Friday, January 3 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेत भ्रष्ट उप कामगार अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचे कटकारस्थान

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेच्या सेवेतील सुमारे 10 हजार कंत्राटी कामगारांना शासन नियमानुसार किमान वेतन न देणे, खाजगी सुरक्षा रक्षक आणि झाडण काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सुरक्षा प्रावरणे न देणे, ईपीएफ व ईएसआय ठेकेदाराने भरलेला नसताना देखील संबंधित ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिले धडाधड मंजूर करणे या सर्व गंभीर प्रश्नाच्या न्याय हक्कासाठी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर पुणे महानगरपालिकेतील कामगार संघटनांसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी तीव्र धरणे आंदोलन केलेली आहेत. आज त्याच भ्रष्ट प्रभारी उप कामगार अधिकाऱ्यांना मागील दाराने पदोन्नती देण्याची कारस्थाने सुरू असल्याचे ऐकिवात येत आहेत.

   मुख्य कामगार अधिकारी असलेले शिवाजी दौंडकर आता सेवानिवृत्त झाले आहेत. तथापि त्यांच्या कार्यकाळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या सेवेमध्ये असलेल्या दहा हजार कंत्राटी कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित होत्या. माहे 2016 ते 2023 या कालावधीत अनेक कामगार संघटनांनी पुणे महापालिकेसह क्षेत्रिय कार्यालयावर धरणे आंदोलने केलेली असताना देखील त्या कामगार संघटनेच्या प्रतिनिधीला भेटून त्यांनी सादर केलेल्या निवेदनांवर आजपर्यंत कुठलाही विचार करण्यात आलेला नाही. शिवाजीराव दौंडकर पुणे महानगरपालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु याच शिवाजी दौंडकर यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये वर्ग तीन व वर्ग दोन मध्ये कार्यरत असलेले लिपिक टंकलेखक, बिगारी संवर्गातील काही कर्मचाऱ्यांना प्रभारी उपक्रम अधिकारी पदावर 2016 साली नियुक्ती देण्यात आली. या माध्यमातून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या असलेल्या समस्या सोडवण्याचे काम या प्रभारी उप कामगार अधिकाऱ्यांवर देण्यात आले होते.

 परंतु संबंधित प्रभारी उप कामगार अधिकाऱ्यांनी, प्रभारी ऐवजी कायम उपकामगार अधिकारी या पदावर पदस्थापना मिळावी यासाठी पुणे महानगरपालिकेचा पगार घेऊन स्वतःच एलएलबी, एल एल एम, डी एल एल अशा प्रकारच्या पदव्या संपादन केल्या. संबंधित अभ्यासक्रम हे कॉलेजमध्ये बसून पूर्णवेळ अभ्यासक्रमाच्या आहेत. त्या लाँग डिस्टन्सच्या नाहीयेत. थोडक्यात पगार/वेतन पुणे महानगरपालिकेचे घेऊन संबंधित प्रभारी उप कामगार अधिकाऱ्यांनी त्यांचे शैक्षणिक पात्रता वाढवण्याचे, डिग्री मिळवण्याचे प्रयत्न या काळात करण्यात आले.

 ज्यावेळेस संबंधित उपकामगार अधिकारी पदासाठी आवश्यक असलेल्या पदव्या प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर 2022 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या आकृतीबंधामध्ये अनावश्यक दुरुस्त्या करून किंवा त्यांच्याकडे उपलब्ध असलेले आठ प्रभारी उप कामगार अधिकारी यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आकृतीबंधामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या, आणि त्यानुसारच पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यालयीन परिपत्रक काढून संबंधित उपकामगार अधिकारी पदासाठी 50 टक्के पदे पदोन्नतीने भरण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. याचवेळी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारावर संविधान परिषद या आमच्या संघटनेच्या वतीने मुख्य कामगार अधिकारी यांच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारांच्या चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना, हा पदोन्नतीचा विषय पुढे आल्यानंतर संबंधित आठ प्रभारी उप कामगार अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठीच हा खटाटोप असल्याबाबत आम्ही त्यावेळेस आरोप केलेला होता. आणि तो आरोप पुढे जाऊन खरा ठरलेला आहे.

   पुणे महानगरपालिकेत प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारांच्या चर्चा सुरू असतानाच तसेच बहुतांश प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांनी सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे फ्लॅट, सदनिका खरेदी केल्या असून जाण्या येण्यासाठी वीस ते पंचवीस लाख रुपयांच्या दुचाकी खरेदी केल्या आहेत, 20/20 लाख रुपयांच्या चार चाकी वाहनांची खरेदी केलेली आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची चौकशी करण्याची आजही आमची मागणी कायम आहे. तथापि कुठल्याही प्रकारची चौकशी न करता 2023 मध्ये झालेल्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये कामगार विभागातून संबंधित भ्रष्ट प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांना काढून त्यांच्या मूळ खात्यामध्ये त्यांना पाठवण्यात आले आहे.

 तथापि आता शिवाजी दौंडकर यांच्या सेवानिवृत्तीच्या नंतर संबंधित प्रभारी उप कामगार अधिकारी यांना मागच्या दाराने पुन्हा पदोन्नती देण्याचे व पदस्थापना करण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या हालचाली ऐकिवात आहेत. तसेच दुरूस्ती करून आणलेल्या आकृतीबंधातील इतर सात जागा थेट परीक्षा घेऊन भरण्याबाबतच्या जाहिराती काढण्यात आलेल्या आहेत.

 थोडक्यात संबंधित 1. अमित अरविंद चव्हा, 2. आदर्श गुरूपाद गायकवाड, 3. प्रविण वसंत गायकवाड 4. माधवी सोपान ताठे 5. लोकेश लोहोट, 6. चंद्रलेखा गडाळे 7. सुरेश दिघे 8. बुगप्पा किस्टप्पा कोळी  या भ्रष्ट प्रभारी उप कामगार अधिकाऱ्यांनी प्रत्येकी 25 लाख रुपये दिलेले असल्याचे यापूर्वीच जाहीर झाले आहे. आता त्या बदल्यात ते पदोन्नतीसाठी तगादा लावत आहेत. अन्यथा ही बाब उघड करू अशी धमकी दिल्यामुळे पदोन्नतीच्या हालचाली सुरू असल्याचे ऐकिवात आहे.    

सध्या या भ्रष्ट प्रभारी उपकामगार अधिकाऱ्यांना त्यांच्या मुळ खात्यात पाठविण्यात आले असले तरी पदोन्नतीसाठी ते आजही तयारीत बसले आहेत. त्यातच प्रत्येकी 25 लाखाचा मुद्दा आहेच. आता पुणे महापालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त ज हे नेमकी कोणती भुमिका घेतात याकडे पुणे महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. भ्रष्टाचाराची चौकशी करणार की 25 लाखात उपकामगार अधिकारी पदाचे वाटप होणार हे काळच सांगणार आहे.