Tuesday, June 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

PMC-PUNE पुणे मनपाच्या आयुक्त, उपआयुक्तांनाही दोन महिन्यांची रजा मिळत नाही, बदली नंतर सुपणार दोन महिने मेडिकल रजेवर.. ?

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडील आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार मागील 15 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा बदलीचा अधिनियम लागु केला जात नाही, त्यामुळे त्यांची बदली केली जात नाही. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या तत्कालिन अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांनी केलेल्या तक्रार अर्जामुळे सुपणार यांनी केलेला आर्थिक गैरव्यवहार प्रथमच समोर आले. दरम्यान श्रीमती चाकणकर यांच्या तक्रार अर्जांवर कोणतीही चौकशी न करता सुपणार यांची बदली, सुमारे 13 वर्षांनंतर सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय येथुन धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे करण्यात आली. तथापी अतिरिक्त आयुक्तांचा आदेश धुडकावुन व धनकवडी येथे रुजु न होता, सुमारे 2 महिन्यांच्या वैदयकीय रजेवर निघून गेले. पुणे मनपाच्या आयुक्त, उपआयुक्त किंवा कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याला 7 दिवसांपेक्षा अधिक कालावधीची रजा मिळणे कठीण असतांना, सुपणार हे 2 महिन्यांच्या रजेवर निघून केले. दरम्यान 2 महिन्यांची वैदयकीय रजा नेमकी कुणी मान्य केली… रजा देणाऱ्यांना तसे अधिकार होते का….

…. अखेर, सुपणार यांची 13 वर्षानंतर बदली झाली-
सुपणार हे 2011 रोजी पुणे महापालिकेच्या सेवेत रुजु झाल्यानंतर, प्रथम टिळक रोड क्षेत्रिय कार्यालयाकडील सिंहगड रोड वरील आरोग्य कोठ्यांवर नियुक्ती देण्यात आली. पुढे 2018 रोजी पुणे महापालिकेत काही गावे नव्याने समाविष्ठ झाल्यानंतर, टिळक रोड क्षेत्रिय कार्यालयाचे नामांतर सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय करण्यात आले. 2011 ते 2018 टिळक रोड क्षेत्रिय कार्यालय व 2018 ते आज 2026 पर्यंत सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय असे एकुण 15 वर्ष एकाच सिंहगड रोड येथील आरोग्य कोठ्यांवर कार्यरत आहेत.

दरम्यान रूपाली चाकणकर यांनी सुपणार यांच्या विरूद्ध दिलेल्या निवेदनामुळे, सुपणार यांच्या साम्राज्याला  प्रथम धडक देण्यात आली. दि. 5 ऑक्टोंबर 2023 रोजी सुपणार यांची धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे बदली करण्यात आली. दि. 9 ऑक्टोंबर 2023 रोजी सिंहगड कार्यालयाने सुपणार यांना कार्यमुक्त केल्याच्या नोंदी आहे. त्यानंतर सुपणार यांनी अति. आयुक्तांच्या आदेशानुसार 9 ऑक्टोंबर 2023 रोजी धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे पदभार स्वीकारणे अपेक्षित असतांना, सुपणार यांनी दि. 2 डिसेंबर 2023 रोजी धनकवडी येथे पदभार स्वीकारला. दरम्यान दि. 9/10/2023 ते 1/12/2023 या दोन महिन्यांच्या कालावधीत सुपणार हे वैदयकीय रजेवर गेले असल्याचे सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्ष त्यांच्या नोदी आढळुन येत नाहीत. पुणे महापालिकेच्या आयुक्तांसह कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्याला 7 दिवसांपेक्षा अधिक काळ रजा देता येत नाही. तसे वैदयकीय प्रमाणपत्रही मिळत नाही. मग सुपणार यांना वैदयकीय रजा कुणी दिली....

सुपणारांना 2 महिन्यांची वैदयकीय रजा कुणी दिली-
सिंहगड क्षेत्रिय कार्यालयाकडून श्री. सुपणार यांच्या बदली व रजेची माहिती देण्यात आली आहे. यात रजेबाबत धनकवडी क्षेत्रिय कार्यालयातील बदलीचे कारण देण्यात आले आहे. सिंहगड कार्यालयाने दि. 9 ऑक्टोंबर 2023 रोजी कार्यमुक्त केल्याने रजा देण्याचा आमचा म्हणजे सिंहगड क्षेत्रिय कार्यालयाचा अधिकार राहत नसल्याची माहिती तत्कालिन वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. मंगलदास माने यांनी सांगितले आहे. बदली व पदस्थापनेचा तो निर्णय प्रशासनाचा असतो.

धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे सुपणार यांच्या 2 महिन्यांच्या रजेबाबत विचारणा केली असता, धनकवडी-आंबेगाव क्षेत्रिय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. विक्रम काथवटे यांनी माहे 2023 मधील सर्व अभिलेखे आमच्या समोर ठेवत सांगितले की, श्री. सुपणार हे धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे दि. 7 डिसेंबर 2023 रोजी रुजु झाले. दि. 7 ते 9 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यरत होते. पुढे 10 तारखेला रविवार होता. दि. 11 ते 23 डिसेंबर 2023 रोजी एलटीसी म्हणजे रजा मिळवुन सुपणार निघून गेले. त्यानंतर सुपणार हे दि. 24 डिसेंबर 2023 रोजी रजेवरून,  पुनः धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे रुजु झाले व 25 डिसेंबर 2023 रोजी पुनः सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय येथे बदलीने नियुक्त झाले. 

