Friday, December 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेच्या सुरक्षा अधिकारी पदातही भ्रष्टाचार?

नितीन केंजळे व राकेश विटकर यांच्या खाबुगिरीला कुठेतरी लगाम घालण्याची 10 हजार कंत्राटी कामगारांची मागणी
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेचा आकृतीबंध हा भ्रष्टाचार व गैरव्यवहारांना निमंत्रण देणारा आहे. सेवा प्रवेश नियमावलीमध्ये अनुभव, शैक्षणिक पात्रता, अटी व शर्तींमध्ये कमालीचा भेदभाव करण्यात आला आहे. पदोन्नतीमध्ये देखील नियमबाह्य तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. थोडक्यात जो पैसे घेवून येईल त्याला पदभार देण्यासाठीच ह्या तरतुदी केल्या आहेत. केवळ शासन आणि मंजुर आकृतीबंधावर खापर फोडण्यापेक्षा त्यातील त्रुटी काढुन आकृतीबंध परिपूर्ण करणे आवश्यक ठरत आहे. तथापी जाणिवपूर्वक त्यात त्रुटी ठेवून, चुकीच्या आकृतीबंधाची गैरमार्गाने अंमलबजावणी सुरू आहे. सुरक्षा अधिकारी हे पद देखील भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेले आहे. यापर्वी देखील आम्ही कामगार विभाग, विधी विभागातील आकृतीबंधातील तरतुदींमध्ये कशी विसंगती आहे हे दाखवुन दिले आहे. सेवकांच्या मनांतही तेच आहे. त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

 पुणे महापालिकेतील सुरक्षा अधिकारी हे पद अत्यंत महत्त्वाचे असून, हे पद पोलीस प्रशासन व लष्करातील अधिकाऱ्यांना देण्यात यावे असे सेवा प्रवेश नियमावली 2014 मध्ये नमूद केलेले आहे. तरीदेखील पात्रता व अनुभवांमध्ये मनांप्रमाणे बदल करून उंची नसलेल्या, छाती नसलेल्या तसेच शैक्षणिक पात्रता व पोलीस आणि लष्करातील अनुभव नसलेल्या अधिकाऱ्यांना हे पद पुणे महापालिकेचे प्रशासक व आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी पदातील आर्थिक भ्रष्टाचार करून दिलेले असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत आहे.

सेवा प्रवेश नियमावली 2014 मध्ये सुरक्षा अधिकारी पदाची तरतूद
पुणे महापालिकेच्या आकृतीबंधात सुरक्षा अधिकारी हे पद वर्ग दोनचे असून नामनिर्देशनाने 25% व पदोन्नतीने 75 टक्के भरण्याची तरतुद आहे. सुरक्षा अधिकारी या मुद्द्याची तीन पदे असून त्या पदांवर बोगस पद्धतीने नितीन केंजळे व राकेट विटकर यांना नियुक्ती दिली आहे. दरम्यान तत्कालिन सुरक्षा अधिकारी संतोष पवार यांच्यावर अँटीकरप्शन विभागामार्फत कारवाई झाल्याने निलंबित झालेले आहेत.
नामनिर्देशन – 25% या पदावर, पदवीधर किंवा समक्ष अर्हता किंवा लष्कर अथवा निमलष्कर तसेच किमान उंची 165 सेंटीमीटर अशी ठेवण्यात आलेली आहे. वजन 50 किलोग्रॅम, छाती फुगवून 81 ते 86, चांगली दृष्टी असणे आवश्यक, प्रशासकीय कामाचा किमान वर्ग तीन मधील पदावरील पाच वर्षांचा अनुभव अशी नामनिर्देशनासाठी पात्रतेच्या अटी नमूद आहेत.

हे पद पदोन्नतीने 75 टक्के असून यात मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर, समकक्ष अर्हता, किमान शारीरिक पात्रता उंची 165 सेंटीमीटर, वजन 50 किलो, छाती 81 86 पर्यंत, चांगली दृष्टी आवश्यक, महापालिकेतील वर्ग तीन वरील पदावरील 10 वर्षांचा अनुभव, सुरक्षा विभागाकडे वर्ग तीन या पदावर किमान तीन वर्ष काम केलेचा अनुभव असल्यास प्राधान्य किंवा सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदावरील किमान तीन वर्षाचा अनुभव ह्या अटी व पात्रतेच्या निकष आहे.

पुणे महापालिका सुरक्षा अधिकारी सेवा प्रवेश नियमावली मधील त्रुटी-
1)सुरक्षा अधिकारी या पदासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे लष्कर, निमलष्कर अथवा पोलीस प्रशासनातील अधिकारी यांची नेमणूक करण्यात येणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांना या विषयाचे अवलोकन होते, भांडणे, मोर्चे, आंदोलने यांसारख्या ठिकाणी ते तात्काळ कारवाई करू शकतात.

