Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

फडणवीसांना हप्तेखोरीचा अनुभव, आरएसएसला किती वाटा दिला? नाना पटोले यांचा सवाल

मुंबई/दि/
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत कॉंग्रेस का बोलत नाही असा सवाल करणार्‍या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टोला लगावला आहे. फडणवीस यांना मोठा हप्तेखोरीचा अनुभव आहे. त्यांनी पाच वर्षात आरएसएसला किती वाटा दिला? असा सवाल करतानाच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.


पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्यावर पलटवार केला. वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव फडणवीस यांना असून ते त्यांचा अनुभव कथन करीत आहेत असा टोला पटोले यांनी हाणला. पाच वर्षे सत्तेत असताना मंत्रालयात आरएसएसचे कार्यकर्ते सर्व विभागात कसे घुसवले होते. ते किती वसुली करत होते, त्यातला किती वाटा आरएसएसला जात होता याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहोत असे पटोले यांनी सांगितले.
फडणवीस यांनी सत्तेत असताना रश्मी शुक्लांसारख्या अधिकार्‍यांना हाताशी धरून कोणाला किती वाटा द्यायचा याचा मोठा अनुभव मिळवलेला आहे. भाजपने आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांवर केंद्र सरकारचा दबाव आणून सत्तेचा गैरवापर केला.
फडणवीस स्वत:च जज असल्याच्या भूमिकेत वावरत आहेत. सरकारला बदनाम करण्यासाठी कधी अधिकारी व कधी राजभवनच्या माध्यमातून भाजपचे हे उद्योग सुरू आहेत. फडणवीस सर्वात मोठे खोटारडे असून ते विधीमंडळातसुध्दा खोटे बोलतात असा घणाघात पटोले यांनी केला.