Thursday, January 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना, अधिकारी होऊ दयायचे नाही?

प्रशासकीय सेवेतील 15 महापालिका सहाय्यक आयुक्त पदांवर शासन किंवा तांत्रिक सेवकांची नियुक्ती,
नियमांवर बोट ठेवून, प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांना वॉर्ड ऑफिसर पदांपासून वंचित ठेवले

नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण-
पुणे महापालिकेतील प्रशासकीय सेवांतर्गत सध्या खेकड्यांची स्पर्धा, घुबडांची स्पर्धा आणि कोंबड्यांच्या झुंजी असा खेळ सुरू आहे. त्यामुळे तुला ना… मला… घाल…कुत्र्याला अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेतील महापालिका सहायक आयुक्त पदांसाठी एकही पात्र उमेदवार नसल्यामुळे एकुण 15 क्षेत्रिय कार्यालयातील बहुतांश वॉर्ड ऑफिसर पदांवर तांत्रिक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रभारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. मुळात पुणे महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये अतांत्रिक पदांवर तांत्रिक सेवेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येणार नाही अशी महत्वाची अट आहे. परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. पुणे महापालिकेतील प्रशासकीय सेवा संवर्गातील सेवकांना अधिकारी पदावर बसु दयायचे नाही अशी खुणगाठ बांधल्याने आज 15 पैकी बहुतांश पदांवर तांत्रिक सेवेतील कर्मचाऱ्यांना वॉर्ड ऑफिसर म्हणून प्रभारी नियुक्ती देण्यात आली आहे. यात प्रशासकीय सेवेतील काही कपटखोर सेवकांमुळे ही परिस्थिती ओढाविली आहे. अन्यथा प्रशासकीय सेवा संवर्गतील पदांवर तांत्रिक सेवकांची नियुक्ती करण्याची हिंम्मत आयुक्त कार्यालयाने केली नसती. यात काही सेवक खेकड्यांच्या वंशावळीपैकी असल्याने, ते पात्रतेजवळ पोहोचलेल्या सेवकांना पदांपर्यंत पोहोचू देत नाहीत, तर घुबडासारखे उलटे पाण्यात पाहण्याची सवय झाल्याने, अनेक पात्रताधारकांच्या कोंबड्यांच्या झुंजी लावल्या जात आहेत. वास्तव काहीही असले तरी मागील 25 वर्षांपासून महापालिकेत वर्षानुवर्ष काम करणाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतांना देखील महत्वाच्या पदांवर नियुक्ती दिली जात नाही हे पुणे महापालिकेतील प्रशासकीय सेवेचे वास्तव आहे.

विषय काय आहे –
पुणे शहरात जुन महिन्याच्या अखेरीस व जुलै महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात धो धो पाऊस झाला. त्याचे सर्व खापर सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयावर फोडण्यात आले. चार फुट पाण्यात थांबुन काम करणाऱ्या क्षेत्रिय अधिकाऱ्याचं तडकाफडकी बदली करण्यात आली. पुढे काही पदांमध्ये अंशतः करण्याच्या करण्याच्या नावाखाली पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. राजेंद्र भोसले यांनी दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी सहाय्यक आयुक्त या पदांचे नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत.
त्यात उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 ते 5 मधील सहायक आयुक्त पदांच्या नियुक्तीमध्ये बदल करण्यात आले. प्रशासकीय सेवेतील पदांवर तांत्रिक सेवकांच्या धडाधड नियुक्तींचे आदेश काढण्यात आल्याने, मुळ विषय आहे तिथेच राहिला आहे. पुणे महापालिकेतील उपअभियंता दर्जाच्या सेवकांकडे पुणे महापालिकेतील सहायक आयुक्त पदांवर नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. वास्तविक पाहता, पुणे महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमानुसार ह्या नियुक्त्या बेकायदेशिर ठरत असतांना देखील त्यावर उघडपणे कुणीच बोलत नाही.
सहायक आयुक्त पदांवर नियुक्त्या –
पुणे महापालिका परिमंडळ क्र. 1 मधील तीनही वॉर्ड ऑफिसर अर्थात सहायक आयुक्त पदांवर तांत्रिक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. मुळात हे कर्मचारी उपअभियंता या तांत्रिक सेवेतील आहेत. परिमंडळ क्र. 1 मधील येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक आयुक्तपदी उपअभियंता श्री. नागटिळक चंद्रसेन तुळशीराम यांची प्रभारी नियुक्ती केली आहे, तर ढोलेपाटील रोड क्षेत्रिय कार्यालयावर उपअभियंता श्री. अशोक सिताराम झुळूक व नगररोड वडगाव शेरी क्षेत्रिय कार्यालयावर उपअभियंता श्री. संजय संपतराव पोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परिमंडळ क्र. 2 मधील तीन पैकी 2 पदांवर तांत्रिक सेवक तर एका पदावर शासकीय सेवेतील सेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पैकी शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयावर उपअभियंता श्री. रवि खंदारे, व कोथरूड बावधन वर दुदूसरकर शंकर चंद्रकांत  तर औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयावर  गिरीश दापकेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