2) तसेच लष्कर अथवा पोलिसांचा ड्रेस प्रभारी पदभार अथवा अतिरिक्त पदभार दिलेल्या असल्यानंतर परिधान करणे योग्य नाही. ड्रेस कोड किंवा वर्दीचा कायदा नमूद आहे. तरीही राकेश विटकर आणि नितीन केंजळे हे लष्कर, निमलष्कर अथवा पोलीस प्रशासनातील नसल्या नंतरही ड्रेस घालून फिरताना दिसत आहेत. हे चुकीचे आहे. ते बंद करण्यात यावे व यांच्यावर कारवाई करण्यात येणे आवश्यक ठरत आहे.

3) नामनिर्देशन यासाठी प्रशासकीय कामकाजाचा वर्ग 3 मधील 5 वर्षाचा वर्षाचा अनुभव तसेच सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदासाठी पदोन्नतीने तीन वर्षाचा अनुभव अपेक्षित आहे. म्हणजेच येथे अनुभवाची अट ही मनाप्रमाणे टाकण्यात आलेली आहे. तसेच महानगरपालिकेतील वर्ग तीन मधील पदावरील दहा वर्षांचा अनुभव असे नमूद आहे. तसेच सुरक्षा विभागाकडे वर्ग तीन या पदावर किमान तीन वर्षे काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य अशी तरतुद म्हणजे, येथे जाणीवपूर्वक सुरक्षा विभागाकडे वर्ग तीन या पदावर ज्यांनी यापूर्वी काम केलेले आहे त्याला वर्ग दोनच्या पदावर नेमणूक देण्यासाठी फक्त तीन वर्षाच्या अनुभवाची अट ठेवलेली आहे. व इतर बाहेरून येणारे सेवकांसाठी पाच वर्षाचे अनुभवची अट ठेवलेली आहे.

 येथे जाणिवपूर्वक अटी व शर्तींमध्ये बदल करण्यात आलेले आहे. तरी याच खात्यातील अनुभव का पाहिजे, असे विशेष काय काम आहे काय? विमानाचे विमानतंत्र एरोनॉटिकल सायन्स अथवा शिकवले जाते का? या पात्रता व योग्यता नसलेल्या अधिकाऱ्यांकडे किंवा वर्ग तीनच्या सेवकांकडून पहाटे उठून कुठली परेड करून घेतली जाते, रनिंग करून घेतली जाते किंवा स्पेशल काही ट्रेनिंग दिली जाते का त्याची माहिती घेण्यात यावी?

या प्रकारची खास/ स्पेशल सवलत का दिलेली आहे? वर्ग तीनच्या प्रशासकीय सेवेतील सेवकांना सुरक्षेचे कायदे अथवा सुरक्षा कशी करावी हे शिकवले जाते का अथवा बंदुकीचे, परेडचे, सुरक्षेचे व इतर बाबींचे नियोजन व नियंत्रण करण्याचे काम दिले जाते का अथवा फिल्डवर, ग्राउंडवर यांनी केलेला आहे का की मनांप्रमाणे अटी शर्ती टाकलेल्या आहेत? याचाही विचार होणे आवश्यक ठरत आहे.

सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदांमधील – भ्रष्टाचार
सहाय्यक सुरक्षा अधिकारी हे पद पदोन्नतीने 100 टक्के भरण्याची तरतुद आकृतीबंधामध्ये करण्यात आली आहे. यात पदवीधर व वरील सुरक्षा अधिकारी यांच्यासारखीच नामनिर्देशनाची पात्रता व सुरक्षेकडील जमादार, अतिरिक्त पदभार यासह कामकाजाचा पाच वर्ष अनुभव किंवा सुरक्षारक्षक पदावरील दहा वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या जीआर नुसार येथे धोका दिलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या जीआर मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, प्रभारी व अतिरिक्त पदभार असलेल्या कुठल्याही सेवकास त्या पदाचा अनुभव म्हणून ग्राह्य धरता येणार नाही व त्या अनुषंगाने त्याची कुणालाही सवलत मिळणार नाही अथवा पदोन्नतीसाठी तो प्रभारी अथवा अतिरिक्त पदभार धरता येणार नाही. तरीही सेवा प्रवेश नियमावली 2014 मध्ये सहाय्यक सुरक्षा अधिकारीसाठी ही अट टाकण्यात आलेली आहे. म्हणजेच सर्व भ्रष्टाचार हा जाणीवपूर्वक समजून महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध केलेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने यास मंजुरी दिलेली आहे. तेही चुकीचे असल्याचे दिसून येत आहे.

