Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

भाजप श्रीमंत पक्ष कसा बनला?

नवी दिल्ली/दि/ कुठल्याही उद्योजकांची कॉंग्रेसने ‘चोर-लुटेरे’ अशी हेटाळणी केलेली नाही. उलट भाजपनेच कुडमुडया भांडवलदारांना हाताशी धरलेले आहे. याच भांडवलदारांकडून उभारलेल्या ट्रस्टचा बहुतांश पैसा भाजपकडे गेला आहे. चार वर्षांत भाजप सर्वात श्रीमंत पक्ष कसा बनला, असा सवाल कॉंग्रेस नेता आनंद शर्मा यांनी सोमवारी पत्रकार परषिदेत केला.

                प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लखनौमधील सभेत कॉंग्रेसच्या दुटप्पीपणावर टीका केली होती. ‘उद्योजक म्हणजे कोणी चोर-लुटेरे नाहीत. त्यांच्याशेजारी उभे राहण्याची भीती कशाला बाळगायची?’ अशी टिप्पणी केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना आनंद शर्मा म्हणाले की, उद्योगांना प्रोत्साहन देण्याचीच कॉंग्रेसची भूमिका राहिलेली आहे.

                आता मात्र कुडमुडे भांडवलदार भाजप सरकारकडून निधीच्या बदल्यात व्यावसायिक लाभाची अपेक्षा करतात. कोणताही अनुभव आणि योग्यता नसताना काही उद्योग कंपन्यांना मोदी सरकारकडून कंत्राटे दिली जातात, असा आरोप शर्मा यांनी राफेलसंदर्भात अनिल अंबानी यांचे नाव न घेता केला. राफेल विमान बनवण्याच्या करारात देशी उद्योग कंपनी म्हणून अनिल अंबानी यांच्या कंपनीची मोदी सरकारने निवड केली आहे. या कंपनीला विमान बनवण्याचा कोणताही अनुभव नसताना कंत्राट कसे दिले जाते, असा सवाल विरोधकांनी केला आहे.

                सत्ताधारी भाजपकडून वा विरोधकांकडूनही कोणत्याही हालचाली होत नसल्याने आता राज्यसभेच्या उपसभापतिपदाची नियुक्ती हिवाळी अधिवेशनातच होण्याची शक्यता आहे. उपसभापतिपदाच्या नियुक्तीबाबत सत्ताधारी पक्षाकडून मौन बाळगले जात आहे.

                 यासंदर्भात नोटीसही जारी करण्यात आलेली नाही. कुरियन यांची मुदत संपल्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. मात्र भाजपकडे राज्यसभेत पुरसे संख्याबळ नाही. प्रादेशिक पक्षांकडून पाठिंब्याची खात्री होत नाही तोपर्यंत भाजपकडून या पदाच्या नियुक्तीसाठी घाई केली जात नसल्याने नवउपसभापतीसाठी हिवाळी अधिवेशनाची वाट पाहावी लागणार आहे.

                मोदी सातत्याने गरिबीतून आल्याची भाषा करतात आणि दिवसातून सारखे पोशाख बदलतात. आता तरी गरिबीचा वापर करण्याचे पंतप्रधानांनी थांबवले पाहिजे. गरिबीच्या नावाखाली स्वत:चा प्रचार थांबवून प्रायाश्चित घेण्याची वेळ आली आहे, असा टोला कॉंग्रेसने हाणला आहे.