परिमंडळ क्र. 3 वर मधील एका क्षेत्रिय कार्यालयावर  तांत्रिक तर दोन क्षेत्रिय कार्यालयांवर शासन सेवेतील  सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पैकी वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयावर श्री. वियज नायकल तसेच सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयावर श्री. नामदेव बजबळकर व धनकवडी क्षेत्रिय कार्यालयावर श्रीमती सुरेखा भणगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

परिमंडळ क्र. 4  मधील तीनही क्षेत्रिय कार्यालयापैकी एक पदावर तांत्रिक तर दोन पदांवर शासनाकडील सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पैकी वानवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयावर विजय घुमटकर यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे तर हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालयावर बाळासाहेब ढवळे पाटील  तर कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयावर हेमंत किरळकर या दोन शासनाकडील सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

दरम्यान परिमंडळ क्र. 5 मधील तीनही क्षेत्रिय कार्यालयांवर उपअभियंता या तांत्रिक संवर्गातील  सेवकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. पैकी भवानी पेठ दगडखैरे किसन राजाराम, बिबवेवाडी डॉ. प्रदीप तर कसबा विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयावर सुहास महादेव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 तसेच सहायक आयुक्त पदाचे आणखी 3 पदांवर मालमत्ता व व्यवस्थापन विभागावर श्रीमती इंद्रायणी करचे, कर आकारणी व कर संकलन पदांवर श्रीमती अस्मिता तांबे धुमाळ व सहायक आयुक्त अतिक्रमण व अनाधिकृत बांधकाम निर्मूलन विभागावर श्री. अमोल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम, पोटकलम, खंड या खालील आयुक्तांचे अधिकार व कर्तव्ये किंवा कामकाज पार पाडतांना आयुक्तींची पूर्व मान्यता घेवून काम करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. 

महापालिका सहायक आयुक्त/ वॉर्ड ऑफिसर पदासाठी जाचक अट –
पुणे महापालिकेतच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये बऱ्याच ठिकाणी अनावश्यक व जाचक अटी टाकण्यात आलेल्या आहेत. प्रशासकीय सेवा संवर्गातील पदांनुसार प्रथम कनिष्ठ लिपिक, वरीष्ठ लिपिक, उपअधीक्षक व अधीक्षक पर्यंत आल्यानंतर पुढे प्रशासन अधिकारी व त्याच्या पुढे महापालिका सहायक आयुक्त व उपआयुक्त या पदांवर नियुक्ती देण्यात येते. किंवा तसा नियम आहे. तथापी वरिष्ठ लिपिक व उपअधीक्षक पदापर्यंत पदोन्नती देत असतांनाच त्यात अडथळे निर्माण केले जातात. नियुक्तीचा दिनांक, सेवाखंड या सारख्या किचकट प्रक्रियेत अडकाविले जाते. त्यातच निलंबन, विभागीय चौकश्या पुढे केल्या जातात, त्यानंतर देखील हे सर्व पार केल्यानंतर, अधीक्षक या पदावर नियुक्ती मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे प्रशासन अधिकारी पदांपर्यंत पोहोचणे तर दूरच राहिले.

आता पुणे महापालिकेतील सहायक आयुक्त या पदांसाठी निकष आहेत की, प्रशासन अधिकारी या पदावर किमान 3 वर्ष कामकाज केलेल्या सेवकांना पदस्थापना देण्यात येते. तथापी वरिष्ठ लिपिक ते उपअधीक्षक यात 12 ते 15 वर्षांचा कालखंड निघून जातो. बहुतांश सेवकांची यात 18/20 वर्ष गेलेली आहेत. त्यात अधीक्षक ते प्रशासन अधिकारी मधील अंतर खुप मोठे ठेवले जाते. त्यामुळे प्रशासन अधिकारी या पदाचा पदभार घेण्याच्या आत किंवा महिना दोन महिन्यात सेवानिवृत्ती येवून ठेपते. त्यामुळे तीन वर्षांचा कालखंड कसा पूर्ण करणार हे कुणीच सांगु शकत नाही. 

याला पर्याय काय असू शकतो –
पुणे महापालिकेच्या 2014 च्या सेवा प्रवेश नियमावलीला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यात सर्वात शेवटी नमूद आहे की, अतांत्रिक पदांवर तांत्रिक सेवकांची नियुक्ती करण्यात येवू नये. असा नियम पुणे महापालिकेने केलेला असतांना देखील, अतांत्रिक पदांवर तांत्रिक सेवकांची नियुक्ती ही बेकायदेशिर असतांना देखील उपअभियंत्यांना सहायक आयुक्त या प्रशासकीय पदांवर नियुक्ती का देण्यात येत आहे हा महत्वाचा प्रश्न आहे.

