Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

दरबारी नाव सिंहगड पोलीस स्टेशन, कारभार मात्र निजामशाही- आदिलशाहीसारखा… कॅसिनोला राज्यात बंदी, तरीही सिंहगड हद्दीत मात्र विभागुन कॅसिनो चालविला जातो…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर व त्यांच्याही काळात अर्ध्या महाराष्ट्रावर आदिलशाही व निजामशाहीचा कारभार सुरू होता. पुणे, सुपे व बारामती हे तर विजापुरच्या आदिलशाहीचा महसुली परगणा होता. ब्रिटीश भारत व स्वतंत्र भारतात आदिलशाही, निजामशाही संपुष्टात आली तरीही मनांमधील आदिलशाही आणि निजामशाहीचा कारभार अजुन निघालेला नसल्याचे दिसून येत आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीचा कारभार देखील विजापुरच्या आदिलशाहीला साजेसा असाच असल्याचे दिसून येत आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कॅसिनोला बंदी आणलेली आहे. असे असतांना, एका कॅसिनो मध्ये गैरकायदयाच्या ज्या ज्या बाबी असतात त्या त्या सर्व सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत जागोजाग दिसून येतात. कॅसिनो मध्ये असलेले वेगवेगळे विभाग, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. थोडक्यात सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडुन गुन्हेगारी पोसण्याचे काम वेगाने सुरू आहे. ज्याचा परिणाम पुणे शहरातील इतर पोलीस स्टेशन हद्दीत होत आहे.

सिंहगड पोलीस स्टेशनची कार्यकक्षा –
पुणे महापालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर, प्रशासकीय सोईच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने सिंहगड पोलीस स्टेशनची निर्मिती केली आहे. सध्या अभय महाजन हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांना 03 लाख लोकसंख्येसाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यासोबतच एकुण तीन पोलीस चौक्या कार्यरत आहेत. त्यापैकी अभिरूची, वडगाव व नऱ्हे ह्या तीन पोलीस चौक्या आहेत. वायरलेस मोबाईल व बीट मार्शल सुविधा देण्यात आल्याचे दिसून येत नाही. तरीही तीन लाख लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही सिंहगड रोड पोलीस स्टेशनची आहे.

लोकसंख्येची घनता काही ठिकाणी अधिक असली तरी क्षेत्रफळ मोठे आहे. गुन्हेगारी कारवाया करून लपुन बसण्यासाठी बरीच मोठी जागा सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत आहे. थोडक्यात पुणे शहरातील इतर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी कारवाया करायच्या आणि सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत जावुन लपुन बसायचे, एवढे मोठे क्षेत्रफळ सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडे उपलब्ध आहे. तरीही सिंहगड रोड पोलीस स्टेशनला गुन्हेगार डिटेक्ट करता येत नाही ही बाब हास्यास्पद म्हणावी लागेल. 

सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी –
सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील अर्धशतकी मोक्का व एमपीडीएचे गुन्हेगार असले तरी तडीपारांची संख्या मोठी आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशन पेक्षा इतर पोलीस स्टेशन हद्दीत कोंम्बिग ऑपरेशन करतांना, सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार जास्त संख्येने आढळुन येतात हे विशेष आहे.

गुन्हेगारी वाढविण्याचे पोसण्याचे सिंहगड रोड पोलीसांचे कर्तृत्व, अवैध धंदे व गैरकायदयाचा जबरी कारभार –
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कॅसिनोला बंदी केली आहे, परंतु निजामशाही व आदिलशाही सारखा कारभार असणाऱ्या सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत मात्र अवैध व गैरकायदयाच्या धंदयाला कुठल्याही प्रकारची बंदी नाही. सर्व प्रकारचे अवैध व गैर धंदे सुरू असल्याचे दिसून येते. नऱ्हे पोलीस चौकी व अभिरूची पोलीस चौकीच्या लगतच अवैध मटका व जुगार अड्डे वेगात सुरू आहेत. पोलीस स्टेशन व या दोन पोलीस चौक्यांना पाण्याच्या बॉटल्स, चहा, नाष्टा आणि कधी कधी जेवणही याच मटका जुगार अड्ड्यांकडून पुरविले जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात विशेष बाब म्हणजे, हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दुसऱ्या गुन्हेगारांच्याच गाड्या वापरल्या जातात अशीही चर्चा आहे. यासाठी विशेष पथकाने चौकशी करणे गरजेचे आहे.

