Tuesday, August 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पुणे महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाच्या 28 रिक्त जागा भरण्याची मागणी

पुणे महापालिकेचा 2014 चा आकृतीबंध व 2026 पर्यंत वाढलेल्या हद्दीनुसार विद्युत अभियंत्यांच्या 200 पदांचा समावेश आकृतीबंधात करण्याची आवश्यकता…

नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/
पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागात कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदाच्या 28 जागा मागील तीन वर्षांपासून रिक्त आहेत. कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पद भरतीसाठी आवश्यक असणारे बिंदूनामावलीचे रोस्टर व इतर प्रशासकीय काम पूर्ण झाले असल्याने ही पदे तातडीने भरण्याची मागणी समस्त बेरोजगार विद्युत अभियंता पुणे यांनी केली आहे.

याबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले आहे. यात नमूद केले आहे की, सध्या 25 ते 30 हजार उमेदवार पदभरतीची वाट पाहत आहेत. तसेच भरती प्रक्रियेस विलंब होत असल्याने अनेक पात्र आणि होतकरू उमेदवारांची वयोमर्यादा उलटून चालली आहे. त्यांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत चालला आहे. तरी तातडीने कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाच्या 28 रिक्त जागा भरण्याची मागणी करण्यात आली आहे. 

पुणे शहराची वाढती लोकसंख्या व समाविष्ठ गावांनुसार आणखी 200 पदे भरण्यात यावीत-
इंजिनिअर असोसिएशन यांच्याकडील समस्त बेरोजगार विद्युत अभियंत्यांनी पुणे महापालिकेतील 28 रिक्त पदे भरण्यासाठी निवेदन सादर केले आहे. तथापी पुणे महापालिका सेवा प्रवेश नियम व त्यानुसार 26 ऑगस्ट 2014 रोजी पुणे महापालिकेच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी देण्यात आली आहे. सन 2014 रोजीच्या मूळ आकृतीबंधात कनिष्ठ अभियंता (विद्युत) यांची 13 पदे मंजुर होती. त्यानंतर पुढे ह्या पदांची संख्या एकुण 48 करण्यात आली. दरम्यान 2017 व 2023 मध्ये पुणे महापालिकेत 23 गावे समाविष्ठ झाल्याने, पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये वाढ झालेली आहे. त्याअनुषंगाने सद्यःस्थितीमध्ये अस्तित्वात असलेल्या शासनमान्य आकृतीबंधामधील विविध विभागाकडील शेड्युल्डमान्य पदसंख्येमध्ये कमी अधिक प्रमाणात बदल करणे आवश्यक झाले आहे.

काही खाते व विभागांनी यापूर्वीच नगरविकास मंत्रालयातून पदसंख्या, पदांच्या अटी व शर्तींमध्ये बदल करून आणलेले आहेत. त्यात काही नवीन पदे निर्माण केली आहेत. तथापी विद्युत विभागाकडील अधीक्षक अभियंता (विद्युत) ते बिगारी या एकुण 1 ते 18 पदनामामध्ये फारसा बदल केलेला नाही. पुणे महापालिकेतील समाविष्ठ गावांमुळे शेड्युल्डमान्य पदांवर अधिक ताण आलेला आहे. असे असतांना देखील सुमारे 28 पदे मागील 3 वर्षांपासून रिक्त ठेवण्यात आली आहे. तसेच वाढलेल्या हद्दी, वाढत्या लोकसंख्येनुसार व कामाच्या वाव नुसार  पदांच्या संख्येत वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्या पदसंख्येत वाढ करणे आवश्यक ठरत आहे. मूळतः अधीक्षक अभियंता ते उपअभियंता ही पदोन्नतीची पदे आहेत. 85 टक्के सेवा प्रवेश हा कनिष्ठ अभियंता पदापासून सुरू होत असल्यामुळे कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंता (विद्यत) या पदांची संख्या 200 पेक्षा अधिक असणे आवश्यक ठरत आहे. 

पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाकडील विद्युत पर्यवेक्षक, पंप मॅकेनिक वीजतंत्री, सहायक वीजतंत्री, आवश्यक आहे. तथापी बत्तीवाला, तारतंत्री ह्या पदांची पूर्वीसारखी आवश्यकता राहिलेली नसल्याचे मत काही अभियंत्यांनी व्यक्त केले आहे. 

समस्त बेरोजगार विद्युत अभियंते यांनी रिक्त पदे भरण्याची केलेली मागणी रास्त आहे. या शिवाय वाढलेली हद्द, त्यानुसार वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात कनिष्ठ अभियंता (विद्युत) व शाखा अभियंता यांची कमतरता भासत असल्याने आणखी 200 पदे भरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.