Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे पोलीसांकडून गुन्हेगारी कृत्यांसह हत्यारांचे नामांतर? नामांतर करून गुन्हेगारी कमी झाली असल्याचा बनाव…

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
कोयता गँगचा मुद्दा राज्य विधीमंडळात गाजल्यानंतर देखील संपूर्ण पुणे शहरात कोयता गँगचा उच्छाद वाढला होता. त्यामुळे पुणे पोलीसांनी सध्या नवीच शक्कल लढविली असल्याचे समोर आले आहे. थेटच हत्यांरांची नावे बदलण्यात आली असून त्यांचे नामांतर करण्यात आले आहे. तसेच गुन्ह्याच्या हकीकतामध्ये देखील बदल करण्यात आला आहे. तलवार, चाकु, पालघन, कोयता यांना आता एक लोखंडी हत्यार असे नामांतर करण्यात आले आहे तर मंगळसुत्र, सोनसाखळी चोरीबाबत आता गुन्ह्याच्या विवरणामध्ये बदल करून, एक वस्तु जबरी चोरी करून नेली आहे अशा प्रकारच्या नोंदी करून वृत्तपत्रांना प्रेस नोट सादर केली जात आहे. त्यामुळे पुणे पोलीसांनी गुन्हेगारी कृत्यांसह हत्यारांचे नामांतर केले आहे की काय अशी सध्या चर्चा आहे.


पुणे शहर पोलीस दलाचा पदभार नुतन पोलीस आयुक्तांनी घेतल्यानंतर, गुन्हेगारांची झाडाझडती सुरू झाली. पुणे शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच सराईत गुन्हेगार यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी ऑल ऑऊट व कोम्बिंग ऑपरेशन, गुन्हेगार चेकींग, गुन्हेगार आदान-प्रदान, दत्तक गुन्हेगार अशा योजना राबवुन गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवुन तसेच त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यात येत असला तरी देखील प्रत्येक कोम्बिंग ऑपरेशमध्ये शरिराविरूद्धचे व मालमत्तेविरूद्धचे शेकडोंनी गुन्हेगार मिळून येत आहेत. सर्वत्र पुणे शहर पोलीसांची चर्चा होत असल्याने शहर पोलीसांनी गुन्हेगारी कृत्यात व हत्यारांचे नामांतर केले असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान नामांतर करून मुळ समस्या जैसे थे अशाच स्वरूपाची आहे. त्यामुळे गुन्हेगारीच्या मुळापर्यंत जो पर्यंत पोहोचत नाही, तो पर्यंत ही गुन्हेगारी संपणार देखील नाही किंवा कमी देखील होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खाजगी सावकारी आणि फायनांशिअल कंपन्यांची वसुली करण्यासाठी ठेवलेले बहुतांश इसम, बांधकाम व्यावसायिक, लँड माफिया, रिअल इस्टेट यांचा शोध घेवून कारवाई होणे आवश्यक आहे.