Wednesday, May 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे शहरातील पोलीस शिपाई ते एएसआय केडरधारकांच्या मानगुटीवर मास्क दंडाच्या कोट्यवधी रुपये वसूलीचे ओझे

Helment pune

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरातील दुचाकी वाहन चालविणार्‍या नागरीकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्ती करून, हेल्मेट परिधान न करणार्‍या दुचाकी वाहन चालकांना ५०० रुपये दंडाची आकारणी केली जाते. आता पुणे शहरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झाला असल्याने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मास्क नसल्यास त्याला देखील ५०० रुपये दंडाची तरतूद केली आहे. दरम्यान ज्या विभागात कॅमेरे आहेत, तेथील वाहतुक विभागाला हेल्मेट कारवाईचे दिवसाचे टारगेट देण्यात आले आहे. तसेच मास्क च्या बाबतीत देखील जास्तीत जास्त कारवाई करण्याचे उद्दीष्ट पुणे शहरातील पोलीस शिपाई ते एएसआय केटरधारकांना देण्यात आले असल्यामुळे संपूर्ण शहरात पोलीस आणि नागरीकांत कमालीलीची भांडणे होत आहेत. एवढंच कशाला चार चाकी, वाहनाच्या काचा बंद असतांना देखील, वाहनात बसल्यानंतर देखील मास्क परिधान करणे आवश्यक केले आहे. मास्क नसल्यास वाहनचालकावर कारवाई केली जात आहे. दंडाचे उद्दीष्ट ठरवून दिल्यामुळे हवालदिल झालेले पोलीस रस्त्यावरून पायी जाणार्‍या, वाहनातुन जाणार्‍यांना पकडून पकडून दंड ठोठावत आहेत. या कारवाईत पोलीस बळी पडत आहेत.


एका चहा टपरीवर माल चहा घेत असतांना, चौकाच्या अलिकडेच मास्कची कारवाई काही पोलीस करीत होते. रस्त्यावर धरपकडीचा कार्यक्रम सुरू होता. नागरीक आणि पोलीसात हुज्जत सुरू होती. मी चहा घेतच एका पोलीसाला विचारले नागरीकांची एवढी काळजी पोलीस नेमके कधीपासून घ्यायला लागते. भांडणे होवू नयेत म्हणून अर्थात कायदा आणि सुव्यवस्था एवढच काम असतांना, ही पकडा-पकडी कशासाठी…. त्यानं माझ्याकडं पाहीलं आणि म्हणाले, अनिरूद्ध आपण यापूर्वी भेटलोय.. तुम्ही बातमीदार ना… हो.. मीच म्हणालो. ते पोलीस कर्मचारी म्हणाले, उगाच माझ्या नावानं चांगभलं होणार नाही अस्सं वचन दया, नाहीतर मी पुढे निघालोच. मी म्हणालो नाही नाही. चांगभलं करण्याचा प्रश्‍नच नाही.
ते पोलीस कर्मचारी म्हणाले, पूर्वी हेल्मेट हे कारण होतं. कारवाई करतांना काहीच वाटत नव्हतं. परंतु आता तर मास्कच्या कारवाईचे टारगेट देण्यात आले आहे. प्रत्येक पोलीस कर्मचार्‍याला मास्कचे टारगेट देण्यात आले आहे. दिवसात एवढी कारवाई करायचयी म्हणजे कारायचीच… आता सांगा, रस्त्याने जाणारे हमाल, टेम्पोवाले, बिगारी यांना पकडल्यानंतर, ते म्हणतात, आम्हाला दिवसाला शे दोनशे रूपये कस्सं तरी करून पैसे मिळतात. आता ५०० रुपयांचा दंड भरायचा तरी कुठून… अशी रडत विव्हळत असतात. त्याच्या कपड्यावरून त्याची गरीबी आमच्या लक्षात येते. आम्ही देखील माणसच आहोत. आज अंगावर खाकी आहे म्हणून आवाज वाढला असला तरी आम्हालाही पै-पाहूणे, नातेवाईक आहेतच की… आम्ही काय ढगातून आलो नाहीत. परंतु करणार काय… ड्युटी म्हणजे ड्युटी… त्यापुढे काहीच नाही.
तेंव्हा माझ्या लक्षात आलं की, कोरोना महामारीबाबात दक्षता घेण्याचे प्रबोधन करण्यापेक्षा आता दंड नेमका का वसुल केला जात आहे. पुण्यातून दर महिल्याला हेल्टेच्या नावाखाली सुमारे २ ते ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसुल गोळा केला जात आहे. तर मास्कचे उद्दीष्ट हे हेल्मेटपेक्षा अधिक वाढविण्यात आले आहे. थोडक्यात कोणता ना, कोणता बहाणा करून, सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा कसा टाकावा याचे शासनाने धोरण अवलंबविले आहे एवढे मात्र निश्‍चित.
सध्या ज्यांच्या नोकर्‍या होत्या, त्यांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. ज्यांना नोकर्‍या नव्हत्या ते मिळेल ते काम करीत आहेत. पडेल ते काम करीत आहेत आणि आपल्या कुटूंबाची गुजराण करीत आहेत. शासनाने रोजगार उपलब्ध करून देण्यापेक्षा, रोजगार बुडविण्याचेच अधिक काम केले आहे. असे असतांना देखील हेल्मेट आणि मास्कच्या नावाखाली नागरीकांच्या खिशावर जबरीने दरोडा घालण्याचे काम सुरू आहे एवढं मात्र नक्की.