Sunday, April 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सोन्यापेक्षा महागड्या प्लॅटिनमच्या खाणींसाठी मणिपूरमध्ये, मोदी-अदाणींचं नाव घेत बाळासाहेब आंबेडकरांचा गौप्यस्फोट

नॅशनल फोरम/औरंगाबाद/दि/ प्रतिनिधी/
मागील तीन महिन्याहून अधिक काळापासून भारताचं ईशान्यकडील राज्य मणिपूमध्ये जातीय हिंसाचार उफाळला आहे. दररोज हिंसाचाराच्या नवनवीन घटना समोर येत आहेत. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. तर हजारो कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावरून मणिपूरमध्ये हिंसाचार होत असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मणिपूरमध्ये सोन्यापेक्षा महागडा धातू असणाऱ्या प्लॅटिनमची खाण सापडली आहे. या खाणीचं उत्खनन करण्याचं कंत्राट पंतप्रधान मोदी यांचा जवळचा मित्र गौतम अदाणींना देण्यात आलं आहे. पण मणिपूरमधील आदिवासी हिल काऊन्सिलनं याला विरोध केला आहे. यामुळे मणिपूरमध्ये हिंसाचार घडवला जात आहे, असा खळबळजनक आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला. ते औरंगाबाद येथे जाहीरसभेत बोलत होते.


बाळासाहेब आंबेडकर भाषणात म्हणाले, “सध्याचं केंद्र सरकार खनिज माफियांना बळी पडलं आहे. मागील काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये कुकी आदिवासी समुदायावर अत्याचार होत आहे. कारण मणिपूरमध्ये सोन्यापेक्षा महागडा असणारा प्लॅटिनम धातू सापडला आहे. कुकी समुदाय वास्तव्यास असलेल्या परिसरात ही प्लॅटिनमची खाण सापडली आहे. सरकारने या खाणीतून उत्खनन करण्याचे अधिकार नरेंद्र मोदींच्या अत्यंत जवळच्या मित्राला म्हणजेच गौतम अदाणींना दिले आहेत. नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी 1968 सालापासून लंगोटी यार आहेत. दोघांवर 1968 साली एक गुन्हा दाखल झाला होता. त्याचा अजून निकाल लागलेला नाही. दोघं लंगोटी यार असल्यामुळे सरकारने अदाणींना खनिज उत्खनन करण्याचे अधिकार दिले आहेत.”

ते पुढे म्हणाले, “पण संबंधित भागात खनिज उत्खनन करायचं की नाही, याचे अधिकार मणिपूर विधानसभेला नाहीत. तो अधिकार तिथे असणाऱ्या ‘आदिवासी हिल काऊन्सिल'ला आहेत. त्या आदिवासी हिल काऊन्सिलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलं की, या खाणींचं उत्खनन भारत सरकार करणार असेल तर आम्ही परवानगी देतो. पण खासगी कंपनी उत्खनन करणार असेल तर आम्ही परवानगी देणार नाही. ही देशाची संपत्ती आहे, त्यामुळे देशाच्या उपयोगी आली पाहिजे. या ‘आदिवासी हिल काऊन्सिल'मध्ये कुकी समुदायाची संख्या जास्त असल्यामुळे त्यांनी खनिज उत्खननाची परवानगी नाकारली.” “परवानगी नाकारल्यामुळे त्यांनी (सरकारने) आसाम-मणिपूरच्या सीमेवर राहणाऱ्या ‘मैतेई' नावाच्या हिंदू समाजाला आदिवासी जमातीचा दर्जा दिला. आणि कुकी आणि मैतेईमध्ये वाद लावून दिला. त्यानंतर जाळपोळ करायला सुरुवात केली. येथे जंगलामधील संपत्तीचं वनस्पतींचं, पाण्याचं आणि खनिजांचं संरक्षण तिथे राहणारा माणूसच करू शकतो. आदिवासीच करू शकतो,” असंही बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं.

दरम्यान खाजगी वृत्तवाहिनीशी बोलतांना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, “मणिपूरमधील हिंसाचार गौतम अदाणींसाठी घडवला जातोय, असा माझा आरोप आहे. मणिपूरमधील खनिजांवर आदिवासींचा ताबा आहे. मागील सहा महिन्यात मैतेई समुदायाने आरक्षणाची मागणी केली, अशी एकही बातमी समोर आली नव्हती. कुठल्याच वर्तमानपत्रात अशी बातमी वाचली नाही. मग केंद्र सरकारने अचानकपणे मैतेई समुदायाला आदिवासी म्हणून आरक्षण देण्याचं का घोषित केलं?”

“संविधानातील सहाव्या परिशिष्टानुसार, आदिवासी समुदाय वास्तव्यास असलेल्या प्रदेशात ‘आदिवासी काऊन्सिल' असतात. त्या परिसरात काहीही करायचं असेल तर आदिवासी काऊन्सिलची परवानगी आवश्यक असते. असं असताना मोदी सरकारने मणिपूरमधील खाणी अदाणींना किंवा इतर उद्योग समूहाला दिल्या आहे. पण आदिवासी काऊन्सिल हे मान्य करत नाही. त्यामुळे त्यांनी हिंसाचार घडवला, अशी परिस्थिती आहे. यावर मोदींनी बोलावं”, अशी मागणीही बाळासाहेब आंबेडकरांनी केली.