सुपणार यांना आम्ही रजा दिली नाही-
धनकवडी-आंबेगाव क्षेत्रिय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. विक्रम काथवटे यांनी नमूद केले की, श्री. सुपणार हे धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे रुजु झाले नाहीत, त्यामुळे दि. 9/10/2023 ते 1/12/2023 या दोन महिन्यांच्या कालावधीत त्यांना आम्ही रजा देण्याचा प्रश्नच नव्हता. तो आम्हाला अधिकारही नव्हता. परंतु श्री. सुपणार यांच्या बदलीनंतर, म्हणजे ऑक्टोंबर 2023 मध्ये त्यांचे सेवापुस्तक आमच्या धनकवडी क्षेत्रिय कार्यालयात, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाने पाठविले. परंतु श्री. सुपणार हे आमच्या कार्यालयात हजर झाले नव्हते, त्यामुळे त्यांचे सेवापुस्तक आम्ही पुन्हा सिंहगड कार्यालयाकडे पाठविल्याचे नमूद केले आहे.

मग सुपणार यांना रजा दिली कुणी –
धनकवडी आंबेगाव क्षेत्रिय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. विक्रम काथवटे यांनी सर्व अभिलेख्यांची पडताळणी करून तारीख निहाय सर्व माहिती आम्हाला दिली आहे. त्यामुळे धनकवडी आंबेगाव क्षेत्रिय कार्यालयाने सुपणार यांना वैदयकीय रजा दिली नाही हे स्पष्ट होत आहे.
सिंहगड क्षेत्रिय कार्यालयाकडेही सुपणार यांच्या रजेचे अभिलेखे उपलब्ध नाहीत. मग सुपणार यांना 2 महिन्यांची वैदयकीय रजा कुणी दिली हा प्रश्न अनुत्तरी राहत आहे.

सुपणारांनी अति. आयुक्तांचा आदेश धुडकाविला-
श्री. सुपणार यांची बदली सिंहगड वरून धनकवडी क्षेत्रिय कार्यालय येथे केलेली असतांना देखील, त्यांनी सुमारे दोन महिन्यानंतर धनकवडी येथे पदभार स्वीकारला. मात्र बदली आदेशातील अट क्र. 5 नुसार विहीत कालावधीत पदभार न स्वीकारल्याने, सुपणार यांच्या विरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करणे अपेक्षित होते. तथापी कोणत्याही कार्यालयाने सुपणार यांच्या विरूद्ध आयुक्तांच्या बदली आदेशातील तरतुदी नुसार शिस्तभंगाची कारवाई केली नाही. पुढे जावून श्री. सुपणार यांनी मोठी ताकद खर्ची करून बदली रद्द करून दाखविल्याची माहिती काही आरोग्य निरीक्षकांनी आम्हाला दिली आहे. दरम्यान काही दिवसांतच श्री. सुपणार हे पुनः सिंहगड क्षेत्रिय कार्यालय येथे रुजु झाले. मागील 15 वर्षांपासून ते एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. दरम्यान अति. आयुक्तांचा आदेश धुडकावुन लावयला श्री. सुपणार यांच्याकडे एवढा कॉन्फीडन्स आला तरी कुठून… थैलीशाहीपुढे झुकणारे राज्यकर्तें, थैलीशाहीपुढे माना तुकविणारे अधिकारी वर्ग यांच्यामुळेच पुणे महापालिकेतील प्रशासनाला किड लागली आहे. त्यात सुपणार यांच्या सारखे भ्रष्टाचारी त्यामुळेच ताठ मानेने फिरत आहे.

श्री. सुपणार यांच्या गैरकृत्यांबाबत मागील दोन वर्षांपासून सुमारे 23 पेक्षा अधिक तक्रार अर्ज पुणे महापालिकेकडे सादर केले आहेत. तथापी आयुक्त कार्यालय ते घनकचरा कार्यालय व पुढे उपआयुक्त परिमंडळ क्र. 03 यांच्याकडे सिंहगड रोड क्षैत्रिय कार्यालय येथे पाठविण्यात आले आहे. तक्रार अर्ज व स्मरणपत्रांचा खच सिंहगड कार्यालयात पडला आहे. तथापी सिंहगड क्षेत्रिय कार्यालयाचे आधीचे व आत्ताचेही वॉर्ड ऑफिसर सुपणरांच्या ओझ्याखाली इतके दबले आहेत की, आयुक्तांचा, अति. आयुक्तांचा आदेशही ते मानत नसल्याचे दिसून आले आहे. श्री. वाघमोडे हे तर सुपणार यांच्या बैठकीतील आहेत, दोघांचाही जिगरी याराना आहे. त्यामुळे उपआयुक्तांना देखील किंमत दिली जात नाही ही वस्तुःस्थिती आहे.