Friday, April 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यात पराकोटीची गुन्हेगारी वाढली, मोक्का, एमपीडीए आणि तडीपारीचा धडाका कायम, पुणे शहर पोलीस गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय…?

खडकीतील सराईत गुन्हेगाराचे विश्रांतवाडीमार्गे शिवाजीनगरात बस्तान, कोण तालेवार पोलीस अधिकारी पाठीशी आहे…?
सहकारनगर पोलीसांनी तर कहर केला आहे…!

नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/ Aniruddha Shalan Chavan
पुण्यात पराकोटीची गुन्हेगारी वाढली असल्याचे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील मकोका, एमपीडीए व तडीपार गुन्हेगारांच्या संख्येवरून अनुमान काढण्यात येत आहे. पुण्याचे तत्कालिन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांच्या दोन अडीच वर्षाच्या काळात मकोका व एमपीडीए ने शतक गाठले होते. परंतु पाच सहा महिन्यापूर्वी पदभार स्वीकारलेल्या नुतन पोलीस आयुक्तांनी मकोका व एमपीडीए चे अर्धशतक गाठले आहे. त्यांच्या दोन अडीच वर्षात काळात ते नक्कीच व्दिशतक काढतील असे त्यांच्या वेगवान कारभारावरून दिसून येत आहे. परंतु एवढी गुन्हेगारी पुणे शहरात नेमकी का वाढली… नवीन गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना पोलीस आणि कायदयाची भिती का वाटत नाहीये…नवीन गुन्हेगारांशी पाठीशी नेमके कोण आहेत….

गुन्हेगारी का वाढली –
खाजगी सावकारी आणि अवैध धंदे हेच गुन्हेगारी वाढण्या मागचे कारण आहे. एकेकाळात रिअल इस्टेट व जमिन, घरे खाली करून देण्याचा मोठा उद्योग सुरू होता. परंतु आता खाजगी सावकारी बोकाळली आहे, त्यातच अवैध धंदे ज्यात मटका, पणती पाकोळी सोरट, रमीचे क्लब, गांजा, पन्नी, मॅफेड्रॉन सारखे अंमली पदार्थ विक्री, हातभट्टी, देशी विदेशी दारूची तस्करी याचे मोठे रॅकेट शहरात उभे राहिले आहे. या अवैध धंदयातून बक्कळ पैसा मिळत असल्याने, अनेक गुन्हेगारांनी या धंदयात बस्तान बसविले असल्याचे दिसून येत आहे.

याचे उदाहरण दयायचे तर, सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसात मकोका व एमपीडीए च्या मोठ्या कारवाया झाल्या. त्या नेमक्या का झाल्या याच्या खोलात कुणीच जात नाही. ज्या 20/22 वर्षांच्या तरूणांवर मकोका व तडीपारीच्या कारवाया झाल्या त्यात अवै धंदे कुणी चालु ठेवायचे यावरून वाद झाले होते. त्याचे असे झाले, पुणे शहरातील जनता वसाहत पाठोपाठ तळजाई वसाहतीचा क्रमांक लागतो. लोकसंख्येची घनता अधिक असल्याने मोठी वर्दळ सुरू असते. त्यात मागील 30 वर्षात तळजाई सारख्या मोठ्या झोपडपट्टीत एकही हातभट्टी विक्री केली जात नव्हती. तळजाई येथून जवळच असलेल्या धनकवडी येथून मारत्याच्या धंदयावर हातभट्टी विक्री केली जात होती. मागील 50 वर्षापासून हा हातभट्टीचा धंदा सुरू आहे. 

आता तळजाई वसाहतीमध्ये काही पोलीसांनी काही रगेल युवकांना हाताशी धरून त्या त्या भागात हातभट्टी विक्री करायला परवानगी दिली. जसे म्हसोबा मंदिर, गल्ली नंबर 71, मेहबुब भाजी दुकान अशा काही ठिकाणी हातभट्टी विक्री सुरू केली. पुढे वनशिव वस्तीतही धंदा सुरू झाला. त्यातच वनशिव वसाहतीत हातभट्टी बरोबर हंड्याच्या जुन्या कारखान्याजवळ मटका, जुगार, क्लब सुरू झाला. त्याचा परिणाम तळजाई येथील धंदयावर झाला. त्यामुळे तळजाईतील युवकांनी वनशिव वसाहतीत घुसून तेथील वाहनांची जाळपोळ तोडफोड केली, पुनः अरण्येश्वर अण्णाभाऊ साठे नगरातील युवकांनी तळजाईत येवून  राडा केला. त्याच पुणे सातारा रोडवरील मोरे वस्ती, झोपडपट्टीसह पद्मावती पंपींग स्टेशन ट्रॅव्हल कंपनीच्या बाहेर मटका जुगार भर रस्त्यावर बसून घेतला जातो. पणती पाकोळी सोरट भर रस्त्यावर रिक्षात बसून खेळले जाते. वनशिव वस्तीतही क्लब बरोबर मटका जुगार खेळला जातो. धनकवडी शेवटचा बस्टॉप, फाईव्हस्टार चौक व के.के. मार्केट ही तर जुगार अड्डयाची मोठी ठिकाणे आहेत. हे धंदे तर थेटच पोलीसांचे असल्याची या भागात सर्वांना ज्ञात आहे. गुन्हेगारांकरवी हे धंदे चालविले जात असल्याचे काही नागरीकांनी सांगितले आहे. या सगळ्यांवर मागाहून मकोका व एमपीडीए च्या कारवाया झाल्या हा भाग निराळा. परंतु हे युवक अवैध धंदयासाठी गुन्हेगारीकडे वळले. सहकारनगर पोलीसांनी पाळलेल्या गुन्हेगारीने संपूर्ण पुणे शहराला हादरे बसत आहेत. 

