
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील झाडणकाम गुणवत्तापूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार उपआयुक्त घनकचरा, परिमंडळ उपआयुक्त, क्षेत्रिय कार्यालय व ठेकेदार यांचा स्तर निश्चित करण्यात आलेला आहे. दरम्यान या कामांसाठी सुमारे 15 क्षेत्रिय कार्यालयात 3/4 हजार कंत्राटी पद भरती प्रक्रिया सुरू केली असून, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयासाठी सुमारे 830 कंत्राटी पदे भरण्याचे काम सुरू झाले आहे. सिंहगड कार्यालय हद्दीतील झाडणकामांसाठी कायम सेवकांसह नियमित 530 कंत्राटी सेवक कार्यरत असतांना देखील आता 830 कंत्राटी पदांची भरती केली जात आहे. दरम्यान मागील काही महिन्यांपासूनच नवीन कंत्राटी भरती होणार म्हणून आधीच बेरोजगारांकडून कागदपत्रे व सुमारे 50 हजार ते 70 हजार रुपये घेण्याचे काम सुरू होते. 1 ऑगस्टपासुन प्रायोगिक प्रकल्प सुरू होवून काम मिळाल्यामुळे आता 80 हजार ते एक लाख रुपये घेवून कंत्राटी पद भरती केली जात आहे. सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात ह्या भरतीचा मुख्य सुत्रधार प्रभारी डीएसआय आशिष सुपणार असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता देखील सुपणार यांच्या खाजगी कार्यालयात कागदपत्रे व पैसे जमा केल्यानंतर, संबंधिताला झाडणकामाच्या कंत्राटी कामावर रुजु करून घेतले जात आहे. आशिष सुपणार यांच्याबाबत मागील चार वर्षांपासून रूपाली चाकणकर व इतर अनेक संघटनांनी तक्रार अर्ज दिलेले असतांना देखील सुपणार यांना वाचविण्याचे अटोकाट प्रयत्न पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून केले जात आहे.
राज्य महिला आयोगाच्या तत्कालिन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा अर्ज –
राज्या महिला आयोगाच्या तत्कालिन अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रभारी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार यांनी बेकायदेशिररित्या भरती केलेल्या कंत्राटी कामगारांविषयी तक्रार अर्ज दिलेला होता. आशिष सुपणार यांच्या विरूद्धच्या तक्रार अर्जाची कोणतीही चौकशी न करता, तसेच ज्यांची फसवणूक झाली त्या प्रकरणांची चौकशी न करता, निव्वळ दोन ओळीचा खुलासा 2023 मध्ये सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाने दिला आहे. त्यात कंत्राटी नोकर भरती करण्याचे अधिकार हे संबंधित ठेकेदाराला असतात, त्यात सुपणार किंवा कोणत्याही आरोग्य निरीक्षक वा वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांचा कोणताही हस्तक्षेप नसतो असे नमूद करून याबाबत उपआयुक्त घनकचरा यांच्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करावी असे चौकशी अर्जाला उत्तर म्हणून कळविण्यात आले होते.
दरम्यान कंत्राटी कामगारांकडून कामे करवुन घेणे, त्यांची हजेरी लिहणे, पगारासाठी हजेरी पाठविणे तसेच त्यांचा ईपीएफ व इएसआय भरला आहे की नाही याची खातरजामा करणे ही सर्व कामे आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांची असतात. जर आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांच्याकडील व्यक्तीला कामावर घेतले नाही तर, अनेकदा खाडे/ रजा मांडणे, कामाविषयी तक्रार करणे, ठेकेदार ऐकत नाही म्हणून लेखी निवेदन सादर करणे असे सर्व प्रकार होत असल्यामुळे ठेकेदार हा आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांचाच गुलाम म्हणून काम करतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कंत्राटी नोकर भरती करण्याचा अधिकार ठेकेदाराचा असला तरी कंत्राटी भरती करण्याचे काम आरोग्य निरीक्षक करीत असतात. सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयातील बहुतांश कंत्राटी कामगारांची भरती ही आशिष सुपणार यांनी दिलेल्या नावानुसार झाली आहे.
रुपाली चाकणकर यांच्यासह रिपब्लिकन फेडरेशन यांनी आशिष सुपणार यांच्या गैरकृत्यांबाबत अनेक तक्रार अर्ज दिले आहेत. तसेच मागील दोन/तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत असतांना देखील सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाने कोणतीही चौकशी केली नाही.
सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील बनावट झाडणहद्दी-
पुणे महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय हद्दीत झाडणकामांच्या बनावट हद्दी आहेत. त्याची उदाहरणे खालील प्रमाणे आहेत –
- नऱ्हे येथे एकुण तीन आरोग्य कोठ्या आहेत, यात नऱ्हे, नऱ्हे जेएसपीएम व नऱ्हे अभिनव या तीन आरोग्य कोठ्यांवर सुमारे 160 पेक्षा अधिक कंत्राटी कामगार आहेत. हद्दी कमी व जास्त सेवक भरण्यात आले आहे.
- धायरी फाटा आरोग्य कोठी, पोकळेशाळा आरोग्य कोठी, धायरीगाव आरोग्य कोठी येथे 120 कंत्राटी कामगार आहेत. येथे देखील हद्दी कमी व जास्त सेवक भरण्यात आले आहेत.
- विठ्ठलवाडी, माणिकबाग, सनसिटी, नांदेड गाव, खडकवासला, किरकटवाडी, पु.ल.देशपांडे या सर्व आरोग्य कोठ्यांमध्ये हद्दी कमी व जास्त सेवक भरण्यात आले आहेत.
- जनता वसाहती मध्ये गल्ली बोळात कधीच झाडणकाम होत नाही. निव्वळ उभा रस्ता झाडून चकाचक करतात.
