मुंबई/दि/
छउइ चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी धर्म लपवून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे समीर वानखेडे संकटात सापडले असताना आता वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी मात्र समीर वानखेडे हे कायदेशीर दृष्ट्या अडचणीत येऊ शकत नाहीत, असे मत व्यक्त केले आहे.
बाळासाहेब आंबेडकर यांनी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला दिला आहे. समीर वानखेडे यांनी वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर वडिलांचा मुस्लीम धर्म न स्वीकारता वडिलोपार्जित हिंदू धर्म स्विकारल्याचं दिसते आहे, समीर वानखेडेंबाबत आपण माध्यमांमधून जे वाचतो आहे त्याचा विचार केला तर प्रमाणपत्र रद्द होईल असे वाटत नाही असे बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर यांनी म्हटले आहे.
मुलगा किंवा मुलगी सज्ञान होईपर्यंत म्हणजेच वयाच्या १८ वर्षांपर्यंत आई-वडील यांच्या ताब्यात असतात. त्यामुळे त्यांना आई-वडिलांना स्वीकारलेला धर्म स्वीकारावा लागतो. पण त्यानंतर ही मुलं आपला वडिलोपार्जित धर्म स्वीकारु शकतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्या निर्णयानुसार समीर वानखेडे यांचा मुस्लिम धर्म होता पण नंतर त्यांनी हिंदू धर्म केला असला तरी ते कायदेशीर आहे, असे मत बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी आपला धर्म लपवल्याचा आरोप केला होता, त्यानंतर हे प्रकरण जातपडताळणी समितीकडे गेले आहे.