Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील भाईगिरी जोरात, आधी कोयते, मग तलवारी आता तर कुऱ्हाडीच…

हातभट्टी क्रमांक 1 वर, मटका जुगार अड्डे दुसऱ्या क्रमांकावर, गुटखा-गांजा तस्करी तिसऱ्यावर तर देह व्यापार चौथ्यावर, कमालिची गुन्हेगारी वाढली तरीही सहकारनगर पोलीस गप्प

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत मोठ मोठ्या झोपडपट्टया असल्या किंवा पुरग्रस्तांच्या वसाहती असल्या तरी, जबरी गुन्हेगारीचा इतिहास नाही. पुण्यातील काही मोजक्या पोलीस स्टेशनला जबरी गुन्हेगारीचा इतिहास आहे, तसा तो सहकारनगर पोलीस स्टेशनला नाही. मात्र अलिकडच्या काळात कमालिची गुन्हेगारी वाढली आहे. दोन महिन्यांपूर्वी अण्णाभाऊ साठेनगर अरण्येश्वर मधील काही युवकांनी वनशिव वस्ती, तळजाई येथे येऊन राडा घातला, वाहनांची जाळपोळ केली, तर पुनः तळजाई वसाहतीतील तरुणांनी तिसऱ्या ठिकाणी जावून राडा घातला. दोन्हीही टोळक्यांवर मागाहून मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु तरीही गुन्हेगारी वेगाने वाढत आहे. काल-परवा गणेश विसर्जन मिरवणूकीत राडा झाला. एकमेकांना दगड, वीटांसह हाती लागेल त्या हत्यांरांनी एकमेकांना ठोकुन काढले आहे. तर त्याचे प्रतिउत्तर म्हणून पुनः राज चंडालिया या 17 वर्षीय युवकाची बोटे कुऱ्हाडीने तोडण्यात आली. तरी देखील सहकारनगर पोलीस कारवाईच्या मुडमध्ये नाहीत.

सध्या सहकारनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी सुरेंद्र माळाळे हे कार्यरत आहेत. त्यांच्या पूर्वी साळगावकर होते. त्यांच्याही कार्यकाळात अशीच परिस्थिती होती. आत्ता त्यांची बदली झाल्यानंतर देखील सहकारनगर पोलीस स्टेशनमधील गुन्हेगारी मध्ये काडीचाही फरक पडला नाही. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत सात लाख लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. त्यातच सहकारनगर पोलीस स्टेशनकडे तीन वायरलेस मोबाईल व तीन बिट मार्शल कार्यरत आहेत. त्यातच दोनच पोलीस चौक्या कार्यरत आहेत. त्यात धनकवडी पोलीस चौकी व सहकारनगर पोलीस चौकीचा समावेश आहे. सात लाख लोकसंख्येसाठी निदान प्रत्येकी लाखाला एक या प्रमाणे आणखी पाच पोलीस चौक्यांची आवश्यता आहे. 
दरम्यान इंदिरा गांधी सोसायटी येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते व सोशल नवपरिवर्तन संघ महाराष्ट्रचे अध्यक्ष अमोल विजय लोंढे यांनी पोलीस चौक्यांसाठी मागणीचा अर्ज सादर केला असल्याचे समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी असतांना देखील पोलीस चौक्यांची संख्या वाढविली जात नाही. मग सहकारनगर पोलीस, नागरीक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीचे निवेदन हे पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचविणे आणि त्यांनतर प्रशासकीय कार्यवाही करण्याची जबाबदारी आहे. परंतु त्याकडे कुणीच लक्ष देत नाहीत. 

मग सहकारनगर पोलीस करतात काय…
तळजाई वसाहतीपासून ते शंकर महाराज झोपडपट्टी ते पुढे धनकवडी पर्यंत हातभट्टीच्या धंदयाना उधान आले आहे. देशी विदेशी दारूची तस्करी हा तर रोजचा भाग झाला आहे. हातभट्टीचे फुगे कधीही येथे मिळतात. मटका जुगार अड्ड्यांना येथे ऊत आला आहे. एवढच कशाला, पुणे सातारा रोडवरील मोरे वस्तीत धंदा सुरू आहे. इथपासून ते के.के. मार्केट व पुढे धनकवडी येथे मटका जुगार अड्डे, ऑनलाईन लॉटरीचा सगळीकडे सुकाळ झाला आहे.

एवढेच कमी की काय म्हणून के.के. मार्केट व बालाजीनगरात मसाज पार्लरच्या नावाखाली देहव्यापार तेजित चालला आहे. ह्याच्या वसुलीला पोलीस कमी पडतात की काय म्हणून सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पान टपऱ्या व किराणा माल दुकानातून गुटख्याची तस्करी/ विक्री होते. त्यासाठी पुनः झिरो पोलीसांची नियुक्ती केल्याचे समोर आले आहे. काही नवशिक्या पोलीसांना देखील या वसुलीच्या कामावर जुंपले असल्याचे समोर आले आहे. 

काही पान टपऱ्यांतून गांजाची पुडी देखील मिळत आहे. आता यातील मटका जुगार अड्डे व क्लब सह मसाज पार्लर मध्ये थेट पोलीसांची भागीदारी असल्याचे समोर आले आहे. मागील एक वर्षापूर्वी धनकवडी येथील मटका जुगार अड्डा क्लब वर कारवाई केल्यानंतर हा धंदा पोलीसाचा असल्याचे समोर आले आहे, तर बालाजीनगर व के.के. मार्केट जवळील धंदा हा लाईन बॉयचा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीसांना ह्यात वेळ मिळत नाही, त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणार तरी कुठून हा प्रश्नही उपस्थित होत आहे. 

सहकारनगरात बहुजन समाजाची संख्या अधिक –
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत पुरग्रस्त, दुष्काळग्रस्तांची मोठी संख्या आहे. 1962 चा पुण्याला आलेला पुर आणि माहे 1972 साली राज्यात पडलेला दुष्काळ यामुळे या भागात ही संख्या अधिक आहे. त्यामुळे कालपर्यंत गुन्हेगारी काय असते हे माहिती नव्हते. परंतु मटका जुगार अड्डे, हातभट्टीचे धंदे, गुटखा,गांजाची तस्करी/विक्री, देहव्यापार, गुंठेवारीमुळे बिल्डरांचे उखळ पांढरे झाले, याधंदयामुळे अंतर्गत वाद निर्माण होत आहेत.

प्रत्येक धंदयावर गुन्हेगार युवक कामावर ठेवण्यात येतात. त्यामुळे सर्वत्र गुन्हेगारीत आणखी वाढ होत आहे. दरम्यान सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत अनुसूचित जातीची लोकसंख्या अधिक संख्येने आहे. त्यातही बौद्ध व मातंग समाजाची लोकसंख्या अधिक आहे. अतिशय कष्टाळू असलेल्या या समाजातील युवकांना गुन्हेगारीत ढकलण्यात येत आहे. त्यामुळे सहकारनगर पोलीसांनी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.