हैदराबाद/ मुंबई/दि/
मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच आरएसएसचा डाव असल्याचा आरोप ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे नेतृत्व करणार्या प्रतिनिधिंची पाठराखण केली आहे. देशातील सर्व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असणं बंधनकारक असायला हवे, असेही ते म्हणाले.
ओवेसी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी आरएसएसवर टीकेची झोड उठवली आहे. केवळ एका समाजाकडे राजकीय शक्ती एकवटली जावी आणि मुस्लिमांना राजकारणात सहभागी होण्याचा कोणताही अधिकार असू नये या खोट्या मुद्यावर आरएसएसचे हिंदुत्व आधारलेले आहे. खोट्या हिंदुत्ववादी आरएसएसच्या विरोधात आव्हान उभारण्याचे काम संसद आणि विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींच्या जास्तीत जास्त उपस्थितीतून होईल या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
ओवेसी यांच्या पक्षाने बिहार निवडणुकीत पाच जागांवर विजय प्राप्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केले आहे. संसदीय निवडणुकांमध्ये मुस्लिम प्रतिनिधींच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे ओवेसी यांच्या या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.
त्यात बिहार विधानसभा निवडणुकीत ओवेसी यांच्या पक्षाला मिळालेल्या पाच जागा अतिशय महत्वाचा टप्पा मानला जात आहेत. आता या पक्षाने महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही आपले खाते उघडले आहे.