 त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास खात्याकडून मंजुरी मिळवित आहेत, त्यात आर्थिक भ्रष्टाचार करून, सर्वमनांप्रमाणे अटी शर्ती टाकलेले आहेत. येथे आपण पाहिल्यास सुरक्षा अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी यामध्ये कुठेही, कसलीही समकक्ष अर्हता अथवा अनुभव 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष अशा प्रकारे  मनांप्रमाणे अनुभवाची तरतुद नमूद केलेल्या असून सुरक्षा कार्यालयाकडे वर्ग तीनच्या क्लार्क पदावर काम करणाऱ्या सुरक्षा अधिकारी पदावर नेमणूक करण्याची तरतूद स्पष्टपणे करून दिलेली दिसत आहे.

पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागातील भ्रष्टाचार-
चार हजारावरून सोळाशे पन्नास झाले तरी कसे –

1) सुरक्षा विभागामध्ये मागील काही वर्षामध्ये सुमारे चार हजार ( 4000) सुरक्षा रक्षक काम करत होते. तरी आज रोजी 1650 (सोळाशे पन्नास) सुरक्षा रक्षक काम करत आहेत. म्हणजेच 2,350 (दोन हजार तीनशे पन्नास) सुरक्षा रक्षक हे कोठे काम करत होते, त्यांचा पगार कोणी दिला, म्हणजेच एकाच पॉईंटला चार ते पाच सुरक्षारक्षक काम करत होते. त्या सेवकांना अर्धाही पगार दिला नाही. म्हणजे 15,000/- (पंधरा हजार) पगारा प्रमाणे अंदाज धरल्यास प्रत्यक्षात सात हजार रुपयेही ( 7000 ) ही पगार दिला नाही व बोनसचा तर पत्ताच नाही. अनेक सेवकांना तीन ते चार महिने पगार देण्यात आलेला नाही. त्यापैकीच एक उदाहरणा मध्ये क्रिस्टल कंपनी.

बऱ्याबोलाने पैसे द्या नाहीतर लांब बदली करेन –
2) अनेक सुरक्षारक्षकांची बदली ही मनाप्रमाणे केली जाते. अनेक सुरक्षा रक्षक रात्रीचे कामावर येत नाही. स्मशानभूमी, पाण्याची टाकी, शाळा अशा ठिकाणी पॉईंट घेऊन तेथे कधीही हजर नसतात. तसेच रात्रपाळी घेऊन घरीच झोपतात असेही निदर्शनास आले आहे. तसेच यावर कोणाचेही नियंत्रण नाही. दर महिन्याला सुरक्षारक्षक ही सगळी वसुली केली जाते. ती वसुली राकेश विटकर व नितीन केंजळे यांना दिली जाते. राकेश विटकर व नितीन केंजळे यांचे कुणी ऐकणार नाही, त्यांना घरापासून दुरच्या ठिकाणी बदली केली जाते. तसेच लांब बदली केल्यानंतर पुन्हा त्यांना घराजवळ बदली पाहिजे असल्यास लाखो रुपये लाच द्यावी लागते. त्याशिवाय बदली होत नाही व मनांत नसतानाही सुरक्षारक्षकांना हे सर्व करावे लागत असल्याचे समोर आले आहे.

अधिकार नसतांना, नितीन केंजळे व राकेट विटकर कुणाच्या परवानगीने पीएसाआय दर्जाच्या अधिकाऱ्यांचा ड्रेस परिधान करतात-
3) पुणे महापालिकेतील कामगार अधिकारी व सुरक्षा अधिकारी नितीन केंजळे व राकेश विटकर हे लष्करी व पोलीस दलात काम केलेले नाहीत तरी देखील त्यांना सुरक्षा अधिकारी पदाचा पदभार दिलेला आहे. हे अतिशय चुकीचे व निंदनीय आहे. तसेच राकेश विटकर व नितीन केंजळे लष्करी अधिकारी व पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांसारखे वर्दी/ ड्रेस घालून फिरतात, ते देखील अतिशय चुकीचे आहेत. ड्रेस कोड कायदा असून लष्कराचा व पोलिसांचा ड्रेस परिधान करणे चुकीचे आहे.

