Friday, December 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महानगरपालिकेत मागासवर्गीयांच्या पदोन्नतीच्या आरक्षित पदांवर खुल्या गटातील उमेदवारांची नियुक्ती, पुणे महापालिकेत 2018 पासून रोस्टर तपासून घेतलेच नाही

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेमध्ये मागासवर्गीयांच्या आरक्षित पदांवर खुलेआमपणे खुल्या संवर्गातील सेवकांच्या धडाधड नियुक्त्या केल्या जात असल्याची बाब दिसून आलेली आहे. दरम्यान पुणे महानगरपालिकेने 2018 पासून आज 2023 या कालावधीत सर्व पदांचे रोस्टर विभागीय आयुक्त कार्यालय मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणे आवश्यक असतांना देखील ते तपासून घेण्यात आली नसल्याची बाबही समोर आली आहे. दरम्यान शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी दरवर्षी मागासवर्गीयांना देण्यात येणारी पदोन्नती व पदस्थापनेमध्ये रोस्टर व बिंदू नामावली प्रमाणे तपासणी व नियुक्त्या करण्याचा शासन निर्णय असताना देखील पुणे महानगरपालिकेने 2018 पासून रोस्टर तपासणी केली नसल्याने जाणीवपूर्वक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्ग (अबकड), विशेष मागास प्रवर्ग यांच्या आरक्षित असलेल्या पदोन्नतीच्या जागांवर खुल्या संवर्गातील सेवकांच्या नियुक्ती करण्यात आल्या असल्याची बाब उघड झाली आहे.

 पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील अभियांत्रिकी संवर्गातील शाखा अभियंता (स्थापत्य) वर्ग दोन या पदावरून उपअभियंता (स्थापत्य) वर्ग दोन या पदावर पदोन्नतीने नियुक्ती देणे बाबतचे काही दस्तऐवज हाती लागलेले आहेत. यामध्ये पुणे महानगरपालिकेकडे अभियांत्रिकी सेवा श्रेणी 2 उपअभियंता (स्थापत्य) या पदावर 75 टक्के पदे पदोन्नतीने पदे भरण्याबाबत पुणे महापालिकेच्या आकृतीबंधामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार माहे 2022 मध्ये उपअभियंता (स्थापत्य) यातील रिक्त पदांचा तपशील पाहिला असता, अनुसूचित जाती पदोन्नतीची 18 पदे असताना, कार्यरत पदांवर केवळ 5  सेवक आहेत. अनुसूचित जमाती 10 जागांपैकी सहा जागांवर कर्मचारी कार्यरत असून चार जागा पदोन्नतीच्या रिक्त आहेत. अनुसूचित जातीच्या 18 पैकी पाच सेवक कार्यरत असून 13 जागा रिक्त आहेत. विमुक्त जाती अ एकूण 4 पदे असून त्यातील केवळ 1 पद भरण्यात आले असून पदोन्नतीची 3 पदे रिक्त आहेत. भटक्या जमाती ब एकूण 4 पदे असून त्यापैकी 1 पद भरले आहे. पदोन्नतीच्या आरक्षणाची तीन पदे रिक्त आहेत. भटक्या जमाती क मध्ये पदोन्नतीची 5  पदे असून 4 पदे भरण्यात आले असून 1 पद रिक्त आहे. भटक्या जमाती ड यातील 3 पदे असून पैकी दोन पदे भरण्यात आले असून आरक्षणाचे एक पद रिक्त आहे. विशेष मागास प्रवर्गापैकी तीन पैकी एक पद भरले असून दोन पदे रिक्त आहेत.

 खुल्या संवर्गात पदोन्नतीची एकूण 96 जागा पदे असून त्यावर सुमारे 118 खुल्या संवर्गातील सेवकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे सुमारे 23 खुल्या संवर्गातील सेवकांच्या जास्त जागा भरल्या आहेत, त्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिका जाणीवपूर्वक मागासवर्गीय सेवकांना पदोन्नती देण्यात आडकाठी आणत असून 2018 पासून ते आजपर्यंत पुणे महानगरपालिकेने रोस्टर तपासणी केली नसल्याचे दिसून येत आहे.

 महाराष्ट्र विधिमंडळाकडील अनुसूचित जाती कल्याण समिती, अनुसूचित जनजाती कल्याण समिती आदि सर्व समित्यांनी पुणे महापालिकेच्या भेटीमध्ये मागासवर्गीयांचा अनुशेष, रिक्त पदे, पदोन्नतीची रिक्त पदांची माहिती घेत असतांना, पुणे महापालिकेकडून मागासवर्गीयांच्या अनुशेषाबाबत आजपर्यंत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती समितीला सादर केली असल्याची बाब देखील 2012-13 मधील अनुसूचित जाती कल्याण समितीच्या भेटी वेळेस मी स्वतःच या समितीला पुराव्यानिशी सादर केलेली होती.
 आज 2023 मध्ये देखील पुणे महानगरपालिकेमध्ये मागासवर्गीयांचा अनुशेष भरला जात नाही. पदोन्नतीची पदे भरली जात नाहीत. जाणीवपूर्वक मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर आकसापोटी अन्याय केला जात असल्याची बाब देखील समोर आलेली आहे. याबाबत पुणे महापालिकेतील सर्व कर्मचारी संघटनांनी पुणे महापालिकेचे आयुक्त व सामान्य प्रशासन यांना जाब विचारण्याची हिंम्मत ठेवावी. त्यासाठी पुरोगामी चळवळीतील संघटना तुमच्या पाठीशी उभ्या राहतील असा विश्वास व्यक्त करीत आहोत.