Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनच्या नावाने स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जुगाराचा क्लब

एक पोलीस स्टेशन 2 पोलीस चौक्या, एक एस.टी.स्टँड अन्‌‍ खंडीभर मटक्याचे अड्डे -जोडीला ठेवले 3 जुगाराचे क्लब
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
जुन्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कुण्या एका इसमाने बादशहा औरंगजेबाचे स्टेटस मोबाईलवर ठेवल्याने, छत्रपती संभाजी नगर (जुने औरंगाबाद) जिल्ह्यात दंगल पेटली, त्याचे लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले. त्यात अहमदनगरसह कोल्हापुरात देखील दंगली पेटल्या. पुढे बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र पेटविणाऱ्यांविरूद्ध रणशिंग फुंकले. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन सर्वांना शांततेचे आवाहन केले. तेंव्हा कुठे दंगली शांत झाल्या. परंतु पोलीसांनी महाराष्ट्र पेटविणाऱ्यांविरूद्ध कुठेही कारवाई केली नाही. आज पुणे शहरातील स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतही कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनचे स्टेटस ठेवून लाईन बॉयच्या नावाने जुगाराचा क्लब मागील एकदीड महिन्यांपासून सुरू आहे. तरी देखील पुणे पोलीस कारवाई करीत नाहीत. एवढेच नव्हे तर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून कळविले तरी देखील आजपर्यंत कारवाई होत नाहीये. अधिक माहिती घेतली असता, जुगाराचा क्बल सुरू करणाऱ्यांपैकी एकही मुस्लिम नाही, तरी देखील अंडरवर्ल्ड डॉनचे स्टेटस ठेवले आहे, तसेच क्लब चालविणाऱ्यांपैकी एकाही पोलीसाचा मुलगा नाही तरी देखील लाईन बॉय म्हणून मोबाईल स्टेटस ठेवले आहे. त्यामुळे ह्या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून स्वारगेट पोलीस स्टेशनचे जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून स्वारगेट पोलीस स्टेशन व पोलीस लाईनच्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेला जुगाराचा क्लब व खंडीभर सुरू असलेले मटक्याचे अड्डे तातडीने बंद करण्याची मागणी होत आहे.

स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सध्या सुनील झावरे कार्यरत असून, त्यांच्या अंतर्गत एकुण दोन पोलीस चौक्या कार्यरत आहेत. यात नेहरू स्टेडीयम पोलीस चौकी व महर्षिनगर पोलीस चौकीचा समावेश आहे. मार्केटयार्डातील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते स्वारगेट एस.टी. स्टँडचा संपूर्ण भाग स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये मोडतो. एकुण चार लाख लोकसंख्येवर स्वारगेट पोलीसांचे नियंत्रण असले तरी स्वारगेट एस.टी. स्टँड व स्वारगेट चौकातून दरदिवशी सुमारे दोन लाखापेक्षा अधिक प्रवासी ये- जा करीत असतात. थोडक्यात स्वारगेट पोलीस स्टेशनची लोकसंख्या चार लाख नसुन ती सहा लाख अशीच गणन करायला हवी. 

तत्कालिन काळातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक दारायस इराणी ते सध्या कार्यरत असलेले सपोआ सतीश गोवेकर यांच्यापर्यंत तसेच डी.वाय. पाटील, शामराव धुळूबुळू यांच्यापासून ते सध्या कार्यरत असलेले झावरे यांच्यापर्यंत कामकाजाची पद्धत पाहिली आहे. कुण्या एकेकाळी अफाट क्षेत्रफळ असलेल्या स्वारगेट पोलीस स्टेशनचा कारभार आणि सध्या सुरू असलेल्या कारभारात प्रचंड फरक आहे. जनत तीच आहे, परंतु अधिकारी मात्र बदलले आहे. मानसिकतेत भयावह बदल आहेत. 

स्वारगेट पोलीस स्टेशन लगत असलेला क्लब -डॉनचा की लाईन बॉयचा –
स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेला जुगाराचा क्लब हा सुमारे 18 ते 24 तास सुरू असतो. गणेशोत्सवाच्या काळात तर जुगाऱ्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या असे ऐकिवात आहे. दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशन लगत सुरू असलेला जुगाराचा क्लब सुरू करणाऱ्यांपैकी एकही मुस्लिम व्यक्ती नसल्याचे समजते तरी देखील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गुन्हेगाराचा फोटो कसा, तसेच त्या पाच इसमांपैकी एकही पोलीसाचा मुलगा नाही तरी स्टेटसवर लाईनबॉय हे कशासाठी ठेवले आहे, त्यामुळे ह्या सर्व प्रकाराची देखील कसुन चौकशी होणे आवश्यक आहे.

