Friday, December 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बाळासाहेब आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल- रास्वसंघाकडे एके ४७ आली कुठून, भागवतांना मोक्का लावणार का?

Prakash-Ambekar- in -public

मुंबई/दि/ प्रतिनिधी/

                राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे (आरएसएस) असलेली शस्त्रास्त्रे सरकारने जप्त करावी. या देशाचा कायदा कोणालाही शस्त्र बाळगण्याची परवानगी देत नाही, मग संघाकडे एके ४७ रायफल कशी आली, असा सवाल करत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी  देवेंद्र फडणवीस सरकारला सवाल केला आहे, की सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करणार की नाही. संघाकडे असलेली शस्त्रे जप्त केली नाही तर महाराष्ट्रात चक्का जाम करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

                रास्वसंघ दरवर्षी दसयाला नागपूरमध्ये शस्त्रपूजन करत आले आहे. त्यांच्या या शस्त्रपूजनाला शांतताप्रिय संघटनेने विरोध केला आहे. याविरोधात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबईत धरणे आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झालेल्या धरणे आंदोलनात बाळासाहेब आंबेडकरांनी ही शस्त्रास्त्रे जप्त करा आणि मोहन भागवत यांच्यावर मोक्का नुसार कारवाई करण्याची मागणी केली.

                ते म्हणाले, सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे एके ४७ रायफल कशी आली याचे उत्तर सरकारने द्यावे. त्यांच्याविरोधात नागपूरमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. यावर सरकार कारवाई करणार आहे की नाही. सरकार कारवाई करणार नसेल, तर यापूढे महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंबेडकर यांनी दिला.

                ते म्हणाले, राज्यात कोणत्याही सामान्य व्यक्तीला शस्त्र बाळगण्याची परवानगी भारतीय कायदा देत नाही. स्वसंरक्षणासाठी पिस्तूलही पोलिसांच्या परवानगीने बाळगता येते. कोणत्याही सामान्य व्यक्तीकडे शस्त्र सापडले तर त्याला दहशतवादी म्हणून अटक केली जाते.

                मात्र भागवतांकडे एके ४७ रायफल आणि इतर शस्त्र असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. पोलिसांचे हात कोणी बांधले आहेत, असा सवाल करत आंबेडकर म्हणाले, जर सरकार पोलिसांना कारवाईचे आदेश देणार नसेल तर, आम्ही कोर्टामध्ये दाद मागू.

संघ प्रतिसैन्य उभारत आहे का?

                देशाच्या संरक्षणासाठी भूदल, नौदल आणि वायूदल आहे. राज्यात संरक्षणासाठी पोलिस आहेत. मग संघ नकली सैन्य कशासाठी उभारत आहे? असा सवाल आंबेडकरांनी केला.

                ते म्हणाले, या नकली सैन्याकडे असलेली शस्त्रास्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली नाही तर महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन केले जाईल.