आता तर कहरच झाला आहे. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील किराणा माल दुकाने व पान टपरीतून गुटखा विक्री केली जाते. सहकारनगर पोलीस या प्रत्येक ठिकाणाहून दरमहा दीड ते दोन हजार रुपये हप्ता घेतात. आता तर गुटखा विक्रीचा हप्ता वाढवुन मागत असल्याची तक्रार अनेक टपरीचालक व किराणामाल दुकानदार करीत आहेत. तीन ते पाच हजार रुपये हप्ता करा नाहीतर गुटख्याची केस करण्याची धमकी दिली जात आहे. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत तर कहरच झाला आहे. 

दरम्यान पुढे काही काळाने सहकारनगर येथील याच गैरमहसुली पोलीसाला पोलीस आयुक्त कार्यालयातील एका उपआयुक्तांनी स्वतःच्या दरबारात प्रतिनियुक्तीवर घेतले. मग काय, बेछुट आणि बेभान झालेल्या त्या गैरमहसुली पोलीसाने तब्बल 30/35 पोलीस स्टेशन पैकी 16 पोलीस स्टेशन हद्दीत नव नवीन धंदे करणाऱ्यांची टिम तयार केली. असे म्हणतात की, त्या गैरमहसुली अंमलदाराकडील बहुतांश काळा पैसा ह्या अवैध धंदयामध्ये लावला गेला आहे. विमानतळ पोलीस स्टेशनहद्दीत डोंगरमाथ्यावर याच पोलीसाच्या भागीदारीत क्बल सुरू केला आहे. असे एकुण तब्बल 16 पोलीस स्टेशन हद्दीत अवैध मटका जुगार अड्डे, पणती पाकोळी सोरट, रमीचे क्लब सुरू केले आहेत. मागे आम्ही नॅशनल फोरम मधुन ओरड केल्यानंतर, मागाहून त्या पोलीस उपआयुक्ताने त्या पोलीसाला काढुन टाकले. परंतु ज्या 16 पोलीस स्टेशन हद्दीत त्याने धंदे सुरू केले, त्याचे हप्ते आजही या गैरमहसुली अंमलदाराला मिळतात. त्याचे उदाहरण मार्केटयार्ड मध्ये आले आहे. बहुतांश अवैध धंदयाची वसुली सध्या मार्केटयार्ड हद्दीत बसून होत असल्याची चर्चा आहे.  

यातूनच पुढे अनेक नवीन गुन्हेगार तयार झाले आहेत. त्यामुळेच आम्ही नॅशनल फोरम मधुन पुणे शहर पोलीस हे गुन्हेगार तयार करणारा कारखाना आहे काय अशी विचारणा केली होती, ती यामुळेच केली होती. आज खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील एका सराईत गुन्हेगाराने खडकीसह विश्रांतवाडी पोलीस स्टेशन व शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत मटका जुगार अड्डे सुरू केले आहेत. मागील एक महिन्यांपासून त्याबाबत आम्ही आवाज उठवित आहोत. परंतु कारवाई केली जात नाही. काल पोलीस आयुक्त कार्यालयातून करण्यात आलेल्या तक्रारीबाबत विचारणा केली. तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी कारवाई केल्याचा बनावट रिपोर्ट पोलीस आयुक्तालयास पाठविला आहे. एकदा कारवाई केल्याचा रिपोर्ट पाठविला की, लगेच दुसरी कारवाई करण्याची आवश्यकता भासत नाही. धंदा आजही सुरूच आहे. परंतु पुणे शहर पोलीसांना खोटी माहिती सादर करून शिवाजीनगर पोलीसांनी मोठी कामगिरी केली आहे असेच आज म्हणावे लागत आहे. जु.प्र.का नुसार केवळ 12 (अ) ची कारवाई दाखविली जाते. परंतु प्रत्यक्षात जागेवर अवैध धंदे सुरूच असतात. 

खडकीतून विश्रांतवाडी मार्गे शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे सुरू करण्याचे मोठे धाडस मानले जात आहे. वारंवार तक्रारी होवून देखील पोलीस कारवाई का करीत नाहीत हा एक संशोधनाचा विषय आहे. कोणता वरिष्ठ पोलीस अधिकारी या धंदयाच्या पाठीशी उभा आहे ते नाव समोर येत नाहीये. परंतु कुणीतरी मोठा तालेवार अधिकारी या अवैध धंदा व सराईत गुन्हेगाराच्या पाठीशी असल्याखेरीज एवढे धाडस कुणी करू शकणार नाही हे देखील तितकेच खरे आहे. 

पोलीसच अवैध धंदे करायला परवानगी देतात आणि पोलीसच गुन्हे दाखल करीत आहेत. थोडक्यात पोलीस नवीन गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना झाला आहे काय हा प्रश्न त्यातून निर्माण होत आहे.