Saturday, May 4 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

भगवे झेंडे घेतलेल्या जमावाकडून दगडफेक-कोरेगाव भीमा हिंसाचार

मुंबई/दि/ कोरेगाव भीमा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा निष्कर्ष काढणार्या पुण्याच्या सत्यशोधन समितीचे सदस्य भीमराव बनसोड यांनी गुरुवारी चौकशी आयोगापुढे साक्ष नोंदविली. ‘१ जानेवारीला भगवे झेंडे घेऊन हजारोंचा जमाव कोरेगाव भीमा येथे दाखल झाला. हे लोक स्थानिक नव्हते. या जमावाने विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या जमावावर दगडफेक केली,’ असा निष्कर्ष त्यांनी या अहवालात काढला आहे.

                सत्यशोधन समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, वढूच्या रहिवाशांना १ जानेवारीला काहीतरी अघटित घडणार याची चाहूल लागली होती. कारण गोविंद गोपाळ समाधीच्या शेडची तोडफोड करण्यात आली. तेथील फलकही काढला होता. संभाजी महाराजांच्या समाधीजवळ काहीतरी अघटित घडणार, अशी अफवाही पसरली होती.

                त्यामुळे १ जानेवारीला कोरेगाव भीमा बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी घेतला आणि याची माहिती शिक्रापूर पोलिसांना दिली. कोरेगाव भीमा हिंसाचारामुळे बौद्ध, जैन, मुस्लीम धर्मियांचे जास्त नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.विद्यार्थीदशेपासून चळवळींत भाग घेणार्‍या बनसोड, त्यांचे सहकारी प्राध्यापक प्रतिमा परदेशी, किशोर ढमाले आणि डॉ. भारत पाटणकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर ५ जानेवारीला या घटनेमागील सत्य शोधण्यासाठी कोरेगाव, वढू येथील संभाजी महाराज, कवी कलश व गोविंद गोपाळ यांच्या समाधीला भेट देऊन येथील गावकर्‍यांशी चर्चा केली होती.

                ३१ डिसेंबरला पुण्याच्या शनिवारवाड्यात झालेल्या एल्गार परिषदेत मी उपस्थित होतो असेही बनसोड यांनी आयोगाला सांगितले. हिंसाचारावेळी रस्त्यांवर पोलीस अनुपस्थित होते, असा आरोप समितीने केला. राज्यमंत्री दिलीप कांबळे गाडीतून उतरले नाहीत. राज्य सरकारने यावेळी सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री स्तंभाला मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहतील, असे जाहीर केले होते. मात्र यावेळी ते उपस्थित नव्हते, असेही समितीने अहवालात नमूद केले आहे.

                यंदा विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्याने ठाण्यातील श्रीनगर परिसरातील बहुसंख्य बौद्धधर्मियांनी आपल्याशी संपर्क साधून कोरेगाव भीमाला जाण्यासाठी भेट घेतल्याचे दरवर्षी विजयस्तंभाला भेट देण्यासाठी कोरेगाव भीमाला जाणार्‍या निवृत्त पोलीस साक्षीदाराने चौकशी आयोगाला बुधवारी सांगितले. मात्र त्यासाठी आपण प्रचार केला नाही, असेही या साक्षीदाराने आयोगाला सांगितले.