Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पेठेपुणे शहरातील रास्ता-सोमवार त अनाधिकृत बांधकामांचा धडाका,बांधकाम नियमांची एैशी की तैशी – पैसे फेको तमाशा देखा…

पुणे महापालिकेचं बांधकाम विभाग पुणेकरांच्या जीवावर उठलय…
अबबऽऽ… दीड गुंठ्यावर ११ मजली इमारत
धन्य ते पुणे महापालिकेचे बांधकाम विभाग…


पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुणे शहरातील जुने वाडे आणि अंतर्गत रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लोकसंख्या वाढली परंतु अंतर्गत रस्त्यांची लांबी आणि रूंदी आहे तेवढीच आहे. त्यामुळे बांधकाम नियमानुसार रस्तारूंदी क्षेत्र सोडून बांधकामांना परवानगी देण्यात येत असली तरी, नियमानुसार कुणीही बांधकाम परवानगी घेत नाही. बांधकाम व्यावसायिक रस्तारूंदी क्षेत्र शून्य ठेवून अनाधिकृत बांधकामे करीत आहेत. मध्यवर्ती पुण्यातील रास्तापेठ व सोमवार पेठेत सध्या दर आठवड्याला एक स्लॅब पडत आहे, दिवस-रात्र बांधकामे केली जात आहेत. तरी देखील बांधकाम विभागातील अभियंते अनाधिकृत बांधकामांना अटकाव न करता बघ्याची भूमिका घेत आहेत. तक्रार अर्जांवर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. स्वतः काही करीत नाहीत व माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्त्यांवर बिल्डरांकडील गुन्हेगारी टोळ्या, तृतीयपंथी आणि आता तर स्वतःच्या घरातील पत्नीचा वापर करून, माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर जरब बसविली जात आहे. त्यामुळे बांधकाम विभागातील अभियंत्यांवर कठोर कारवाई करून अनाधिकृत बांधकामे तातडीने पाडून टाकण्याची मागणी होत आहे.

पुणे महापालिकेतील बांधकाम विभाग झोन क्र. ७ मध्ये सुमारे २०० कोटी रुपयांपेक्षा मोठा भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्या प्रकरणी, माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबतची माहिती मागितली होती. तथापी या विभागात कार्यरत असणारे कनिष्ठ अभियंता रामचंद्र शिंदे यांनी माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्त्यांविरूद्ध बिल्डर लॉबीला हाताशी धरून, त्यांच्याकडील गुन्हेगारांना माहिती अधिकार कार्यकर्त्यांना धमकाविणे, जिवे मारण्याची धमकी देणे तसेच प्रसंगी जीवे मारण्याचा प्रकार देखील घडलेला आहे.
रामचंद्र शिंदे इथपर्यंत न थांबता त्यांनी थेट तृतीयपंथी इसमांना अंगावर पाठविण्याची अक्कल हुशारी शोधून काढली, तृतीयपंथी कमी पडतात की काय म्हणून त्यांनी स्वतःच्या पत्नीचा व मुलीचाही वापर करून पुणे महापालिकेची बदनामी केल्याची धक्कादायक घटना मागील १५ दिवसात घडली आहे.
या धक्कादायक घटनेचे वृत्त सर्व खाजगी वृत्तवाहिन्या व पुण्यातील वृत्तपत्रांतून बातम्या आल्यानंतर, सुमारे साडेतीन चार वर्षांनंतर रामचंद्र शिंदे यांची बदली पुणे महापालिकेतील बीओटी सेल येथे अकार्यकारी पदावर करण्यात आली आहे. परंतु मागील साडेतीन चार वर्षात २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार व गैरव्यवहारांच्या तक्रारी व आंदोलने होत असतांना पुणे महापालिकेचे अधिकार्‍यांनी झोपेचे सोंग नेमकं का घेतलं होत हा प्रश्‍न देखील अनुत्तरीत आहे. सध्या रामचंद्र शिंदे यांच्या जागी भवन विभागातील कनिष्ठ अभियंता समीर गढई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कमालिचा भेदभाव –
पुण्यातील जुन्या वाड्यांचा प्रश्‍न गंभिर स्वरूपाचा बनत चालला आहे. जुने वाडे जे.व्ही. करून बिल्डलॉबी मोठा नफा कमावित आहे. त्यासाठी बांधकाम विभागातील अभियंत्यांना हातशी धरून, जुने वाडे धोकादायक असल्याचे पत्र घेवून, जुन्या भाडेकरूंना घाबरवुन, त्यांच्याकडून करार करून, जागा गिळंकृत करण्याचे प्रमाण वाढले आहे. जे भाडेकरू ऐकणार नाहीत त्यांच्यावर गुन्हेगारी टोळ्यांव्दारे त्यांचा बंदोबस्तकेला जात आहे. याची महापालिकेत वा पोलीसात दाद न फिर्याद अशी अवस्था आहे.
दरम्यान एखादया जुन्या सुस्थितीतील वाड्याची एखादी भिंत पुनः बांधावयाची असेल तर पुणे महापालिकेचे अभियंते मंजुरी देत नाहीत. डागडूगी करण्यासही मंजुरी देत नाहीत. पुणे महापालिकेत चकरा मारून मारून नागरीक हैराण झाले तरी त्यांना न्याय मिळत नाही. महापालिकेची मंजुरी न घेता डागडूजी करण्यास सुरूवात केली तर बांधकाम विभागातील अभियंते एका तासाच्या आत हजर राहून ती डागडूजी बंद पाडून बांधकाम साहित्य जप्त केले जाते. ह्यामध्ये बिल्डर लॉबीचा मोठा सहभाग असून, बिल्डरांच्या मदतीसाठी बांधकाम विभागातील अभियंते कार्यरत असल्याचेही दिसून येत आहे. हा कमालीचा भेदभाव सध्या पुणे महापालिकेतील बांधकाम विभाग झोन क्र. ७ मध्ये आढळुन येत आहे.

