Thursday, January 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यात मोबाईल चोराची हेराफेरीः उच्चशिक्षित चोराकडून 17 मोबाईलची चोरी, चोरीचे मोबाईल विकण्यासाठी नामांकित कंपनीच्या बीलांची हेराफेरी…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यासारख्या उच्च शिक्षितांच्या शहरात ऑनलाईन सायबर क्राईम अफाट वाढलेले आहे. परंतु छापिल बिलांमध्ये देखील हेराफेरी करता येते हे देखील पुण्यातील लबाड चोरांनी करून दाखविले आहे. परंतु कानुन के हाथ बहोत लंबे होते है हे मात्र पुण्यातील चोर कदाचित विसरले असतीलही… परंतु कानुन के हाथ बहोत लंबे होते है, हा प्रत्यय शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधील चोरीच्या प्रकरणांने समोर आला आहे.

गुन्ह्याची हकीकत अशी की,
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील, शिवाजीनगर जुना तोफखाना भागात फिर्यादी यांचे स्वतःचे फर्निचरचे दुकानात दिनांक 04/01/2024 कामात व्यस्त असताना त्यांचा काउंटरवर ठेवलेला सॅमसंग कंपनीचा असलेला मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे तक्रारी वरुन शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि क्र.20/2024 भादवि क. 380 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दिमध्ये मोबाईल चोऱ्यांना प्रतिबंध करण्याकरीता व चोरीस गेलेले मोबाईल शोधण्याकरीता आदेश दिले होते. त्या अनुषंगाने चोरीला गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सपोनि बाजीराव नाईक व पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर भागात सापळा लावुन चोरीचा छडा लावला.

चोरीचा मोबाईल कसा विकत होता हे पहा –
चोरास ताब्यात घेवुन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने सदरचा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडे केलेल्या सखोल तपासामध्ये नामांकीत इलेक्ट्रॉनिक वस्तु विक्री करणाऱ्या कंपनीचे मोबाईलच्या मुळ बिलाच्या पीडीएफ मध्ये चोरी केलेल्या मोबाईलचे डिटेल्स एडिट करुन त्याची पीडीएफ तयार करुन तो चोरी केलेला मोबाईल स्वतःचा असल्याचे भासवुन मोबाईल दुकानदारास बनावट बिलाची पीडीएफ व स्वतःच्या आधार कार्डच्या आधारे विक्री केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्ह्याची कलमे वाढली –
सदर गुन्ह्यात भादवि कलम 465,468,471 प्रमाणे वाढ करण्यात आली व त्यास नमुद गुन्ह्यात दि. 19/04/2024 रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपीने नमुद गुन्ह्यातील विक्री केलेला मोबाईल व इतर अशा प्रकारे चोरी केलेले एकुण 17 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेले इतर मोबाईल संदर्भात तपास चालु आहे.

पुणे शहर पोलीसांकडून दुकानदार व पुणेकरांना आवाहन-
तसेच पुणे शहर पोलीसांकडुन आवाहन करण्यात येते कि, मोबाईल खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी जुने वापरलेले मोबाईल खरेदी-विक्री करताना मोबाईल बिलाची पडताळणी करुन मगच व्यवहार करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग,  संदिपसिंह गिल्ल, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-1,  वसंत कुंवर, सहा. पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांचे नेतृत्वाखाली सहा पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी केली.