Thursday, December 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष मतदारांना मुर्ख समजतात, निवडणूक काळात मतदार देखील मुर्ख होतात… आता काय करू…हसु की रडू…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण –
राज्यात विधानसभा निवडणूकीचे वातावरण तापले आहे. सगळीकडे निवडणूकीचा ज्वर चढला आहे. राज्यात कायम सत्तेत असलेले पक्ष म्हणजे काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे गट हे आहेत. याच पक्षात सर्वाधिक सधन मराठा समाज आहे. त्यांना त्यांची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतात. प्रत्येक निवडणूकीत कोट्यवधी रुपये खर्च करतात. मतदार आणि कार्यकर्ते विकत घेण्याची त्यांची खुमखुमी आजही आहे. जाती जातीत भांडण लावणे, धर्माधर्मात भांडण लावणे हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम असतो. विकासाच्या मुद्यावर यांची निवडणूक कधीच नसते. कारण तेच आमदार, तेच खासदार असल्याने त्यांनी 5 वर्षात काय दिवे लावले आहेत, ते मतदारांना माहिती असते. त्यामुळे विकासाच्या मुद्यावर निवडणूक न लढविता ते थेट जाती आणि धर्मावर वातावरण निर्माण करतात. बेरोजगारी, महागाई, शिक्षण, नोकरी, हॉस्पीटलच्या सुविधेपासून ते भरमसाठ बीलाबाबत कधीच चर्चा होत नाही. रस्त्याच्या टोल बाबतही चर्चा होत नाही. महिला, मुलींच्या सुरक्षा, शिक्षण, नोकरीबाबतही फारशी चर्चा होत नाही किंवा केली जात नाही. कारण ह्यांना माहिती आहे. आपण आज ज्या पक्षात आहोत, ते काल त्या सत्ताधारी पक्षात होतो. त्यामुळे 5 वर्ष तर सोडा मागील 25 वर्षात काहीच केले नाही. त्यामुळे मतदारांच्या, नागरीकांच्या मुलभुत प्रश्नांवर चर्चा केली तर आपलेच पितळ उघडे पडले, त्यामुळे प्रस्थापित पक्षातील एकही पक्ष नागरीकांच्या मुलभुत प्रश्नांवर कधीच चर्चा करीत नाहीत. ह्यांना जाती आणि धर्मातील भांडणे लावुन निवडणूका लढवाव्या लागत आहेत हे वास्तव आहे.

निवडणूक काळात प्रेस मिडीयातील बातम्या काय असतात –
1. निवडणूक होण्याच्या आधी आणि निवडणूकांचा प्रचार सुरू झाल्यानंतर, सध्या कोण कुठून कोणत्या पक्षात गेला यावरच जास्त चर्चा प्रेस माध्यमांमध्ये असते. ह्याने कसा चौक्का मारला, त्याने तर सिक्सर मारला वगैरे चर्चा केली जाते. परंतु महत्वाची बाब अशी असते की, वडील एका पक्षात तर मुलगा दुसऱ्या पक्षात, नवरा एका पक्षात तर बायको दुसऱ्या पक्षात, चुलता एका पक्षात तर मामा, काका दुसऱ्या पक्षात असेच राज्यातील घराणेशाहीचे चित्र आहे.
2. कालपर्यंत काँग्रेसमध्ये असलेले काका, मामा, भाऊ.. तो पक्ष सोडून भाजप मध्ये जातो. भाजपा मधील दादा, भाऊ, मामा राष्ट्रवादी शरद पवार गटात जातो, राष्ट्रवादी अजित पवार गटातील मामा, दादा भाऊ काँग्रेस किंवा शरद पवार गटात जातो. काँग्रेस किंवा भाजपा मधील काका, मामा, दादा, भाऊ … शिवसेना उद्धव ठाकरे गटात जावून उमेदवारी मिळवितो, तर एकनाथ शिंदे शिवसेना गटातील दादा, ताई, माई, अक्का तिथुन उठून थेट उद्धव ठाकरे यांच्या गटात उमेदवारी मिळवितात. थोडक्यात काय तर सत्ता ही एकाच कुटूंबाच्या व परिवाराच्या हातात राहिली पाहिजे यासाठी ही पळापळ सुरू असते. ह्याच बातम्या वृत्तपत्र, टिव्ही चॅनल मधुन येतात.
3. आता टिव्ही चॅनेल, मोठी वृत्तपत्रे, यु टयुब चॅनेल वरून, ह्याच प्रस्थापित पक्षातील काका, मामा, दादा, भाऊ, अण्णा त्यांच्याच कुटूंबातील व परिवारातील उमेदवारांवर लुटूपुटूची टिका करतात, एकमेकांवर घालुन पाडून टिका करतात. आणि हीच वृत्तपत्र व टिव्ही चॅनलेची हेडलाईन होते. मतदार देखील टाळ्या वाजवतात. बघा, साहेबांनी कसा सिक्सर मारला, बघा अण्णा आता करिश्मा करून दाखविणार अशी चर्चा घडवुन आणतात. परंतु त्या मतदारसंघात काका आला काय की मामा आला, भाऊ आला की अण्णा, ताई निवडूण आली की, मामा…. त्यामुळे सत्ता ही कुटूंबात व परिवारातच राहते. मतदारांना काय मिळते… काहीच नाही…. परंतु निवडणूक काळात वर्षानुवर्षे हाच मिडीया मतदारांचे लक्ष विकासावरून, बेरोजगारीवरून, महागाई वरून हटवुन, दुसरीकडे वळवित असतो.
टिव्ही चालु करून बातम्या सुरू केल्या की, प्रत्येक टिव्ही चॅनेल व वृत्तपत्रात ह्याच बातम्यांचा भडीमार सुरू असतो. टिव्हीचा रिमोट पुढे मागे घेतला तरी त्याच त्याच प्रकारच्या बातम्या सुरू असतात. मतदारांनी ही बाब आता समजुन घेणे आवश्यक आहे.

