पुणे/दि/प्रतिनिधी/
मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत, या सबबीखाली कोणालाही मतदानापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे स्पष्टीकरण विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
‘मतदार यादीत छायाचित्र नसल्यास मतदानाला मुकावे लागणार’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याबाबत स्पष्टीकरण देताना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले, वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्त योग्य नाही. मतदाराचे छायाचित्र असायला हवे, मात्र ते अनिवार्य नाही.
वास्तविक, विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक या नात्याने दिनांक १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाबाबत पत्रकारांना व राजकीय पक्षाच्या व्यक्तींना मार्गदर्शन करताना डॉ. म्हैसेकर यांनी मतदार यादीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती.
मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. मतदारांनी मतदान ओळखपत्र प्राप्त करवून घ्यावे. मतदार यादीत नाव आहे मात्र निवडणूक ओळखपत्र नाही, अशा स्थितीत भारत निवडणूक आयोगाने ग्राह्य धरण्यास विहित केलेल्या १७ पुराव्यांच्या आधारे मतदानास परवानगी दिली जाऊ शकते. तथापि, ओळखपत्र आहे मात्र मतदार यादीत नाव नसल्यास मतदान करता येणार नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली आहे.