Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

वंचित बहुजन आघाडीकडे… विधानसभेच्या २८८ जागांसाठी ११०० जणांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे/दि/ प्रतिनिधी/

       ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीकडे राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी ११०० जणांनी उमेदवारी  मागितली आहे. शिवाय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा सेना या पक्षातील आजी माजी आमदार, महापालिका-जिल्हा परिषद सदस्य तसेच काही नाराज नेत्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. दरम्यान  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समिर कुलकर्णी यांना वंचित कडून 

       उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज केल्याची माहिती वंचित आघाडीचे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य ऍड. अण्णाराव पाटील यांनी दिली आहे.

       वंचित बहुजन आघाडीकडून राज्यातील २८८ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील मुलाखती झाल्या आहेत. शनिवार व रविवार पुण्यासह सातार्‍यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य अशोक सोनोने, रेखाताई ठाकुर, प्रा. किसन चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आता पर्यंत राज्यात ११०० पेक्षा अधिक जणांनी विधानसभेसाठी मुलाखती दिल्या आहेत. मुलाखतींना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान अकोला मतदारसंघातून माजी आमदार दशरथ भांडे, परळीतून कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य राजेसाहेब देशमुख, केज मधुन माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनीही उमेदवारी मागितली असल्याचे सांगितले.

कॉंग्रेस राष्ट्रवादीकडे शुकशुकाट –

       कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने देखील इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. औरंगाबाद, मराठवाडा व विदर्भात तुरळक इच्छुकांनी उमेदवारी मागितली असल्याचे वृत्त आहे.