Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

घरफोडी केलेला मुद्देमाल, गुन्हे शाखेने चार किलो सोने वितळविले?

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा , सोन्याची अंडी देणारी कोंबडी
चोर पोलीस भाई-भाई, सराफाला मात्रा वालीच नाही
घरफोडीच्या नावाखाली ज्वेलर्संना भिती घालून कोट्यवधी रुपये लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम


पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुणे शहरातील पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी झाल्यानंतर, गुन्ह्याचा शोध घेणे, मुद्देमाल जप्त करणे आणि पुढे त्या मुद्देमालाच्या मालकाची वस्तु शासकीय नियमांचे पालन करून संबंधितांकडे सुपूर्द करणे अशी कायदयाची आणि गुन्हे तपासाची ढोबळमानाने तरतुद आहे. तथापी घरफोडी झाल्यानंतर, गुन्ह्याचा माग काढणे, खरा गुन्हेगार शोधून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करणे अपेक्षित असतांना, मुद्देमाल जप्त केल्यानंतर सोन्याची चोरी, घरफोड्या करणाऱ्या चोरांकरवी पुणे शहरातील सोनारांना टार्गेट केले जात असल्याचे समोर आले आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची कायदयात तरतुद असल्याप्रमाणे रक्षण करणे, जतन करणे आवश्यक असतांना, मुद्देमालाचे विद्रुपि करण करणे, सोने- चांदी सारखे मौल्यवान मुद्देमाल असल्यास ते वितळवुन घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट 1 ते 6 कडून अशाच प्रकारचे कृत्य समोर आले आहे. दरम्यान एका गुन्हे शाखेने सुमारे चार किलो सोने वितळवुन घेतले असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे जप्त मुद्देमालापैकी सोने- चांदी मौल्यवान असतांना ते वितळविण्याचे आदेश नेमके कुणी काढले आहेत, तसेच तो मुद्देमाल संबंधित मालकांना कसा ओळखता येईल हा प्रश्न देखील अनुत्तरीत आहे.


घरफोडी करणारा चोर, गुन्हा शोधून काढणारे पोलीस आणि सराफ –
चोर पोलीस भाई-भाई, सराफाला मात्रा वालीच नाही-
पुणे शहर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी करून, घरातील मौल्यवान दागिने चोरी होवून त्याच्या पोलीस तपासात घरफोडी करणारा चोर आढळुन येतो. पुढे त्या चोराने त्याच्याकडील मौलवान दागिने, मुद्देमाल किती आहे, त्यातील किती विक्री झाला आहे, किती गहाळ झाला आहे याची माहिती काढुन घेतल्यानंतर, ज्या सराफाकडे या चोरीच्या दागिन्यांची विक्री केली, त्याच्याकडे जावुन, चोरीच्या मुद्देमालाची तपासणी करून त्याबाबतचे सर्व दस्तऐवज व मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करणे आवश्यक आहे.
दरम्यान ग्राहकाकडे सोने खरेदीची पावती नसतांना, सोनाराने सोने खरेदी केल्याने, सर्व खापर एकट्या सराफावर फोडले जात आहे. तथापी ज्याने चोरी केली, त्या चोराचेेच पोलीस एकुण घेतात आमचे काहीच ऐकुण घेतले जात नसल्याचा आरोप होत आहेत. पैसे देवून ज्या सोनाराने, सोने खरेदी केले आहे, त्या सराफाला कुणीच वाली राहत नाही. एखादया सोनाराने अशा प्रकारचे सोने घेतले नसले तरी जबरदस्तीने चोरीचा आळ संबंधित सराफावर घेत असल्याचेही समोर आले आहे. चोरीचा माल विक्री करणारा व खरेदी करणारा दोघेही दोषी असतांना, ज्यांचा खरेदी विक्रीशी संबंध नसतांना, केवळ चोर सांगतोय म्हणून एखादया सराफाला पकडुन त्याचा छळ करणे हे कोणत्या नियमात मोडते हा एक गहन प्रश्न निर्माण झाला आहे. थोडक्यात चोर – पोलीस भाई भाई सराफाला मात्र वालीच नाही अशी आजची पुणे पोलीसांची अवस्था झाली असल्याची सराफा वर्गात चर्चा आहे.
