बैठक 20 मे 2022 रोजी महापालिका मुख्य इमारतीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह दुसरा मजला येथे संपन्न झाली. या बैठकीस श्री. प्रसन्नराघव जोशी, श्री. संतोष तांदळे, श्रीमती. सुस्मिता शिर्के, डॉ. महेशकुमार डोईफोडे, श्रीमती मिरा सबनीस, श्री. साहेबराव दांडगे, श्री. विरेंद्र केळकर, श्री. हितेंद्र कुरणे, श्री. राजेंद्र शिपेकर, श्री. सुनिल बिलबिले तसेच 15 क्षेत्रिय कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीचा इतिवृत्त 7 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलि आहे.
सहा टक्के पर्यवेक्षकीय शुल्क कशासाठी त्याचे आधी उत्तर दया –
पुणे महापालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयांककडून झाडण कामासाठी मजुर पुरविणे, बिटसनुसार मजुर पुरवठा करणे आदी टेंडर काढले जातात. पूर्वगणन पत्रक, उपलब्ध तरतुद आणि प्रस्तावास तांत्रिक छाननी समितीने मान्यता दिल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. दरम्यान या कामाच्या निविदेमध्ये 6 टक्के पर्यवक्षकीय शुल्काची भर/ वाढ करण्यात आली आहे. ती नेमकी कोणत्या कारणाने तरतुद केली आहे ते महापालिका आयुक्तांनी प्रथम स्पष्ट करणे आवश्यक आहे.
पुणे महापालिकेच्या अधिनस्थ असलेल्या 15 क्षेत्रिय कार्यालयाकडील एकुण 125 कोटी रुपयांच्या झाडण काम निविदेमध्ये सहा टक्क्यानुसार साडेसात कोटी रुपयांची अधिकची तरतुद करावी लागणार आहे. हे साडेसात कोटी रुपये नेमके कुणाला दिले जाणार आहे याची काहीच माहिती नाही. पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयाच्या अधिनस्थ परिसर व रस्ते स्वच्छतेसाठी झाडणकाम मजुर पुरवठा करण्याचया कंत्राटी कामाच्या निविदा काढण्याचे अधिकार आहेत. तसेच याच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी क्षेत्रिय स्तरावर मुकादम, आरोग्य निरीक्षक, विभागीय आरोग्य निरीक्षक यांची आहे. मोकादम, आरोग्य निरीक्षक व विभागीय आरोग्य निरीक्षक हे पुणे महापालिकेच्या कायम आस्थापनेवरील पगारी कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांना पगारा व्यतिरिक्त वेगळे पर्यवेक्षकीय शुल्क देण्याची कोणतीही आवश्यकता नाही. तरीही या सहा टक्क्यांची तरतुद पर्यवेक्षकीय शुल्क म्हणून करण्यात आलेली आहे.
तरीही झाडणकाम निविदेतील पर्यवेक्षकीय तरतुद रद्द करून, अधिकाऱ्यांची खाबुगिरी बंद करण्याची मागणी होत आहे.