खाजगी सुरक्षा रक्षकांना वेतन नाही, पीएफही नाही-
4) पुणे महापालिकेतील खाजगी सुरक्षा रक्षकांचा कुठलाही ईएसआय, ईपीएफ व किमान वेतन दिले जात नाही. कंत्राटी सुरक्षा रक्षकांची मनाला येईल तिथे व मनाला वाट्टेल तिथे बदली करतात, त्यांना कसेही राबवून घेतले जाते, वेठबिगारासारखे काम करवुन घेतले जात आहे. अनेक खाजगी सुरक्षा रक्षक महिलांचे लैंगिक शोषण केले जात असून लैंगिक शोषणाची तक्रार दिली असता ती घेतलीही जात नाही आज अशी अवस्था पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागाची झाली आहे.

सुरक्षा अधिकारी नितीन केंजळेंचा खुलआम भ्रष्टाचार – कामगार अधिकारी म्हणून कामगार विभागाला अभिप्राय देणे, सुरक्षा अधिकारी म्हणून उलट स्वतःच स्वतःला अभिप्राय देणे- म्हणजे पैसे खावुन- चित भी मेरी आणि पट भी मेरी-
5) पुणे महापालिकेतील कामगार कल्याण अधिकारी नितीन केंजळे हे अतिशय भ्रष्टाचारी अधिकारी असल्याचे समोर आले आहे. पुणे महापालिकेत कंत्राटी कामगारांच्या संख्या 10 हजारांपेक्षा अधिक असतांना, त्यांना कामगार कायदयानुसार, ईएसआ, ईपीएफ, किमान वेतन व इतर नियमांचे भत्ते दिले जात नाहीत. खाजगी संस्थेनेने अशा प्रकारचे कोणत्याही सवलती शासन नियमा प्रमाणे अदा केले नसतांनाही त्या सवलती दिल्याचे बनावट दाखले सुरक्षा एजन्सीला दिले जात आहेत.

 पुणे महापालिकेतील कामगार अधिकारी व  सुरक्षा विभागातील सुरक्षा अधिकारी म्हणून स्वतःची पैसे देऊन नेमणूक करून घेतलेली आहे. अनेक तक्रारी येऊन सुद्धा अतिरिक्त आयुक्त श्री. रवींद्र बिनवडे  व विक्रम कुमार आयुक्त यांनी त्यांची कुठलीही चौकशी केलेली नाही. अथवा नितीन केंजळे यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. तसेच नितीन केंजळे हे सुरक्षा विभागातून त्या पदाचे नियुक्त अधिकारी म्हणून फाईल पाठवतात व कंत्राटी कामगारांची, सुरक्षा रक्षकांची वेतनाची काटेकोरपणे तपासणी करून, चौकशी करून द्यावी  म्हणून कामगार कल्याण खात्याकडून स्वतःच कामगार कल्याण अधिकारी म्हणून, पुन्हा स्वतःच कुठल्याही ईएसआय, ईपीएफ, किमान वेतन, बोनस व इतर सुविधा दिलेल्या नसतानाही, स्वतःच पुन्हा सर्व सुविधा स्पष्टपणे दिलेले आहेत, असे खोटे दाखले देतात. या पद्धतीने सरावलेल्या गुन्हेगारासारखे प्रशासकीय कामकाज केंजळे करीत आहेत. तसेच कंत्राटी कामगारांची व सुरक्षा रक्षकांची फसवणूक करित आहेत.

या सर्वांच्या संगनमताने कंत्राटी कामगार व खाजगी सुरक्षा  रक्षक यांची पिळवणूक सुरू आहे. तरी देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही. याबाबत पुणे महापालिकेवर शेकडो आंदोलने झाली तरी, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार व रविंद्र बिनवडे मुग गिळून शांत आहेत. ठेकेदारांकडून मिळणारी मोठी रक्कम हेच तोंड बंद ठेवण्याचे मोठे कारण समोर आले आहे. 

केंजळे विटकरांचे महागुरू भ्रष्टाचारी शिवाजी दौंडकर-
5) शिवाजी दौंडकर हे सनियंत्रक असताना सुरक्षा विभागांमध्ये त्यांनी अनेक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला असून अनेक विभागांच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार केला आहे. सुरक्षा रक्षकांची कायम व कंत्राटी स्वरूपात नेमणूक करताना लाखो रुपये स्वीकारलेले असल्याचीही त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही मोठी चर्चा असते. तसेच पुणे महापालिकेत सहनियंत्रक हे पद आले कुठून, कोणी निर्माण केले, ते कुठल्या कायद्याने निर्माण झाले हे कोणालाही काही माहीत नाही. अगोदरचे अधिकारी हे अँटी करप्शन विभागामार्फत निलंबित झाल्यानंतर, शिवाजी दौंडकर सनियंत्रक झाले व त्यांनी सर्वात मोठा भ्रष्टाचार हा सुरक्षा विभागात केला. या भ्रष्टाचाराची खुप मोठी व्याप्ती आहे.