पोलीस आणि गुन्हे शाखा म्हणजे सराफांच्या छळछावण्या –
काल शनिवारी एका गुन्हे शाखेत या प्रकरणांची माहिती घेत असतांना, (थोडक्यात स्टींग ऑपरेशन म्हटलं तरी वावग ठरणार नाही. ) काही सोनारांशी बोलणे झाले. पोलीसांशी देखील बोलणे झाले. एका चोराने पुणे शहरात 26 ठिकाणी घरफोड्या करून सुमारे तीन वर्षापांसून तो चोर, पोलीसांना गुंगारा देत होता. शेवटी तो पोलीसांच्या हाती लागला. त्या चोराने सुमारे 4 किलो सोने घरफोडी करून चोरून आणले होते. संबंधित चोराने ते सोने, पुणे शहरातील गरीब आणि गरजु लोकांकडे 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 15 ग्रॅम प्रमाणे विकुन देण्यासाठी दिले. तसेच दुसऱ्या माणसाने ते सोने तिसऱ्या व्यक्तीकरवी थेट सोनाराजवळच्या व्यक्तींना पुढे करून त्याच्याकरवी विक्री केले. सोने विकुन, सराफाकडून बाजारभावाप्रमाणे पैसेही घेतले.
संबंधित सोनारापुढे गयावया करून, माझी अमुक एक बहिण, भाऊ, पती, पत्नी, आई, बाबा दवाखान्यात आहे, पैशाची नड आहे म्हणून विक्री करीत आहे…. पैशांची खुपच गरज आहे, त्यामुळे सोन्याची पावती कुठे ठेवली आहे हे आता माहिती नाही, पण मी काय कुठे पळुन जात नाहीये. विश्वासाने घ्या, ते दवाखान्यातून, गावावरुन परत आले की पावती देईन अशा भरवशावर सोने घाण ठेवले जाते, किंवा विक्री केली जाते.
पुढे घरफोडी करणारा चोर, पोलीसांना सापडल्यावर, पोलीस दारात उभे राहतात. तुम्ही चोरीचे दागिने विकत घेतले आहेत, इथे येऊन भेटा असे सांगतात. संबंधित पोलीसांकडे सराफ, व्यापारी घाबऱ्या घाबऱ्या गेल्यानंतर, संबंधित पोलीस त्या व्यापाऱ्याला दम देऊन सांगतो की, तिसऱ्या व्यक्तीने अमुक एक कारण देवून सोने विक्री केले आहे, घाण ठेवले आहे याची माहिती दिली तरी, विनापावती सोने खरेदी केल्याने तो जबरी गुन्हा आहे, कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील, साहेब खुप कडक आहे असे व्यापाऱ्याला सुनावले जाते.
दरम्यान व्यापाऱ्याशी चर्चा सुरू असतांना, पोलीस मध्येच त्यांच्या कस्टडीतील गुन्हेगाराला गिरणीचा पट्टा मारतात, त्यात त्याचा आयेव, आयेव, असा इव्हळल्याचा आवाज येतो. त्यामुळे सराफा दुकानदार अधिकच घाबरून जातो. संबंधित व्यापाऱ्या समोर एकाच वेळी पाच सहा पोलीस, एक ओरडून बोलतो, दुसरा शिव्या घालतो, तिसरा, त्याच्या पाठीवर हात ठेवून, तुमची काहीच चुक नाही, खरं तर चोराने हे सांगितले आहे, पण कायदयाने आमचे हात बांधले आहेत, गुन्हा कबुल करा, जाऊद्यात थोडं नुकसान झालं म्हणून समजा… अशी समजुत काढतात, चौथा पोलीस कोपऱ्यात घेवून काहीतरी कानात बोलतो, पुन्हा पहिला पोलीस सोनाराकडे रागा रागाने पाहून सोनाराला अधिक धमकाविण्याचा प्रयत्न करतो, ज्वेलर्स घाबरत असल्याचे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या चोराला गिरणीचा पट्टा मारायचा आणि आई ऽऽ आई ऽऽ करीत विव्हळल्याचा आवाज बाहेर येवू दयायचा.
मग सोनाराकडे कबुल करवून, आमचे 4 किलो सोने जप्त करणे आवश्यक आहे. तुमच्याकडे 150 ग्रॅम सोने विक्री केले आहे. त्यामुळे 150 ग्रॅम सोने आणून दया नाहीतर पुढील कारवाईला तयार रहा अशी धमकी पोलीसंकडून तिसऱ्या चौथ्या तासाने दिली जाते. (थोडक्यात सगळी नौटंकी झाल्यावर)
वास्तवात 8, 10 12 ग्रॅम सोने ज्वेलर्सने खरेदी केले असतांना पोलीसांना 150 ग्रॅम सोने कुठून दयायचे असा प्रश्न निर्माण होतो. नाही होय, दया वया, गया वया करून, पुढारी, आमदार खासदार, ओळखीच्या आणाभाका खाऊन झाल्यावर शेवटी 120 ग्रॅम सोने जमा करण्याबाबत, पोलीस मोठ्या मनाने आदेश काढतो. सोने जसे आहे, ते आहे तसे न देता ते पूर्णतः वितळवुन, त्याच्या पट्टया किंवा गोळी करून दयायचे असे सांगितले जाते. दुसऱ्या दिवशी ते हजर केले जाते.
