Wednesday, November 13 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

दलित-मुस्लिम समाजाने आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी, धर्मनिरपेक्षतेचा ठेका आम्हीच घेतला नाही!

धर्मनिरपेक्षतेचा ठेका आम्हीच घेतला नाही, धर्मनिरपेक्ष म्हणून ज्यांना मतदान केले, ते भाजपा शिवसेनेसोबत गेले. आपल्या उमेदवाराला दिलेले मत वाया जात नाही, समाजाची एकजुट दाखविल्यास, प्रस्थापित पक्षही आपल्या पायाशी येतील…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
राज्यातील काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी आणि भाजपा प्रणित महायुतीतील सर्वच राजकीय पक्ष हे केवळ एकाच जातीचे आहेत. वर्षानुवर्षे तेच आमदार, तेच खासदार होतात. कधी ह्या पक्षात तर कधी त्या पक्षात अशा कोलांटउड्या मारून कायम सत्तेत राहण्याची जादू करून दाखवित असतात. प्रत्येक निवडणूकीत दलित व मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना कधीच उमेदवारी दिली जात नाही, तसेच या समाजातील मतदारांना कधीच विश्वासात घेतले जात नाही. केवळ जाती जाती व धर्माधर्मात भांडण लावले की यांचे काम झाले. भितीपोटी हा समाजा एकतर काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीतील पक्षांना मतदान करतो नाहीतर भाजपा प्रणित महायुतीतील पक्षांना मतदान करतो. आलटून पालटून हेच सत्तेवर येतात. मतदारांना कधीच विचार करीत नाहीत. निवडणूका आल्या की, जाती आणि धर्मातील वाद निर्माण केले जातात. परंतु सत्तेत असतांना मागील 15 वर्षात काय विकास कामे केली, बेरोजगारी व महागाई नियंत्रीत ठेवण्यासाठी कोणत्या उपाय योजना केल्या, शिक्षण आणि आरोग्य, हॉस्पीटल यासाठी कोणते प्रयत्न केले या विषयावर कधीच चर्चा होत नाही. जातीधर्मात भांडण लावुन, फुकटात मतदान घेण्याची काँग्रेस व भाजपा चे एकच मिशन आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. त्यामुळे दलितमुस्लिम समाजातील मतदारांनी आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची सवय ठेवावी असे आवाहन रिपब्लिकन फेडरेशनचे अध्यक्ष अनिरूद्ध चव्हाण यांनी केले आहे. येथील मुस्लिम समाजातील अपक्ष उमेदवार अश्पाक मोमीन यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

मराठा आणि ब्राम्हणांची मते कधीच फुटत नाहीत, मग आमच्याच मतांमध्ये फुट का पडते –
राज्यातील काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे गट हे पक्ष एकट्या मराठा समाजाचे आहेत. भाजपा तर ब्राह्मणांशिवाय अपूर्ण आहे. त्या समाजाची मते कधीच फुटत नाहीत. हा समाज केवळ त्यांच्याच पक्षातील उमेदवाराला मतदान करतात. त्यांच्या त्यांच्या पक्षातील उमेदवार लायकीचा नसला तरी त्याला मतदान करतात, वास्तविक पाहता दलितमुस्लिम समाजाने ब्राह्मण व मराठा समाजाकडून हे शिकुन घेतले पाहिजे. परंतु आपण ते कधीच समजुन घेत नाही. आपल्या समाजातील होतकरू उमेदवार निवडणूकीत उभे राहिल्यानंतर, त्याच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा हा समाज, प्रस्थापित पक्षाने लावलेल्या भांडणात उडी मारतो. भाजपाने एनआरसीचा मुद्दा काढायचा, बटेंगो तो कटेंगे असा नारा दयायचा आणि दुसऱ्या बाजुने लगेच काँग्रेसवाले दलितांना घाबरवुन टाकतात. परंतु जेंव्हा राज्यात हजरत मुहमंद पैंगबर हे बील आणण्यात आल्यानंतर, सगळ्याच पक्षाचे आमदार मुग गिळुन गप्प होते. केंद्र सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणल्यानंतर ह्याच काँग्रेसने त्याला पाठींबा दिला होता हे लक्षात घ्यावे लागेल.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमध्ये क्रिमिलेअर व उपवर्गीकरणाचा निकाल दिला आहे. काँग्रेस शासित राज्यात ह्याच सुप्रिम कोर्टाची अंमलबजावणी सुरू करून दलितामधील वेगवेगळ्या जाती व आदिवासी मधील वेगवेगळ्या जाती जाती मध्ये भांडणे लावण्यात आली. आपल्यात भांडणे लावुन हेच पक्ष मागील 70 वर्ष सत्तेत आहेत. त्यामुळे आपण कधी जागे होणार आहोत असाही सवाल अनिरूद्ध चव्हाण यांनी केला आहे.

