Monday, October 14 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यात गणेशोत्सवाची धामधुम- महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांची लुटालुट- टेंडरसाठी ठेकेदारांची दण्णादण्णी

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. घरोघरचे गणपती बसविण्यासाठी बच्चे कंपनीसह कुटूंबातील सर्व सदस्य झाडुन कामाला लागले आहेत. सार्वजनिक मंडळातील कार्यकर्ते देखील झटून काम करीत आहेत. कुणालाही मान वर करून पाहण्यासाठी वेळ नाही अशी पुण्यातील परिस्थिती असतांना, दुसरीकडे मात्र पुणे महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयात टेंडर कामावरून रणकंदन पेटले आहे. गणपती बसण्याच्या आधीच गणपती विसर्जनासाठी टेंडर काढण्याची लगबग सुरू आहे. फिरते वाहन, शाळा, मोकळ्या जागेतील विसर्जन हौद, त्यावरील विद्युत सुविधा याचे टेंडर मिळावे म्हणून ठेकेदारांची पळापळ सुरू आहे. आज शनिवार आहे. क्षेत्रिय कार्यालयात नागरीकांना येण्यास सुट्टी असली तरी अधिकारी व ठेकेदार हजर आहेत. कोणते टेंडर कुणाला दयावे यासाठी बैठका झडत असतांना, काही ठेकेदार तर हमरीतुमरीवर आले असल्याचे पाहण्यात आले आहे. धर्माच्या नावाखाली महापालिकेची लुटालुट सुरू आहे.

पुण्यात गणेशोत्सवाची धामधुम-
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. घरोघरचे गणपतीसह मंडळातील गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना सुरू आहे. सगळीकडे होम हवन सुरू आहे. सार्वजनिक मंडळांच्या मिरवणूका सुरू आहेत. पुणे शहरातील एकही रस्ता असा मोकळा नाही, तिथे गणपतीची मिरवणूक नाही, सगळीकडे गर्दीने रस्ते फुलून गेले आहेत.
मंडई, सुभानशाहवली दर्गा, बोहरी आळीत तर पाय ठेवायलाही जागा नाही. गणपतीची आरास करण्यासाठी बोहरी आळीशिवाय कुठेही पर्याय नाही, त्यामुळे कोथरूड असो की, धनकवडी, हडपसर असो की, सोलापुर बाजार, कात्रज असो की, कोंढवा… सगळ्यांचे पाय मंडई आणि बोहरीआळीकडे वळतात. फडके हौद ते लाल महाल आज पूर्ण पॅक झाला आहे. पेठांमध्ये तर पाय ठेवायलाही जागा नाही. सगळीकडे रस्ते ओसंडून वाहत आहेत. खरेदी धुम सुरू आहे.

महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांची लुटालुट-
गणेशोत्सव सुरू होण्याआधीच बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करावी लागते. अतिक्रमण आणि आकाशचिन्ह विभागाला या काळात ग्लानी आलेली असते, ती या वेळेस देखील आलेली आहे. जो पर्यंत ओरड होत नाही, तो पर्यंत ते जागे होत नाही हा इतिहास आहे. सोमनाथ बनकरांकडे खाते असल्याने, ते जागे असतील असे वाटले होते, परंतु त्यांनाही धुंदी आलेली असल्याचे सध्या शहरात फेरफटका मारल्यानंतर दिसत आहे.
दुसरीकडे 15 क्षेत्रिय कार्यालयात विसर्जनाची तयारी म्हणून तातडीचे काम म्हणून टेंडर काढले जाते. त्यात वेगवेगळी कामे असतात. ती कामे कुणाला दयायची आणि त्यातील सर्वांचा समभाग असा प्राप्त करून घ्यावयाचा याचा प्लॅन तयार असतो. तो प्लॅन तयार झाला आहे. फाईल जुन्याच आहेत, ठेकेदारही जुनेच आहे,परंतु दर वाढवुन पाहिजेत, ठेकेदारांना नाही तर अधिकाऱ्यांना पाहिजे आहेत. सगळं किळसवाण झालं आहे. एक एक बाबी समोर आणल्या तर, सर्व गणेशभक्त हे पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि ठेकेदारांच्या गचांडीला धरून भर चौकात ठोकुन काढतील… एवढं भयंकर आहे.

टेंडरसाठी ठेकेदारांची दण्णादण्णी –
आज शनिवार. दुपारची वेळ. क्षेत्रिय कार्यालयाच्या जवळच्या दुकानात चहा घेत असतांना, काही ठेकदारांची हमरीतुमरी सुरू होती. त्यातच एक लिपिक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत होता. नंतर हा क्लार्क काही लोकांना घेवून पुढे जातो. मग दोन/तीन ठेकेदारांता बाचाबाची होते. ही बाचाबाची कशासाठी… धार्मिकतेच्या नावाखाली सगळी लुट सुरू आहे. दांभिकतेचा कळस गाठला आहे. दोन क्षेत्रिय कार्यालयातील कामे मिळविल्यानंतर, पुनः या देखील क्षेत्रिय कार्यालयाचे काम याच ठेकेदाराला पाहिजे. एक एक ठेकेदार मालक झाला आहे. त्यांच्या मध्ये कुणीच यायचे नाही. आला तर भाईगिरीची भाषा. मध्येच कुणाचा तरी फोन येणार… पुन्हा बाचा बाची… काय चाललय तरी… काय हे…