Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, संविधान वाचवणे हेच आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हान!

prakash ambedkar public speech

जयपुर/ राजस्थान/ दि/ आपल्याला केवळ अर्धे स्वातंत्र्य मिळाले असून संविधान वाचवणे, हेच आपल्यापुढील सध्या सगळ्यात मोठे आव्हान आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

                राजस्थानमधील फलोडी येथे संविधान बचाव, देश बचाव सभेत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सत्तेसोबत राजेशाहीत आपला कोणताही संबंध नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार देऊन प्रत्येकाचा संबंध हा सत्तेशी जोडला आहे. क्रांतीसोबतच प्रतिक्रांतीही होत असते, हे लक्षात घ्या. महात्मा फुलेंनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हीच बाब सांगितली आहे. आताही प्रतीक्रांतीचा प्रयत्न सुरु आहे. ही प्रतिक्रांती मिटविण्याचे आपल्यापुढे आव्हान आहे. शिक्षण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जो शिक्षण घेईल तो वाघासारखे गुरगुरेल असे बाबासाहेब म्हणाले होते. सरकारी शाळा नसत्या तर कदाचित तुम्ही आम्ही शिकलोच नव्हता.

                शिक्षण ही सरकारची जबाबदारी होती. पण आता सरकार त्यापासून पळ काढत आहे. ती जबाबदारी आता पुन्हा तुमच्यावर टाकली जात आहे. शिक्षणाचे खासगीकरण झाल्यामुळे आता शिक्षण घेणेही कठीण होत आहे. तुम्ही शिक्षण सोडल्यास तुम्हाला कोणच वाचवू शकत नाही. आंबेडकरी विचारधाराच तुम्हाला वाचवू शकेल.

                स्वत:चे अस्तित्व निर्माण करुन परिवर्तन घडवा. समरसतेचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? समरसतेचा अर्थ एखाद्यात समाविष्ट होणे. हा शब्द आरएसएस वापरत आहे. ते जातीव्यवस्था, भेदभाव मानतात. या व्यवस्थेत समाविष्ट व्हा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणत आहे. याचाच अर्थ तुम्ही जातीयवाद स्वीकारा, असाच आहे. बाबासाहेबांना समता अपेक्षित होती, समरसता नव्हे. आपल्याला आपला रस्ता निवडावा लागेल. संविधानाने बनवलेली व्यवस्था वाचविणे गरजेचे आहे. आरक्षणाच्या मुद्यावर आपल्याला नाचविण्यात येत आहे.

                आपण साधनसंपत्ती विरहित आहोत. ती आपल्याकडे आल्यास आपल्यावरील अत्याचार मिटतील. आपला लढा हा मुक्तीचा लढा आहे. आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी तुम्हाला आर्थिक आरक्षणाची ही लढाई लढावी लागेल. हे आरक्षण यापूर्वीच्या आणि आत्ताच्या कोणत्याच सत्ताधा-यांनी लागू केलेले नाही, याचा आपल्या सगळ्यांना विचार करुन आपली लढाई आपल्यालाच लढाई लढायची आहे हे लक्षात घ्यावे लागेल.