
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
वाढते शहरीकरण, वाढते नागरीकरण, विस्तारित होत चालेला सोशलमिडीया यामुळे नशाखोरीचे ट्रेंड दिवसेंदिवस बदलत चालले आहेत. महाराष्ट्र शासनाने राज्यात गुटखाबंदी केली असली तरीही शासन व पोलीस यांची नजर चुकवून, चोरट्या मार्गाने आजही गुटखा विक्री होत आहे. स्थानिक पोलीस स्टेशनसह इतर गुन्हे शाखांकडून कारवाया सुरू आहेत. त्यातच आता अंमली पदार्थ सेवन करण्याचा नवीन ट्रेंड निर्माण झाला आहे. अंमली पदार्थ विरोधी विभाग गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस स्टेशन यांनी कारवाया केल्या तरी सोशल मिडीया आणि ऑनलाईन मार्केटमुळे पोलीसांची नजर चुकवून चोरटी विक्री होत आहे. दंडात्मक कारवाई होत असली तरी सामाजिक जाणिवेतून जनजागृती होणे देखील तितकीच आवश्यकता आहे.
दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील खडक पोलीस स्टेशन यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा, कॉलेज सह चौका चौकामध्ये अंमली पदार्थ सेवनाने होणारे नुकसान यावर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी शुक्रवार पेठ येथील वाडीया नर्सिंग कॉलेज चे विद्यार्थी व खडक पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून, अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली आहे. खडक पोलीस स्टेशन यांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाची सर्व स्तरातून प्रशंसा व्यक्त होत आहे.