नांदेड सिटी गेट व नवले ब्रिज येथे मटका व जुगाराचे अड्डे, तीन पत्ती क्लब सह ऑनलाईन लॉटरची दीड डझन अड्डे/ दुकाने कार्यरत आहेत. दिवसभर एक आकडी लॉटरी जुगारासाठी, जुगाऱ्यांची तोबा गर्दी असते. त्यातच गर्दुले, गुटखापंटरांची मांदीयाळी असते. त्यामुळे नवले ब्रीज येथे तर गुटखा खाऊन खाऊन, थुंकून, थुंकून सगळ्या भिंती रंगवलेल्या असल्याचे आढळुन येतील. नवले ब्रीज म्हणजे कोंडेचा ब्रीजअड्डा असे गणितच झाले आहे. एवढं कमी की काय म्हणून शासनाच्या देशी विदेशी दारूसोबतच तुकाईनगरात हातभट्टीचा धंदा जोरात सुरू आहे. 
जोडीला रघुभाई का वेश्याव्यवसाय रंगात आलेला आहे. दरम्यान नऱ्हे पोलीस चौकीच्या बाजुला असलेल्या मटका अड्ड्यावर कारवाई करा म्हणून अनेकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केले तरी कारवाई होत नसल्याची ओरड होत आहे. प्रत्येक धंदयावर दोन पाच वर्षापूर्वी भाई होण्यासाठी गुंडागर्दी करणारे व तडीपारी संपवून पुन्हा आलेले गुन्हेगारच अशा प्रकारच्या धंदयावर कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. थोडक्यात गुन्हेगारी वाढविणे आणि गुन्हेगारी पोसण्याचा एक कलमी निजामी पद्धतीचा कारभार सध्या सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत सुरू आहे. 

दलित बहुजन समाजातील तरूणांना गुन्हेगारीत अडकविले जात आहे-
सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर अभय महाजन सध्या कार्यरत आहेत. त्याच्या पूर्वी काय काय झाले व घडले होते ते पुणेकरांना चांगलेच ठाऊक आहे. सिंहगड हद्दीतील गुन्हेगारांचा मात्र, लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीत राडा करण्याची परंपरा मात्र खंडीत होत नाहीये. भारतीमध्ये राडा, सहकारनगरात राडा, पर्वतीत राडा, विश्रामबाग हद्दीत राडा, सगळे सिंहगडचे गुन्हेगार, परंतु त्यांच्या गुन्हेगारीची कार्यकक्षा मात्र पुणे शहर होत चालली असल्याचे दिसून येत आहे.

यात अनु. जाती, जमाती व ओबीसी जातीतील तरूण अधिक बळी पडत आहेत. त्यातच अनु. जातीतील बौद्ध, मातंग समाजातील तरूणांना अधिक संख्येने या गुन्हेगारीत ओढुन घेतले जात आहे. विशेष म्हणजे मराठा समाजातील तरूणांना बळी केले जात आहे. देशात संविधानाचा अंमल सुरू असला तरी सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत मात्र आजही निजामी पद्धतीचा कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील कारभारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्देवाने वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देत नसल्याचे दिसून आले आहे. 

त्यात मागील दोन आठवड्यांपासून पर्वती, सहकारनगर, स्वारगेट व भारती येथील गुन्हेगारी विषयक वृत्तांकन झाले असतांनाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आजही या ठिकाणचे गैरकायदयाची कामे वेगात सुरू आहेत. त्यामुळे यांच्या पाठीशी नेमके कोण आहे याचाही तपास होणे आवश्यक आहे. ड्रग्ज माफीया ललित पाटील प्रकरणांवरून तर पुणे शहरात खात्याविषयी शंका घेवून नाना तऱ्हेच्या चर्चा सुरू आहेत. सध्या नवरात्री व दिवाळी तोंडावर आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून परिस्थिती बदलणे आवश्यक ठरत आहे.