मतदानाचा हक्क विकायला सुरूवात झाली, प्रस्थापित पक्ष मतदारांना खरेदी करतात-
1. ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, हेच आजचे काँग्रेस व भाजपाचे (मुळ संघ व हिंदू महासभा) वाले केवळ टॅक्स भरणाऱ्यांना मतदानांचा अधिकार असला पाहिजे यासाठी संविधान सभेत हट्ट धरून बसले होते. परंतु मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील प्रत्येक नागरीकाला मतदानाचा अधिकार बहाल केला. परंतु स्वांतत्र्याच्या 75 वर्षाच्या काळात लोकशाहीने व संविधाने दिलेला मतदानाचा अधिकार, मताचा अधिकार विकत आहेत. देशाच्या पहिल्या निवडणूकीत, तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणूकीतून पाडण्यासाठी त्या काळातील हजारो रुपये खर्च केले होते, याच्या नोंदी आजही प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रात प्रसिद्ध आहेत.
2. काँग्रेसनेच मतदार खरेदी करण्याची परंपरा सुरु केली. गावखेड्यात, चाळीत मतदारांना आमिष दाखवुन, त्यांची मते खरेदी केली जात होती. आता शहरी भागात देखील एका मताला 5 हजार रुपयांपासून ते 15 हजार रुपयांपर्यंत दर दिला जात आहे. थोडक्यात प्रस्थापित असलेले पक्ष म्हणजे काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे गट हे पक्ष मतदारांना विकत घेतात व मतदार देखील त्यांचा अधिकार प्रस्थापित पक्षांना विकत आहेत हे देशाचे दुर्देव आहे. आता 2024 मध्ये तरी युवकांनी संविधाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून, जाती व धर्माधारित राजकारणापासून दुर राहून तुमची समस्या सोडविणाऱ्या उमेदवाराला विधानसभेत पाठविणे काळाची गरज आहे.

