
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
भारतीय जनता पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुमित मलिक आणि सुवेझ हक यांची उलट तपासणी घेण्याची मागणी झाली आहे. 2018 रोजी हिंसाचार प्रकरणात ही तपासणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी ही मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर आता देवेंद्र फडणवीस यांची उलट तपासणी होणार का? याचा निर्णय आयोग घेणार आहे.
काय आहे प्रकरण-
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. या दिवशी झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता. तसेच दहा पोलिस सुद्धा जखमी झाले होते. त्यावेळी पुणे येथे झालेल्या एल्गार परिषद अन्? त्या परिषदेत झालेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे भीमा कोरेगावात हिंसाचार उसळल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणी राज्य सरकारने चौकशी आयोग नेमला आहे. न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी आयोगाकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. चौकशी आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचीही साक्ष नोंदवली आहे.
काय म्हणाले बाळासाहेब आंबेडकर-
कोरेगाव भीमा आयोगाचे कामकाज जुन्या पुणे जिल्हा परिषदेच्या इमारतीमधून सुरु आहे. या आयोगापुढे 24 जुलैला मी प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुमित मलिक आणि सुवेझ हक यांची उलट तपासणी घेण्याची मागणी करणार आहे. कोरेगाव भीमा येथील हिंसाचार हे देशाअंतर्गत गुप्तहेर संघटना आणि पोलिसांना आलेले अपयश असल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला.
शरद पवार यांची साक्ष का झाली होती-
भीमा कोरेगावमधील हिंसाचार संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळेच उसळला, असा आरोप शरद पवार यांनी केला होता. त्यामुळे चौकशी आयोगाने शरद पवार यांना समन्स बजावून त्यांची साक्ष घेतली. या प्रकरणी शरद पवार यांची साक्ष घ्यावी अशी मागणी वकील प्रदीप गावडे यांनी केली होती.