विना पावती 15 ग्रॅम सोन्याचे चालु बाजार भावाप्रमाणे 80 हजार रुपये आधिक दिलेले असतात. पुढे 120 ग्रॅमचे सोने दयायचे असल्याने सहा लाख रुपयांचे दागिने वितळवुन दिले असल्याचा प्रकारही समोर आला आहे.
दरम्यान एखादयाने सराफाने, वकील, जवळचे पोलीस, कार्यकर्ते यांना फोना फोनी करून, त्यांच्या सल्ल्याने पोलीसांना सांगातात की, आमचे काय ते प्रकरण कोर्टात पाठवा, आम्ही तिकडे उत्तर देतो म्हणून पोलीसांना कळविले तर, पोलीस … ठिक आहे… म्हणून ते प्रकरण कोर्टात पाठविले जाते. परंतु त्या सराफाला पुढे काय महाभारत होणार आहे याची थोडीही कल्पना नसते.
पोलीसांचा इगो दुखावला – मग महाभारताचा एक एक अध्याय सुरू होतो तो कसा – पहा –
वरील सर्व तमाशा करूनही सराफाने पोलीसांचे ऐकण्यास नकार दिल्याने, पोलीसांचा इगो पार दुखावला गेलेला असतो. त्यामुळे मग सध्या चालु असलेल्या प्रकरणांत कोर्टातून जामिनावर सुटल्यानंतर, त्याच्या दुसऱ्या तासाला, दुसऱ्या गुन्हा युनिटचे पोलीस त्याला अटक करतात. पुन्हा वरील नमूद प्रकार सुरू होतो. तसेच पुणे शहरात अनेक ठिकाणच्या घरफोड्यामध्ये याच सराफाचे नाव घेतले जाते.
पुन्हा दुसरा जामिन घेतला की, पोलीस युनिटचे तिसरा, चौथा, पाचवा, पुन्हा पोलीस स्टेशन पैकी एक पोलीस स्टेशन, दुसरे पोलीस स्टेशन असे एक एक करून 32 पोलीस पोलीस स्टेशन आणि 6 गुन्हा युनिट आळीपाळीने अटक करून त्याला पोलीसी इंगा दाखवितात.
शेवटी तोच व्यापारी सराफ पोलीसांच्या जाचाला कंटाळुन आता हे ज्वेलर्सचे दुकानच नको म्हणून जिवाला वैतागुन तो दुकान बंद करतो. परंतु तरी देखील पोलीस त्याचा पिच्छा/ पाठलाग सोडत नाहीत. अनेक व्यापाऱ्यांनी तर पुणे शहर सोडून दिले आहे, एवढच कशाला राज्यही सोडून दिले आहे. याची अनेक उदाहरणे आहेत. व्यापाऱ्यांच्या हीन-दीन कथा, दलित अत्याचारा सारख्याच दिसून येत आहेत. दलितांवर जातीय अत्याचार होत असला तरी ज्वेलर्स,व्यापारी, सराफांवर त्यांच्या व्यापारी गुणधर्मामुळे सरकारी अत्याचार होत असल्याचे काहीअंशी आढळुन आले आहे. एकाच वेळी 20/22 पोलीस चक्रव्युहात अडकलेल्या व पिचलेल्या व्यापाऱ्यांशी चर्चा करतांना आप-बिती नॅशनल फोरमला सांगितली आहे. त्याबाबत पुढील अंकापासून ही मालिका सातत्याने प्रसारित होणार आहे.
दरम्यान सोने, चांदी वितळविण्याचा आदेश नेमका कुणी दिला आहे, वितळविलेले सोने पुढे कोणत्या पोलीस अधिकाऱ्याकडे जाते…., मुळ मुद्देमाल, पुन्हा घरफोडी झालेल्या वंचित इसमाकडे जातो काय, सोने वितळविले असल्याने, त्याचा मुद्देमाल कोणत्या आधारावर दिला जातो ह्या सगळ्या बाबी असून पुढील अंकात याचा भाग प्रसारित करण्यात येईल. हा सर्व आँखो देखा प्रकार, एका गुन्हा युनिट कार्यालयात चांदीचे पत्रे बसवित असतांना व सोन्याची कडी कोयंडे बसवित असताना, शनिवारी रात्री पहावयास व अनुभवास मिळाला आहे. (पोलीसांनी पाळलेल्या चोरांची, घरफोडी ते ज्वेलर्स पर्यंतची कथा वाचा पुढील अंकात….)