स्वारगेट पोलीस स्टेशन आणि 15 मटक्यासह 2 जुगाराचे क्बल-
पोलीस कारवाई करून करून, ते कुठपर्यंत करणार…. कुठे कुठे करणार…. त्यातच एका मटका अड्डयावर कारवाई झाली तर इतर 14 धंदे तर सुरूच राहणार आहेत. एका क्लबवर कारवाई केली तरी दुसरा सुरूच राहणार आहे. त्यामुळे एकाच इसमाने सुमारे 15 मटक्याच्या अड्डयासह सुमारे 2 जुगारचे क्लब सुरू केले आहेत. स्वारगेट पोलीस स्टेशनच्या मोक्याच्या ठिकाणी (मेजर लोकेशन) मटका व जुगाराचे क्लब सुरू आहेत. तरी देखील जुगाराच्या मालकावर कारवाई केली जात नाही. एका एका धंदयावर कारवाईची पोलीस नौंटकी होते, मटका जुगार अड्डयावरील पंटर, रायटरवर कारवाई होते. परंतु मुळ मालकावर मात्र कधीच कारवाई होत नाही. मुळ मालकावर कारवाई करणारे एकच सुपर हिरो होते, ते म्हणजे सामाजिक सुरक्षा विभागाचे तत्कालिन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक….. त्यांच्या आधी आणि त्यांच्या नंतरही मटका जुगार अड्डयाच्या मुळ मालकाला कारवाई किंवा अटक केली नाही. म्हणजे पोलीस कारवाईची सपशेल नौटंकी होते हेच खरे वास्तव आहे.
संपूर्ण स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जुगाराचे क्लब सुरू आहेत. तरी देखील कारवाई होत नाहीये. म्हणजे स्वारगेट पोलीसांच्या सौजन्याने हे धंदे सुरू आहेत काय, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

कर्ज हप्त्यांची वसुली करणारे खाजगी सावकारांची पिलावळ-
मटका जुगार अड्डयांचे जाळे इथपर्यंत गैरकायदयाची मंडळी स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत आहेत असे नाही. तर खाजगी सावकारी करणारे देखील अधिक संख्येने आहेत. यात खाजगी सावकार आणि फायनान्स कंपन्यांची सावकारी देखील वेगात सुरू आहे. या दोन्ही सावकारांचा हप्ता थकला की, या भागातील वसुलीचे एजंट हातात कोयते घेवून बाहेर निघालेच म्हणून समजा. पोलीसात तक्रार नोंदवायला गेले तरी, तुम्ही फायनान्सं कंपन्यांच्या, सावकाराच्या कागदपत्रांवर सह्या करतांना, डोळे झाकुन सह्या केल्या होत्या काय असेही प्रश्न विचारून, नागरीकांची तक्रार नोंदवून घेतली जात नाही असे अनुभव आहे. परंतु दुसऱ्या बाजुने मात्र नागरीक तक्रारी करीत नाहीत म्हणून खाजगी सावकारांवर कारवाई करता येत नसल्याचे कारण पोलीसांकडून पुढे केले जात आहे. त्यामुळेच स्वतंत्र भारतात नागरीकांची अधिक पिळवणूक होत आहे, तर दुसऱ्या बाजुला खाजगी सावकारांच्या वसुलीच्या एजंटला बळ मिळत आहे. त्यांचे गुन्हे करण्याचे मनोधैर्य वाढत आहे. त्यामुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे तरी कुठे हा प्रश्नही पुढे निर्माण होत आहे.

स्वारगेट पोलीस स्टेशन यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक आरोपी व गुन्हेगार हे अनु. जाती व जमातीचे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ह्या समाजाला अधिक गुन्हेगार करण्याचे प्रकार समोर येत आहेत. इजी मनी अर्थात विनाकष्टाचा मुबलक पैसा आणि चंगळवाद हे कारण असले तरी हल्ली सर्वांनाच विनाकष्टाचे पैसे अधिक आवडतात. त्यामुळे त्यात एस.सी, एस.टी.वरच अधिक गुन्हे का दाखल होत आहेत याचाही विचार होणे आवश्यक आहे. खाजगी सावकारी, अंमली पदार्थांची तस्करी, फायनान्स कंपन्या त्यातही मटका जुगार अड्डे, गुटखा तस्करी, महिला मुलींची तस्करी अशा प्रकारे गैरकायदयाचे काम करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई केल्यास, नवीन गुन्हेगार तयारच होणार नाहीत. परंतु पोलीस गैरकायदयाचे धंदे करणाऱ्या मुळ मालकांवर कारवाई करीत नाहीत, त्यामुळेच नवीन गुन्हेगार अधिक वाढत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेले बेकायदेशिर व गैरकायदयाचे धंदे तातडीने बंद करून अवैध धंदे चालविणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.