Friday, May 10 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मंत्रालयाला छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्याची मागणी

नॅशनल फोरम/मुंबई/दि/प्रतिनिधी/
पुरोगामी महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचे वारस छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. सहायक अभियंता प्रियंका आठवले फाऊंडेशनच्यावतीनं राज्य सरकारकडे ही मागणी करण्यात आलीय. मॅक्स महाराष्ट्र द्वारा आयोजित विचारांचे संघर्षयोद्धे या परिसंवादामध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी या विषयाला वाचा फोडली होती.
ते म्हणाले होते, “ महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा असल्याचे मानले जाते. शिव, शाहू, फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे असं म्हटलं जातं. पण याच महापुरुषांच्या महाराष्ट्रातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज गायब होत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. युवराज संभाजीराजे छत्रपती यांचं परिसंवादातील भाषण 22 जून रोजी मॅक्स महाराष्ट्रवर प्रसारित झाल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली.

डेप्युटी इंजिनिअर प्रियंका आठवले फाऊंडेशनच्यावतीनं मंत्रालयालाच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष अध्यक्ष ॲड. रोहन आठवले, सचिव सदानंद आठवले, उपाध्यक्ष प्रणय भगत, अर्णव भगत यांनी याप्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहे. याशिवाय शिवसेना (उबाठा) यांनाही निवेदन देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालविणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण करणारे, सामाजिक बंधूभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार तसेच शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपुर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य करणारे व छत्रपती शिवरायांचे वारस असलेले छत्रपती राजर्षी शाहु महाराजांचे नाव महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयास समर्पक व पुरोगामी महाराष्ट्रास सुशोभित करणारे व सन्मान वाढविणारे ठरेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 
छत्रपती राजर्षी शाहु महाराजांचा अधिकार काळ 1884 ते 1922 कालखंडाचे अभ्यास केला तर महाराजांच्या 28 वर्षे राज्य कारभारातून जे विचार व दूरदृष्टीची कामे त्यांच्या हातून घडली तेच कार्य आम्ही आज महाराष्ट्राच्या मंत्रालयीन स्तरावरून राज्यातील जनतेकरीता राबवितांना दिसत आहे. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयातील कोणताही विभाग त्यांच्या विचारांच्या शिवाय चालू शकत नाही. सामाजिक न्याय, शिक्षण विभाग, क्रिडा विभाग, आरोग्य विभाग, महसुल विभाग, कृषी विभाग, सांस्कृतिक विभाग, बांधकाम विभाग या विभागातील कामांवर त्यांच्या विचारांचा पगडा आहे. ज्या क्षणी आम्ही महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो तो म्हणजे महाराष्ट्रातील तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळेच त्यामुळे आम्ही महाराष्ट्राला फुले, शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्र असे भूषणाने म्हणतो, असंही निवेदनात नमूद कऱण्यात आले आहे. 

महाराष्ट्राच्या नजीकचे राज्य तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय के.सी. आर. यांनी तेलंगणा राज्याच्या नवीन सचिवालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिले आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती राजर्षी शाहु महाराजांना  म्हटले आहे. अनेक समकालीन विचारवंतांनी त्यांना शाहु म्हणजे महाराष्ट्र , सर्वांगपुर्ण राष्ट्रपुरूष, महाराष्ट्राचे सर्च लाईट, माणसातील राजे, महाराष्ट्रातील लोकशाहीचा पाया चालणारा विश्वकर्मा असे गौरवोद्गार काढून संबोधले आहे. 

आमच्या महाराष्ट्र राज्याने सुध्दा त्यांचा सन्मान अशाच रितीने करणे गरजेचे वाटते तेव्हा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मंत्रालयास “राजर्षी शाहु महाराज मंत्रालय“ असे नामकरण करून आम्ही त्यांचे खरे विचारांचे वारसदार आहोत असे जगास दाखवून दयावे. याकरीता महाराष्ट्र शासनाचे मंत्रीमंडळाने त्वरीत तसा ठराव पारित करून घोषणा करावी, अशी मागणीही निवदेनातून करण्यात आली आहे.