Tuesday, November 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बेरोजगारीचे भीषण वास्तव! पोलीस शिपाई होण्यासाठी डॉक्टर, अभियंते, वकील, एमबीए, पदव्युत्तरही रांगेत

बेरोजगारी व महागाई या विषयावर राजकीय पक्ष आणि पत्रकारांची तोंडे कोणत्या कारणाने बंद झाली आहेत तेवढं तरी सांगा,

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या, सर्वांना उच्च शिक्षण, शिक्षण व नोकरीतील आरक्षणाला संरक्षण, महागाई कमी केली जाईल, सर्वांना स्वतःचे घर, देशातील एकही नागरीक उपाशी राहणार नाही अशा प्रकारच्या लोकप्रिय घोषणांनी प्रत्येक निवडणूका चांगल्याच गाजल्या. परंतु मागील 70 वर्षात देशाच्या मालकीच्या सर्व सरकारी कंपन्यांची विक्री केल्यामुळे सरकारी कंपन्यातील आरक्षण आपोआप संपुष्टात आले. सरकारी कार्यालयातही घटनात्मक आरक्षणाची पदे न भरता, ती पदे पीपीपी तत्वावर भरली गेल्यामुळे आपोआपच घटनात्मक आरक्षण संपुष्टात आले आहे. लहान व मध्यम स्वरूपाचे लहान उद्योगांवर सर्वच प्रकारचे कर लादल्यामुळे होते नव्हते ते सर्व उदयोग बंद पडले.याचा सर्व परिणाम असा झाला की, पुण्यासह संपूर्ण देशात बेरोजगारीने थैमान घातले आहे. महागाई तर विकोपाला पोहोचली आहे. भुक आणि बेरोजगारीचे भय पाठीशी लागले आहे. ह्या विषयावर पुण्यासह देशातील कोणताही मिडीया बोलत नाहीये.

राज्यात देखील अलबेल परिस्थिती नाही. दर आठवड्याला नवीन मुद्दे उपस्थित करून वृत्तपत्रांची रकाने भरले जात आहेत. मिडीया देखील नको त्या विषयावर चर्चा घडवुन आणत आहे. मागील आठवड्यात छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की धर्मरक्षक यावर चर्चा झाली. त्याच्या अगोदर अधिवेशन काळात नव नवीन कहाण्या रचन्यात आल्या. सध्या चालुच्या आठवड्यात आता नवीन कोणता वादग्रस्त मुद्दा आणला जाणार आहे याचीच सध्या वाट पाहत आहोत. परंतु एकही राजकीय पक्ष महागाई, बेरोजगारीवर तोंड उघडत नाहीये. वंचि बहुजन आघाडीचे ॲड. बाळासाहेब आंबेडकर या विषयांवर चर्चा करीत असतांना, पुण्यासह राज्यातील कोणतीही खाजगी वृत्तवाहीनी किंवा वृत्तपत्र त्यांच्या बातम्या प्रसारित करीत नाहीत हे इथलं वास्तव आहे. 

सध्या राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान पोलीस शिपाई भरतीसाठी डॉक्टर, अभियंते, वकील, एमबीए, पदव्युत्तर तरूणांनी रांगा लावल्याने बेरोजगारीचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. सध्या रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सरकारी नोकरी मिळणे तर अवघडच आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याकडे तरुणाईचा कल आहे. पोलीस शिपाई होण्यासाठी उच्चशिक्षित मैदानात उतरले आहेत. अकोला व औरंगाबाद येथे सुरू असलेल्या शिपाई भरती प्रक्रियेत डॉक्टर, अभियंते, वकील, एमबीए, पदव्युत्तर तरूणांनीही रांग लावली आहे.

अकोला जिल्हा पोलीस आस्थापनेवरील 39 चालक शिपाई व 327 पोलीस शिपाई पदांसाठी राज्यभरातून तब्बल 8 हजारांवर अर्ज आले आहेत. पोलीस मुख्यालय व वसंत देसाई क्रीडांगणावर उमेदवारांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. मैदानी चाचणी बंदोबस्तासाठी दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, 17 पोलीस निरीक्षक, 22 सहा.पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक तसेच 222 पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहे. प्रत्येक प्रक्रियेचे चित्रिकरण करण्यात येत आहे.पोलीस शिपाई होण्यासाठी बारावी उत्तीर्ण ही पात्रता आहे. 

मात्र, असंख्य पदवीधरांनी शिपाई होण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. काही पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार देखील आहेत. आयुर्वेदिक डॉक्टर, विविध शाखेचे अभियंते, एम.ए., एम.कॉम., बी.एससी, बी.ए. बी.फॉर्म झालेले असंख्य तरुण-तरुणी पोलीस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी देतांना दिसून येत आहे. दरम्यान,औरंगाबाद ग्रामीण पोलीस विभागातील 39 पोलीस शिपाईपदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी तब्बल 5 हजार 725 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यात एक बीएचएमएस एमडी डॉक्टरसह 40 अभियंते, वकील, एमबीए आदी 1 हजार 661 उच्चशिक्षित उमेदवारांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेत अन्य उच्चशिक्षितांसह एलएलबी, एलएलएमची पदवी घेतलेल्या दोन उमेदवारांनीही अर्ज केले आहेत.

 सुरक्षित नोकरी प्राप्त करून भविष्यात मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून उच्चशिक्षितांनी अर्ज केल्याची शक्यता एका उच्चपदस्थ पोलीस अधिकार्याने वर्तवली.पोलीस शिपाईपदासाठी 12 महिलांचीही भरती करण्यात येणार असून, त्यासाठी दीड हजारांवर अर्ज दाखल झाले आहेत. 
भरती प्रक्रियेसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्यासह सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, 10 पोलीस निरीक्षक, 9 सहायक पोलीस निरीक्षक, 17 पोलीस उपनिरीक्षक, 135 पोलीस अंमलदार काम पाहात आहेत.
पोलीस शिपाईपदासाठीच्या भरती प्रक्रियेत एक बीएचएमएस एमडी, एमई, बीई असे अनुक्रमे 3 आणि 37 मिळून 40 अभियंते, 25 बी.टेक, 15 एमबीए उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने भरती प्रक्रिया सुरू आहे.
अर्जदार उच्चशिक्षितांची संख्या बीएचएमएमएस एमडी (01), एम.ई. (03), बी.ई. (37), बी.टेक (25), एमबीए (15), बी.फार्मा (14), बी. कॉम ( 205) एम.कॉम (27), एम.एस्सी (35), एलएलबी-एलएलएम (02), बीएस्सी ऍग्री (26), बीएस्सी (407), बीबीए-बीसीए (40), एमए (95) बीए (729). अशी आहे. त्यामुळे बेरोजगारी किती टोकाला पोहाचली आहे त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.