राजकीय पक्षांचे जाहीरनाम्याचा जुमला बाजार –
राज्यात काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी व भाजपा प्रणित महायुतीने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. प्रत्येक आघाडीने जनतेला भुलविण्यासाठी जाहीरनाम्यात भारंभार आश्वासने दिली आहेत. परंतु पुढील 5 वर्षात एकदाही त्या जाहीरनाम्यातील आश्वासनानुसार कामे करीत नाहीत हा इतिहास आहे. महायुती व महाविकास आघाडीने मतदारांना खुष करण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. परंतु वास्तवाची कुठेही झालर दिसून येत नाही.
दरम्यान त्यातल्या त्यात वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील प्रदेशनिहाय वस्तुस्थिती मांडून, त्यात काय सुधारणा करता येतील याबाबत ऊहापोह केला आहे. वास्तवावर आधारित कसा जाहीरनामा असतो ते वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यावरून दिसून येतो. बेरोजगारीबाबत… महागाईबाबत… शिक्षणाबाबत… आरोग्य व हॉस्पीलट बाबत… शेतकऱ्यांबाबत… महिलांबाबत स्पष्टपणे वंचित बहुजन आघाडीने भुमिका मांडली आहे. जातीनिहाय जनगणणेपासून ते आरक्षणापर्यंत त्यांची भुमिका मांडली आहे. परंतु हीच भुमिका महायुती व महाविकास आघाडीने मांडली नसल्याचे त्यांच्या जाहीरनाम्यावरून दिसून येत आहे.

महापालिका, जिल्हापरिषदेच्या निवडणूका झाल्या नाहीत, याचा अर्थ ओबीसींचे शिक्षण व नोकरीतील आरक्षण जाणार हे नक्की –
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाला पाठींबा दिला आहे. तसेच ओबीसींचे आरक्षण टिकवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच मागील चार वर्षात महापालिका व जिल्हापरिदेच्या निवडणूका झाल्या नाहीत, याचे कारण ओबीसींची आकडेवाडी शासनाकडे नाही, त्यामुळे त्यांना किती टक्के आरक्षण दयायचे हे माहित नाही. हे कारण सांगुन महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूका झाल्या नाहीत. उद्या ओबीसींची आकडेवारी निश्चित नाही म्हणून सध्या सुरू असलेले ओबीसींचे शिक्षण व नोकरीतील आरक्षण जाणार ही भिती व्यक्त होत आहे, एससी व एसटीच्या उपवर्गीकरणासह क्रिमिलेअरचा मुद्दा देखील तितकाच महत्वाचा आहे. उद्या हे क्रिमिलेअर सुरू झाले तर एससी व एसटीचेही मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता असल्याचे मत ॲड. आंबेडकरांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सर्व आरक्षणवादी जनतेने वंचितला मतदान करण्याचे आवाहन आंबेडकरांनी केले आहे.

व्यापाऱ्यांचा कर भरून जीव मुठीत आलाय-
व्यापारी हे चोर आहे, कर चोरी करतात असा त्यांच्यावर शिक्का मारला आहे. केंद्र सरकारचा टॅक्स, राज्य सरकारचा टॅक्स (जीएसटी) भरून भरून, व्यापारी वर्ग थकला आहे. त्यामुळे राज्यातील लहान मोठे उद्योग बंद पडत आहेत. व्यापाऱ्यांकडून कर वसुल केला जातो परंतु त्यांना सवलती काय दिल्या जातात ह्यावर कधीच चर्चा होत नाही. परंतु ॲड. आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने व्यापाऱ्यांना करात सवलत देवून राज्यातील जीएसटी कमी करण्याचे आश्वासून जाहीरनाम्यात दिले आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग आत निश्चित कोणतही भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. प्रेस व मिडीया ही बाब सांगत नाहीत, त्यामुळे व्यापारी व जनतेपर्यंत ह्याबाबी पोहोचत नाहीत. त्यामुळे लहान मोठ्या माध्यमांनी जनतेपर्यंत ही बाब घेवून जाणे क्रमप्राप्त ठरत आहे.

थोडक्यात निवडणूक काळात प्रस्थापित पक्ष म्हणजे काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे गट  व त्यांचे लहान मोठे उपगट मतदारांना जाती आणि धर्मात भांडणे लावुन निवडणूका लढवित आहेत. प्रेस व मिडीया देखील कलगितुऱ्यांच्या बातम्या दाखवुन जनता अर्थात मतदारांचे लक्ष विचलित करीत आहे. प्रस्थापित पक्ष मतदारांना विकत घेत आहेत तर मतदार देखील मत विकत आहेत. परंतु देशाच्या भवितव्याचे काय... त्यावर कोण बोलणार आहे की नाही... आता हसावे की रडावे तुम्हीच ठरवा...