आम्ही आपल्या उमेदवारावर अविश्वास का दाखवावा –
भारतीय जनता पार्टीतील 60 टक्के आमदार खासदार हे पूर्वीच्या काँग्रेस मधीलच आहेत हे त्यांच्या नावानीशी पहा. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी व दोन्ही शिवसेनेतील सर्व आमदार, खासदार हे एकमेकांचे नातेवाईक व सगेसोयरे आहेत. त्यांचे हजार दोन हजार कोटींचे साखर कारखाने, सहकारी सुतगिरण्या, मोठ मोठ्या शिक्षण संस्था, सहकारी बँका, सहकारी पतपेढ्या, मेडिकल कॉलेज, मोठ मोठी हॉस्पीटल, मोठ मोठी वृत्तपत्रे व टिव्ही चॅनेल यामध्ये हजार कोटी/ कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा एवढा मोठा पैसा यांच्याकडे कुठून आला, याची कधी चौकशी झाली आहे काय…
जर दलित, आदिवासी, ओबीसी व मुस्लिम समाजातील उमेदवार निवडूण आले तर हेच प्रथम आमची चौकशी करतील. त्या भितीपोटी हे प्रस्थापित पक्ष दलित, आदिवासी, ओबीसी व मुस्लिम समाजात जाती जाती व धर्मा धर्मात भांडण लावुन देत आहेत. त्यामुळे प्रस्थापित पक्ष आम्हाला उमेदवारी देणार नाहीत. काँग्रेस मध्ये आज 25/30 वर्षांपासून जे दलित, मुस्लिम कार्यकर्ते व पदाधिकारी काम करीत आहेत, त्यांना साधी महापालिकेची देखील उमेदवारी दिली जात नाही. आमदारकी व खासदारकी तर दूरच राहिली. त्यामुळे धाडस करून आपल्या समाजातील उमेदवार जर निवडणूकीला उभे राहत असेल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. तुमचे मत कधीच वाया जात नाही. धर्मनिरपेक्षतेचा आम्हीच ठेका घेतला नाही. आजपर्यंत आम्ही धर्मनिरपेक्ष म्हणून काँग्रेस -राष्ट्रवादीला मतदान केले. पुढे ह्याच पक्षाचे आमदार व खासदार भाजपा व शिवसेनेसोबत गेले हा ताजा इतिहास आहे. हे सर्व वर्षानुवर्षे होत आहे. त्यामुळे दलित मुस्लिम समाजाने आपल्याच उमेदवाराच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन अनिरूद्ध चव्हाण यांनी केले आहे.

मतदार म्हणून तुम्ही पाठीशी खंबीर उभे रहाल तर पर्वतीत बॅट करिश्मा करू शकते-
पर्वती विधानसभा मतदार संघ हा 1972 सालापासून राखीव मतदारसंघ होता. मागील 10 वर्षापूर्वी हा मतदारसंघ ओपन झाला. तेंव्हापासून या मतदारसंघावर प्रस्थापित पक्ष व प्रस्थापित जातीचे वर्चस्व राहिले आहे. एकट्या पर्वती मतदारसंघात दलिम व मुस्लिमांची मोठी संख्या आहे. ह्या दोन्ही जाती एकत्र आल्या तर आपलाच आमदार होवू शकतो. हे सर्व प्रस्थापित पक्षांना माहिती आहे. परंतु काँग्रेस व भाजपा हे आमच्या मनांत भिती निर्माण करून, आमच्या मतांमध्ये फुट पाडण्याचे काम सातत्याने करीत आहे.
अशफाक मोमीन हे तरूण उमेदवार आहेत, लढाऊ उमेदवार आहे. मतदारसंघाची त्यांना खडान्‌‍खडा माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभे राहिलो तर पर्वती मतदारसंघात बॅट करिश्मा करून दाखवु शकते. धर्मनिरपेक्षतेचा ठेका आम्ही घेतला नाही. आता आपण आपल्याच उमेदवाराला मतदान करायला शिकले पाहिजे. आणखी खुप काही बोलायचे आहे परंतु वेळेअभावी मी आपली रजा घेतो असे बोलून अनिरूद्ध चव्हाण हे पुढील सभेस रवाना झाले.