तांत्रिक सेवा संवर्गातील सेवकांना प्रशाकीय सेवेचा फारसा अनुभव नसतो. मिलीमिटर, सेंटीमिटर, विट, वाळू दगडांची कामे करणाऱ्यांना प्रशासकीय सेवा संवर्गातील पदांवर का नियुक्ती दिली जाते हा गहन आणि अजब प्रश्न आहे. वास्तविक पाहता, सध्या कार्यरत असलेल्या सहायक आयुक्तांपैकी बहुतांश सेवक माझ्या परिचयाचे आहेत. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकजण माझ्यावर व्हॉटसॲपवरून वीट,वाळू दगड फेकुन मारतीलही परंतु किती वर्ष हा विषय दाबुन ठेवायचा... म्हणून हा खटाटोप केला आहे. त्यात प्रशाकीय सेवेतील शेकडो सेवक माझ्या 25/30 वर्षात परिचयाचे आहेत. कित्येक सेवकांना तर मी कनिष्ठ लिपिक पदापासून ओळखत आहे. ते आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. 

प्रशाकीय सेवेतील, प्रशासन अधिकारी या पदावर 3 वर्षांची अट आहे. तथापी कनिष्ठ लिपिक ते अधीक्षक व प्रशासन अधिकारी पदापर्यंत संपूर्ण आयुष्यभर त्यांनी प्रशासकीय सेवेत काम केलेले असते. त्यामुळे सहायक आयुक्त पदाचे कामकाज करणे त्यांना मुळातच अवघड वाटण्याचे काहीच कारण नाही. ( तांत्रिक सेवा संवर्गातील सेवकांना काही अडचण येत नाहीत, तर प्रशासकीय सेवा संवर्गात संपूर्ण आयुष्य काम करणाऱ्यांना कुठेच अडचण येणार नाही)  त्यामुळे ज्या सेवकांनी अधीक्षक या पदावर 3 वर्ष किंवा प्रशासन अधिकारी या पदावर दोन चार महिने काम केलेले असले तरी त्यांना 2017, 2021 मधील काही कोर्ट विषयक अपवाद वगळुन त्यांना महापालिका सहायक आयुक्त पदावर नियुक्ती देवून, प्रशासकीय सेवेतील सेवकांना सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर गोड बातमी, गोड नियुक्ती देणे उचित ठरेल अशी पुणेकर म्हणून माझी धारणा आहे. 

आता थैलीशाहीवर बोलू काही-
प्रत्येक प्रकरणांत थैलीचा बाजार मांडला जात आहे. बांधकाम विभाग व पथ विभागात कार्यरत असलेल्या तांत्रिक सेवकांच्या चुकांमुळे नागरीकांच्या घरात पाणी शिरत आहे. रस्त्यांवर पाण्याचे तळी साचली आहेत. त्याला प्रशाकीय सेवेतील अधिकारी कसे जबाबदार असू शकतात असा शंका घेणारा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच थैलीशिवाय शिपायाचीही बदली व पदस्थापना होत नाही हे वास्तव आहे. तांत्रिकवाले काहीही करू शकतात, प्रशासकीय सेवेतील कर्मचारी माननियांचे लाड पुरवू शकत नाहीत हे वास्तव आहे. त्यामुळे निदान पुण्याच्या हितासाठी तरी थैलीशाहीचा कारभार अंशतः शिथील ठेवावा अशीही माझी पुणेकर म्हणून धारणा आहे.

माधव जगतापांसारखे सगळ्याच सेवकांचे नशिब फळफळत नाही-
पुणे महापालिकेच्या कर आकरणी प्रमुख पदावर सध्या कार्यरत असलेले उपआयुक्त श्री. माधव जगताप यांचे नशिब भयंकर फळफळते. त्यांच्या सारख नशिब पुणे महापालिकेत कुणाचेच नाही. बघा… ना.. पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून प्रथम नियुक्ती मिळविली. त्यानंतर त्यांचा महाभंयकर उदय झाला. अतिक्रमण सारख्या खात्यात आल्यानंतर तर नशिबाने साथच साथ दिली. याच खात्यात सहायक आयुक्त, पुढे आकाशचिन्ह, त्यानंतर सुरक्षा रक्षक सनियंत्रक पुढे उपआयुक्त पदापर्यंत हीच खाती त्यांच्याकडे राहिली. सर्व खात्यात कंत्राटी राज्य त्यांनीच आणले. आकाशचिन्ह विभागाचे कंत्राटीकरण, खाजगीकरण केले, अतिक्रमण विभागाचे खाजगीकरण केले, सुरक्षा रक्षक सनियंत्रक पद असतांना देखील त्यातही खाजगीकरण केले. आता ते कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख म्हणून कार्यत आहेत. त्यामुळे तिथे देखील संगणकीकरणारच्या नावाखाली ठेकेदारी राजवट आणली जात आहे. उदया असे करता करता ते जॉईट म्युनिसीअल कमीशनर बनतील यात शंकाच नाही.
एका कनिष्ठ अभियंता, मुळची शैक्षणिक पात्रता तांत्रिक स्वरूपाची होती. आता मात्र प्रशासकीय सेवा संवर्गात सर्वोच्च पदावर येवून बसले आहेत. पुणे महापालिकेच्या संपूर्ण कायम 18 ते 22 हजार कर्मचाऱ्यांचे किंवा 10 ते 12 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एवढे नशिब फळफळले नसेल. एवढे एकट्या माधव जगतापांचे नशिब फळफळले आहे.