Saturday, May 4 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मेले तर लढणार कोण? सत्ता हातात घ्या आणि आपले प्रश्न सोडवा-आंबेडकर

नॅशनल फोरम/जालना/दि/ प्रतिनिधी/
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी मरणाची भाषा करू नये. लढणारे मेले तर लढणार कोण? मरण्यापेक्षा मारा आणि राज्य करा. आमदार- खासदार, मंत्री देशाचे मालक नाहीत. मतदार मालक आहे. त्यामुळे प्रश्नांची जाण असण़ाऱ्यांना संसदेत पाठवा. जोपर्यंत प्रश्नांची जाण असणारे संसदेत जाणार नाहीत तोपर्यंत प्रश्न तसाच राहणार आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण करणारे मनोज जरांगे यांची ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. अनेक वर्षे मी लोकसभेत या प्रश्नाला अनेक वेळा उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु, ज्यांच्या संबंधित हा प्रश्न आहे त्यांनी सभागृहात उदासिनता दाखविली. त्यामुळे आपण कोणाला दोष देत नाही. कोणावर टिका करून हा प्रश्न सुटणार नाही. ज्यांना या प्रश्नांची जाण आहे अशी माणसं सभागृहात जात नाहीत तोपर्यंत या प्रश्नाचा निकाल लागेल, असे मला वाटत नाही. 

शासनच निर्णय घेतं आणि शासन उदासीन असेल तर निर्णय कोण घेणार? असे अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी आरक्षण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तो सोडविला गेला पाहिजे. त्यामुळे तुम्ही मरणाची भाषा करू नका. लढणारी माणसं निघून गेली तर लढणार कोण? मरण्यापेक्षा मारा आणि राज्य करा असे आपण म्हणतो. आमदार, खासदार, मंत्री देशाचे मालक नाहीत. मतदार हे मालक आहेत. पाच वर्षानंतर त्यांना हकला आणि सत्तेत या. जे पाहिजे ते करून घ्या. आपण तब्येत बिघडणार नाही याची काळजी घ्या. आंदोलन सुरू ठेवा. आम्ही सोबत आहोत, ज्यांना महाराष्ट्रात आमच्यासोबत समझोता करायचा आहे. त्यांनी आम्ही सांगतोय की, इथले जे जिवंत प्रश्न आहेत ते तुम्ही हातात घेणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत असेही  आंबेडकर म्हणाले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.धैर्यवर्धन पुंडकर, राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, वंचित बहुजन युवा आघाडीचे नेते अमित भुईगळ, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सविताताई मुंडे यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिसांनी लाठ्या-काठ्या चालवू नयेत-
दडपशाही कालखंडाला सुरूवात झाली आहे. माझी पोलिसांना विनंती आहे. तुम्ही माणूस आहात, राज्यकर्त्यांचे गुलाम नाहीत. तुम्ही व्यक्ती आहात. राज्यकर्त्यांनी सांगितले तर कृपया पुन्हा झोडून काढू नका, अशी विनंती आहे. झालेली घटना चुकीची आहे. राज्यकर्ता आदेश लेखी देत नाही. त्यामुळे झालेला लाठीचार्ज हा निषेधार्ह असून, पोलिसांनी मानवतेने वागावे, असा सल्लाही बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला.