Sunday, September 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील बदल्यांचा तिढा

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेतील कनिष्ठ व वरिष्ठ लिपिकांसह अधीक्षक संवर्गातील बदल्यांचे सुप 23 ऑगस्ट रोजी वाजले तरी, बहुतांश सेवक त्यांच्या बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी तयार नाहीत. पुणे महापालिकेतील बांधकाम, टॅक्स, ऑडीट, अतिक्रमण, आरोग्य, विधी व कामगार ही महत्वाची खाती म्हणून ओळखली जातात. महत्वाची खाती म्हणजे काय तर… क्रिमी खाती म्हणून ओळखली जातात. बक्कळ वरकड पैसा मिळतो. पुणेकर नागरीकांना भीती आणि दम देवून पैसे काढता येतात म्हणून त्याला क्रिमी किंवा महत्वाची खाती म्हटले जाते. पुणे महापालिकेतील प्रत्येक सेवकाला या खात्यात येण्याची ओढ असते. परंतु ह्या बदल्या सहज होत नाहीत, त्यासाठी प्रत्येकाला आयुक्तांचे नाही तर माननियांचे पाय धरावे लागतात. त्यांची सेवा करावी लागते. आता सेवा म्हणजे काय तर… ते सांगतील ती कामे स्वतःचा पदाचा अधिकार वापरून करणे, मग ते कायदेशिर असो की बेकायदेशिर… ती कामे करावी लागतात. पुढे माननिय म्हणतील ती रक्कम अदा करावी लागते, ह्याला सेवा म्हटले जाते. ही सेवा केल्यानंतर त्यांना आवडीच्या खात्यात सेवक म्हणून पदस्थापना मिळते. 23 ऑगस्ट रोजी सार्वत्रिक बदल्या केल्या आहेत. तथापी टॅक्स अर्थात कर आकारणी व कर संकलन विभागातील सेवक मात्र जागा सोडायला तयार नाहीत. पाहिजे तर किंमत मोजतो… पण टॅक्स मधुन बदली करू नका… पाहिजे कर काहीही कारणे दया, माझी किती गरज टॅक्स विभागाला आहे हे कागदोपत्री आणा आणि एवढी बदली रद्द करा म्हणून काही सेवक मागील आठ दिवसांपासून कामाला लागले आहेत. आता आयुक्त टॅक्स विभागातील काही सेवकांच्या बदल्या रद्द करणार की त्यांना टॅक्स मधुन पिटाळुन लावणार हे पहावयाचे आहे.

सर्वसाधारण बदल्या आणि टॅक्स विभाग-
प्रत्येक सेवक ज्या त्या खात्याचा मालक झाला आहे, 7/12 यांच्या नावे केला आहे-

पुणे महापालिकेत सुमारे 18 ते 20 हजार कायम कर्मचारी/ सेवक कार्यरत आहेत. तर 10 ते 12 हजार सेवक कंत्राटी सेवक म्हणून कार्यरत आहेत. यातील 18 ते 20 हजार सेवकांपैकी वरीष्ठ लिपिक संवर्गातील 99 सेवकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. तर कनिष्ठ लिपिक संवर्गातील 279 सेवकांच्या बदल्या 23 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या आहेत. कनिष्ठ लिपिक संवर्गातील सुमारे 78 सेवक एकट्या टॅक्स विभागातील आहेत. त्यापैकी काही सेवकांना टॅक्स विभागात रुजु करून घेण्यात आले आहे, कित्येक सेवक टॅक्स विभागाच्या दारात थांबले आहेत, परंतु त्यांना आत प्रवेश दिला जात नाही. वरीष्ठ लिपिक संवर्गात देखील 10 ते 12 सेवकांच्या बदल्या केल्या आहेत. तथापी ते टॅक्स मधुन बाहेर जायला तयार नसल्याची माहिती आहे.

पुणे महापालिकेतील 18 ते 20 हजार कर्मचाऱ्यांपैकी 5 टक्के देखील सेवकांच्या बदल्या झाल्या नाहीत. ज्या बदल्या करण्यात आल्या, त्याची देखील अंमलबजावणी होत नाही. प्रत्येक सेवक ज्या त्या खात्यांचा मालक झाला आहे. थोडक्यात त्या त्या विभाग व खात्यांचा 7/12 यांच्या नावे केल्याच्या अविर्भावात हे सेवक वागत असतात. एकच मोठे उदाहरण दयायचे तर, कामगार विभाग. पुणे महापालिकेतील मुख्य कामगार अधिकारी पदावर श्री. नितीन केंजळे कार्यरत आहेत. श्री. केंजळे हे पुणे महापालिकेतील आस्थापना/ सेवक वर्गात शिपाई म्हणून रुजु झाले. त्यानंतर 12 ते 16 वर्ष एकाच खात्यात होते. एकाच खात्यात राहून त्यांनी त्यांची शैक्षणिक पात्रता वाढविली. पुढे ते कामगार विभागात आले. मागील 14 वर्षांपासून ते कामगार खात्यात आहेत. पुणे महापालिकेत 76 विभाग आहेत. परंतु श्री. केंजळे हे 25 वर्षात केवळ दोनच खात्यात कार्यरत राहिले. त्यांना बदलीचा अधिनियम लागुच नाही. असे शेकडो केंजळे पुणे महापालिकेत आहेत. 

इष्टे,कदम, लोंढे- टॅक्स मधुन जाणार नाही- काय करायचे ते करा-
पुणे महानगरपालिकेचे अति. आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी. यांनी दि. 23
ऑगस्ट रोजी 99 वरिष्ठ लिपिकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. तसेच या 99 सेवकांना या आज्ञापत्रकानुसार बदली विभागात रुजु होण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्यात येत असून, बदली झालेल्या सेवकांनी तत्काळ बदली खात्यात रुजु व्हावे, यासाठी स्वतंत्रपणे कार्यमुक्ती आदेशाची अर्थात रिलिव्ह मेमोची आवश्यता नाही असेही लेखी आदेश देण्यात आले आहेत. तथापी या बदली आदेशातील 1) श्री. दत्तात्रय अंकुश लोंढे यांची बदली, त्यांच्याच संमतीने मुख्य लेखा व वित्त विभागात करण्यात आली आहे. 2) श्री. इष्टे योगेश पंडू हे स्थानिक संस्था कर विभागात पगाराला होते परंतु ते प्रत्यक्षात टॅक्स विभागात कामाला होते. त्यांची बदली विद्युत विभागात करण्यात आली आहे. व 3) श्री. कदम गणेश देविदास यांची बदली माहिती व तंत्रज्ञान विभागात करण्यात आली आहे.

श्री. लोंढे, श्री. इष्टे व श्री. कदम हे विभागीय निरीक्षक म्हणून कार्यरत होते. तथापी त्यांची बदली इतर विभागात करण्यात आल्यानंतर देखील ते विभागीय निरीक्षक या पदावर कार्यमुक्त होण्यास नकार देत असल्याची माहिती समोर आली आहे. काही सेवकांनी सांगितले की, आम्हाला टॅक्स विभागात रुजु करून घेतले जात नाही, तक्रार करायची म्हटली तरी हिंम्मत होत नाही. माधव जगताप यांची मोठी दहशत आहे, त्यांच्या विरोधात कुणीच काही बोलत नाही. तसेच त्यांना राजकीय पाठबळ आहे, त्यामुळे तक्रार करणाऱ्या सेवकांविरूद्ध ते काहीही करू शकतात, त्यामुळे आता आम्ही काय करायचे असाही प्रश्न निर्माण झालाय. आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे खात्यात हजर झाले नाही तर तिकडूनही त्रास होण्याची शक्यता आहे, ज्या खात्यात बदली झाली आहे ते रुजु करून घेत नाहीत. जे रुजु करून घेत नाहीत, त्यांची तक्रार कशी करणार ह्या पेचात बहुतांश कर्मचारी/ सेवक अडकुन पडले आहेत. 

नगरसेवकांच्या नावाने खडे फोडणारे… प्रशासकीय राजवटीत कामगिरी करून का दाखवित नाहीत-
पुणे महापालिकेतील टेंडर राज आणि बदली- पदोन्नतीमध्ये नगरसेवक अडथळे आणत आहेत, आम्हाला प्रशासकीय कामे करू दिली जात नाहीत अशी अनेक वर्षांपासून ओरड होती. आता मागील दोन/तीन वर्षांपासून पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. आता नगरसेवकांचा कुठलाही हस्तक्षेप नाही, ह्यची बदली करा, त्याची बदली करा म्हणून कुणी नगरसेवक महापालिकेत येत नाही. ह्या ते टेंडर काम दया, त्याला ते टेंडर दया म्हणूनही महापालिकेत कुणी येत नाही. मग आता प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कुणी हात धरले आहेत काय…

आता महापालिकेत सदस्य/ नगरसेवक नाहीत. त्यामुळे कुठेही कुणी हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता पुणे महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी/ अभियंते लक्षणिय कामगिरी का करून दाखवित नाहीत. याचा अर्थ पुणे महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी हे नगरसेवकांच्या नावाने विनाकारण खडे फोडत होते हे सिद्ध होत आहे. 

आता आयुक्त तथा प्रशासक यांच्या विषयी दोन शब्द –
स्थानिक स्वराज्य संस्थेतील कारभार शासनाच्या धोरणाप्रमाणे होत आहे की नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांची नियुक्ती महापालिकेत करण्यात येते. आयुक्त व अति. आयुक्त हे आयएएस व आयआरएस या सचिव संवर्गातील अधिकारी असतात. संपूर्ण मंत्रालय, संपूर्ण राज्य कारभार चालविण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेले असते. असे असतांना देखील आयुक्त व अति. आयुक्त या सचिव संवर्गातील अधिकाऱ्यांना एका शहरातील महापालिकेचा कारभार व त्याचे सनियंत्रण करता येत नसेल तर अशा आयुक्तांचा देश, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थेला उपयोग तो काय…

शासनात पदोन्नतीचा नियम आहे, तसा बदलीचा देखील कायदा आहे. राज्य शासनाने बदलीचा अधिनियम 2005 नुसार, बदली धोरणात स्पष्टपणे तरतुदी लागु केलेल्या आहेत. त्या बदली अधिनियमाची पुणे महापालिकेत अंमलबजावणी होत नाही, त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा अधिकार आयुक्त व प्रशासक यांच्याकडे आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त व अति. आयुक्तांनी त्यांना दिलेल्या अधिकाराचा वापर करून बदली अधिनियमाची कठोरपणे अंमलबजावणी करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. बदलीच्या ठिकाणी सेवक हजर होत नसतील तर 1956 च्या तरतुदी लागु करून त्यांना वठणीवर आणण्याचे काम देखील आयुक्तांचे आहे. पूर्वीचे आयुक्त विक्रमकुमार आणि अति. आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी काय पराक्रम आणि सवयी लावुन ठेवल्या आहेत ते पुणेकरांना ठाऊक आहेत.त्यांचा कित्ता नव्या आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी गिरवु नये एवढीच माफक अपेक्षा... 

हे कसले समुपदेशन-
शासनाच्या बदली धोरणानुसार दर तीन वर्षांनी बदली करणे अपेक्षित आहे. पुणे महापालिकेत सार्वत्रिक बदल्यांच्या आदेशात, समुपदेशन करून बदली केली आहे असे नमूद केलेले असते. तसेच याच अटी मध्ये नमूद केलेले असते की, समुपदेशनाने बदली करण्यात आली आहे, त्यामुळे अन्य ठिकाणी बदली करण्याकरीता किंवा सध्याच्या खात्यात ठेवण्याकरीता कोणत्याही प्रकारचा दबाव, शिफारस तसेच विनंती अर्जाची दखल घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी असेही नमूद असते.

मग हे कसल्या प्रकारचे समुपदेशन असते, ते तरी एकदा पुणेकरांना सांगुन टाका. तत्काळ कार्यमुक्त केल्यानंतर बदली ठिकाणी हजर व्हा, स्वतंत्र रिलिव्ह मेमोची आवश्यकता नाही असेही नमूद केले जाते. याचा अर्थ सेवक बदलीच्या ठिकाणी हजर होणार नाही याची पूर्वकल्पना आयुक्तांना आधीपासूनच असते मानावयास हरकत नाही. तसेच पूर्णवेळ व अतिरिक्त पदभार सेवा कायम ठेवण्यात येत आहेत असेही नमूद असते. याचा नेमका अर्थ काय आहे... पैसे दया बदली घ्या, पैसे दया, आहे त्याच पदावर रहा असाच लेखी मंत्र या आज्ञापत्रकातून दिलेला तर नसतो ना... याची शंका येते. पुणे महापालिकेतील सेवकांचे कसले समुपदेशन केले जाते हे एकदा पुणेकर नागरीकांना समजणे आवश्यक आहे.