Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

प्रसारमाध्यम स्वातंत्र्याची गळचेपी

नवी दिल्ली/दि/ एका हिंदी वृत्तवाहिनीतील दोन वरिष्ठ पत्रकारांना तडकाफडकी द्यावे लागलेले राजीनामे आणि सरकारवर टीका करणार्या कार्यक्रमाच्या प्रसारणात वारंवार आणले गेलेले अडथळे, या प्रकारांची एडिटर्स गील्ड ऑफ इंडियाने गंभीर दखल घेतली असून माध्यम स्वातंत्र्यातील सरकारच्या ढवळाढवळीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

                माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठी ज्या अपप्रवृत्ती काम करत आहेत त्यांच्यावर योग्यती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एडिटर्स गील्डने केली आहे. माध्यमांच्या मालकांनी सरकार किंवा कोणाच्याही दडपणापुढे नतमस्तक होऊ नये, असे आवाहनही एडिटर्स गील्डने केले आहे.

                जो प्रकार घडला आहे तो माध्यम स्वातंत्र्याच्या मुळावर आणि भारतीय लोकशाहीच्या एका स्तंभावर झालेला हल्ला आहे, अशा तीव्र भावनाही एडिटर्स गील्डने व्यक्त केल्या आहेत.

                सरकारने याबाबत स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे. या घटनांमागे सरकारचा हात नाही. कोणत्याही एजन्सीच्या माध्यमातूनही सरकारने ही कृती केलेली नाही, असे सरकारकडून आश्‍वस्त केले गेले पाहिजे.  जर सरकारची यात कुठलाही हात नसेल तर ज्याने कुणी हे कृत्य केले त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे. मुक्त असलेल्या सॅटलाइट सिग्नलमध्ये अशाप्रकारे कुणीही ढवळाढवळ करू शकत नाही, असेही एडिटर्स गील्डने बजावले.

                गेल्या काही दिवसांत वृत्तवाहिनीच्या दोन पत्रकारांवर कार्यक्रमाच्या बाबतीत दबाव आणला गेला. सरकारवरील टीकेचा भाग सौम्य करण्यास भाग पाडण्यात आले. याच दबावातून त्यांच्यावर राजीनामे देण्याची वेळ आली, असेही एडिटर्स गील्डच्या पत्रकात नमूद केले आहे. या पत्रकात संबंधित वृत्तवाहिनी आणि पत्रकारांच्या नावाचा उल्लेख मात्र करण्यात आलेला नाही.