- जनता वसाहत येथील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेचे काम अेआरदी या संस्थेला दिले आहे, तरी देखील इथेही कंत्राटी सेवक कामावर असल्याचे दाखविण्यात आले आहे.
दरम्यान हद्दी मोजण्याचे व निश्चितीचे काम इंजिनिअर यांच्या मदतीने आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांचे आहे. इंजिनिअगर, एसआय, डीएसआय यांच्या संगनमतानेच सिंहगड क्षेत्रिय कार्यालय हद्दीत बोगस हद्दी पाठवुन त्याला मंजुरी मिळविलेली आहे. अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमतामुळे सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील कचऱ्याचे निर्मूलन होत नाही हे वास्तव आहे.
बोगस हद्दी आणि बंद घरे –
सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात कायम सेवकांसह 487 कंत्राटी कामगार काम करीत आहेत. 487 सेवकांना मंजुरी असतांना देखील येथे 530 कंत्राटी सेवक कार्यरत आहेत. 530 पैकी एकट्या आशिष सुपणार यांचीच सुमारे 70 पेक्षा अधिक बंद घरे आहेत. बंद घरे याचा अर्थ सेवक कामावर नसतांना देखील त्याची हजेरी लावणे व त्याचा निव्वळ पगार काढला जातो त्याला बंद घरे असे टोपन नाव देण्यात आले आहे. आता तर 830 कंत्राटी सेवकांची भरती सुरू आहे. ही भरती आशिष सुपणार यांच्या बैलगाडा ह्या हॉटेलजवळील खाजगी कार्यालयातून केली जात आहे हे सर्वश्रुत आहे. 830 पदांमध्ये देखील बंद घरांची मोठी संख्या निश्चित आहे. त्यांची नावे काही दिवसात आम्ही पुनः जाहीर करणार आहोत.
सुपणार आणि त्यांचे एजंट –
बेरोजगारांना नोकरी लावतो म्हणून त्यांच्याकडून 70 ते 80 हजार रुपये घेतले जात आहेत. यात सुपणार यांच्याकडून काही आरोग्य निरीक्षक, मोकादम, व कंत्राटी कामगार, कायम सेवक यांना एजंट म्हणून नेमले आहे. 15 क्षेत्रिय कार्यालयात नोकर भरतीबाबत जेवढी बोंब नसेल तेवढी बोंबाबोंब सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात नियमित होत असते. एजंटांची मोठी संख्या असल्याने व नोकर भरतीच्या नावाखाली उठून-सुटून कोणीही पैसे घेत असल्याने त्याचे पडसाद पुणे महापालिकेच्या सभागृहापर्यंत पोहोचले आहेत. परंतु सुपणार यांच्या डान्सबारवर पाहुणचार घेतलेले अधिकारी कर्मचारी हे सुपणार यांच्या विरूद्ध जात नाहीत. तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पॅकेज देत असल्यामुळे ते देखील सहसा कारवाई करीत नाही. सुपणार यांच्या विरूद्ध शेकडो तक्रार अर्ज आले आहेत तरी देखील आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली नाही पॅकेज हे त्याचे उत्तर आहे.
बंद घरे अधिकाऱ्यांची आणि …. बदनामी नगरसेवकांची –
प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात तीन महिन्यांच्या झाडणकामांच्या प्रायोगिक कामासाठी सुमारे 3 ते 4 हजार कंत्राटी सेवक घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यात प्रत्येक नगरसेवकांकडून 40 ते 50 जणांची नावे येत असल्याची बोंबा बोंब करण्यात आली आहे. त्यात काहीअंशी तथ्य असले तरी बहुतांश भरती ही अधिकाऱ्यांकडून केली जात असल्याचे समोर आले आहे. नगरसेवकांच्या नावाने निव्वळ बोंबा बोंब करून नगरसेवकांनाच बदनाम केले जात आहे. दोन/चार अनुयायांना भरती करून घ्यावे असे नगरसेवक सुचवित असतीलही यात शंकाच नाही. परंतु नाव नगरसेवकांचे घ्यायचे आणि कंत्राटी सेवक मात्र पैसे घेवून भरण्याचे काम अधिकारी करीत आहेत.
पुणे मनपाचे सभागृह आणि झाडणकामाचा मुद्दा –
पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी देखील झाडणकामासाठी सुमारे 50 ते 70 हजार रुपये घेवून कंत्राटी सेवक भरती केली जात असल्याचे सभागृहाच्या समोर आणले आहे. झाडणकामाबद्दल सभागृहात चर्चेच्या फैरी झडत आहेत. झाडणकामाचा हा तीन महिन्यांचा प्रायोगिक प्रकल्प आहे, तो पुढे जावून बंद करणार की चालु ठेवणार, प्रायोगिक प्रकल्प बंद केला तर सर्व कामगार नगरसेवकांच्या दारात येवून बसणार अशी देखील चर्चा झाली आहे. त्यामुळे प्रायोगिक कामाच्या नावाखाली खरं तर पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकातील सुमारे 1500 कोटी रुपयांना चुना लावण्याचे काम प्रशासन करीत असल्याचे हे पुनः पुनः समोर आले आहे.
भाडे तत्वावर घंटागाड्या घेण्याचे कोणतेही कारण नव्हते, तरी देखील 350 वाहने घेण्यात आली. आता देखील भाड्याने गाड्या घेण्याचे आवाज येत आहेत. नॅशनल फोरमचे मागील चार महिन्यातील बहुतांश बातम्यांमध्ये झाडणकामे, कचरा प्रकल्पांवर मुद्देसुद माहिती सादर केली आहे त्याचाही विचार पुणे महापालिकेच्या सभागृहाने करणे आवश्यक ठरत आहे.
