पुणे/दि/ प्रतिनिधी/
राज्यासह पुण्यात मागील दोन वर्षांपासून कोविड १९ महामारीचा प्रादूर्भाव झालेला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत पुणे महापालिकेत तिजोरीत खडखडाट होता. यामुळे केवळ अत्यावश्यक कामांसाठी निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने अंदाजपत्रकातील स यादीतील कामांना अधिक प्राधान्य देण्यात आले. तथापी नगरसेवकांनी सुचविलेली बहुतांश कामे देखील तातडीची नसतांना देखील त्यावर निधी खर्च करण्यात आलेला आहे. बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाने करण्यात आलेली बहुतांश कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची असून, संबधित कामांची तसेच ज्या कामांची तपासणी थर्ड पार्टी एजन्सीने केली त्यांची देखील चौकधी करण्याची मागणी रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्रसह स्थानिक संघटनांनी केली आहे.
पुणे महापालिका परिमंडळ क्र. ५ चे उपआयुक्त श्री. अविनाश सकपाळ यांच्याकडे याबाबतचे निवेदन दिले असतांना देखील, क्षेत्रिय अधिकारी श्री. गणेश सोनुने यांनी चौकशी व तपासणी करण्यात कसुरी केली असल्याचे दिसून येत आहे. रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांनी बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाकडील निकृष्ट दर्जाच्या निविदा कामांची चौकशी करून, संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणेबाबत…तसेच माहे २०२०-२१ मधील निविदा कामे निकृष्ठ दर्जाची असतांना देखील कामे पूर्ण झाल्याची एम.बी बुकात नोंद करून, पुणे महापालिका निधीचा अपहार करणार्या कनिष्ठ अभियंता श्री. अंबे व उपअभियंता श्री.खलाटे यांची विभागीय चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र. ३६ अ,ब क व ड तसेच प्रभाग क्र. २८ अ, प्रभाग क्र. ३७ अ व क मधील पायाभूत नागरी सुविधा निर्माण करणे तसेच नागरीकांना पुरविण्यात येणार्या मुलभूत नागरी सुविधांचा दर्जा उंचाविण्याचे काम प्रशासनिक स्तरावरून केले जाते. दरम्यान माहे २०२०-२१ या वित्तीय वर्षात करण्यात आलेल्या निविदा कामांचा दर्जा निकृष्ठ स्वरूपाचा असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः प्रभाग क्र. ३६ अ मधील काही निविदा कामांची पाहणी केली असता, कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची झाली असल्याचे दिसून येत आहे. सबब उपरोक्त निविदा कामांचे कनिष्ठ अभियंता श्री. अंबे व उपअभियंता श्री. खलाटे यांची विभागीय चौकशी करून त्यांना पुणे महापालिका सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील प्रभाग क्र. ३६ अ तसेच ब, क व ड मधील काही निविदा कामांची पाहणी केली आहे. आमचे सोबत पुणे महापालिकेतील स्थापत्य विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी देखील होते. कामाचा गोषवारा, वापरण्यात येणारी खडी, वाळू, सिमेंट लोखंड तसेच वॉटरप्रूफींग कामे पाहिली असता, ती अतिशय निकृष्ठ दर्जाची झाली असल्याचे दिसून येत आहे. पुणे महापालिकेच्या निधीचा अपव्यय करण्यात आलेला असल्याचे दिसून आले आहे.
प्रभाग क्र. ३६ अ मधील खालील कामे आहेत ते येणेप्रमाणे –
प्रभाग क्र. ३६ अ १) टेंडर क्र. २२५ स्नेहल सोसायटी येथे ब्लॉक बसविणे
२) टेंडर क्र. २२६, पापळ वस्ती ६३४/७ गणेश मंदिरा शेजारी कॉंक्रीटीकरण करणे
३) टेंडर क्र. २२८, रायसोनी पार्क येथे पदथथ विकसित करणे,
४) टेंडर क्र. २२७, प्रसाद बिबवेनगर येथील विविध विकास कामे करणे
५) टेंडर क्र. २५५, प्रेमनगर येथे विविध ठिकाणी कॉंक्रीटीकरण करणे
६) टेंडर क्र. २५६, मनपा शाळा वॉटर प्रुफींग करणे
७) टेंडर क्र. २५७, हमाल नगर येथील कॉंक्रीटीकरण करणे
प्रभाग क्र. –
८) टेंडर क्र. २४४ विविध मनपा शाळेमध्ये दुरूस्ती विषयक कामे करणे
९) टेंडर क्र. १४६ मध्ये शौचालय दुरूस्ती करणे
एकुण ५५ कामांपैकी मोजक्या कामांची पाहणी केली आहे. त्यामध्ये उपरोक्त क्र. १ ते ९ निविदा कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची झाली असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान कामे अपूर्ण, निकृष्ठ आणि पुणे महापालिकेच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या संकल्पनेविरूद्ध झालेली आहेत, हे माहिती असतांना देखील, केवळ आर्थिक हव्यासापोटी कनिष्ठ अभियंता श्री. अंबे व उपअभियंता श्री. खलाटे यांनी कामाची एम.बी. भरून, कामांची बिले अदा करणेसाठी क्षेत्रिय कार्यालयाकडे ठेकेदारामार्फत फाईल सादर करण्यात आली व संबंधितांचे बीले मंजुर करण्यात आली असल्याचे समजते.
संबंधित कामांची तपासणी ज्या थर्ड पार्टी एजन्सीने केली आहे, त्यांची देखील कसुन चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ चे कलम ६३ व ६६ नुसार पुणे महापालिकेची आवश्यक व स्वेच्छाधीन कर्तव्ये विचारात घेता, तसेच पुणे शहराचे भौगोलिक क्षेत्र व वाढती लोकसंख्या यांचा साकल्याने विचार करता,
आवश्यक प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे उत्तरदायित्व पुणे महापालिकेचे आहे. यासाठी पुणे महापालिकेने उपरोक्त पायाभूत सुविधेसाठी आवश्यक ती आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. दरम्यान या निधीचा संगनमताने अपहार झाला असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान प्रभाग क्र. २८ व प्रभाग क्र. ३७ मधील कामांची पाहणी केली असून, त्यातील कामांतही त्रुटी तसेच जुन्याच कामांवर नवीन कामे करण्यात आली आहेत. खोदाईच्या कामात देखील, निविदा कामांत तरतुद केलेली असतांना देखील, प्रत्यक्षात कुठेही खोदकाम केले नाही. केवळ वर-वर कामे उरकण्यात आली आहेत.
बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाकडील उपरोक्त प्रमाणे निविदा कामे नमूद करण्यात आली आहेत. या निविदा कामांची तपासणी व चौकशी करून, दोषी उपअभियंता श्री. खलाटे व संबधित कनिष्ठ अभियंता श्री. अंबे व इतर अभियंता यांचेवर तातडीने कारवाई करून, पुणे महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यात यावे.
तसेच बिलांसाठी काही फाईल्स सादर झाल्या आहेत, उपरोक्त कामांची तपासणी झाल्याखेरीज बिले मंजुर करण्यात येवू नयेत. तसेच ज्या थर्ड पार्टी एजन्सीने कामांची तपासणी केली आहे, कामाचा व मालाचा दर्जाची तपासणी न करताच, एनओसी देणेत आली असल्याचे वा कसे याची तपासणी करण्याची मागणी रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र या संघटनेने करण्यात आली आहे.