रास्तापेठेतील बांधकाम –
सध्या रास्तापेठेत अनाधिकृत बांधकामाचे पेव फुटले आहे. दिवस- रात्र बांधकामे सुरू आहेत. तरी देखील बांधकाम विभागातील अभियंते याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. हा दुर्लक्षितपणा कशामुळे होत आहे हे आता नव्याने सांगण्याची आवश्यकता नसली तरी नागरीकांच्या भविष्याच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे. सध्या रस्तापेठेतील पानसेवाड्या समोर १५०० स्व्के. फुटावर सुमारे १२ हजार स्व्के. फुटाचे बांधकाम वेगात सुरू आहे. पत्याच्या बंगल्या सारखा ११ मजली रेल्वेचा डब्बा बांधण्यात आलेला आहे. दर आठवड्याला एक स्लॅब या प्रमाणे बांधकाम सुरू आहे. बांधकाम दे दणादण सुरू आहे. तरी देखील त्याला कुठलीही आठकाठी पुणे महापालिकेच्या अभियंत्यांनी आणली नाही. पाणी कुठं मुरतय हे आता नव्याने सांगावे लागणार आहे काय…
सोमवार पेठेत- लोखंडी गल्डर- लोडचे बांधकाम –
सोमवार पेठेतील जुने जैन मंदिर व त्रिशुंड गणपती च्या मधोमध असलेल्या चौकात झुंबरबाई परदेशी पथ येथे लोखंडी गल्डर, लोडचे बांधकाम करण्यात आले आहे. सामाईक रस्तारूंदी क्षेत्र वगळुन २०० स्व्के. फुट देखील बांधकाम करण्यास मंजुरी मिळणार नाही हे माहिती असल्याने, संबंधित बांधकाम व्यावसायिक, जागा मालक, भाडेकरू विकसक यांनी लोंखडी गल्डरव्दारे चार मजली बांधकाम केलं आहे. सध्याही बांधकाम वेगात सुरू आहे. काही दिवसांत नागरीक राहायलाही येतील. त्यानंतर महापालिका ५३ ची नोटीस देवून हात वर करण्याची परंपरा कायम ठेवणार आहे.
बांधकाम विभाग क्र. ७ ला दिवसा ढवळ्या पोतभरून पैसे खाण्याचा रोग लागला आहे –
मध्यवर्ती पुणे शहराचे कामकाज बांधकाम विभागातील झोन क्र. ७ या कार्यालयातून केलं जाते. जुने वाडे आणि अंतर्गत रस्त्यांची समस्या कायम आहे. त्यातच अनाधिकृत बांधकामे करू दयायची आणि मागाहून नोटीस देण्याची परंपरा कायम आहे. बांधकाम विभाग झोन क्र. ७ मधील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दिवसा ढवळ्या पोतभरून पैसे खाण्याचा रोग लागला आहे. या रोगाचा प्रमुख कर्ता करविता रामचंद्र शिंदे याची हाकलपट्टी झाली असली तरी इतर अभियंत्यांचा उपक्रम दैंनदिन सुरू आहे.
सावरकर भवन मधील मुतारी, जोशी वडेवाडे जवळील हॉटेल, गंधर्व, बालगंधर्व आणि शेवटी डेक्कन परिसरात नोटा मोजण्याचे काम वेगात सुरू असते. बांधकाम विभागातील अभियंते हे पुणे महापालिकेचे कर्मचारी नावाला असून बिल्डरांचे दलाल व एजंट म्हणून जास्त काम करीत आहेत. या रोगावर इलाज शोधणे आवश्यक आहे.


नुकसान शेवटी पुणे महापालिकेचे आणि पुणेकरांचेच आहे –
अनाधिकृत बांधकामे केल्याने पुढील ५० वर्ष ही इमारत पडणार नाही किंवा पाडलीही जाणार नाही त्यामुळे …. १) अनाधिकृत बांधकामे केल्याने रस्तारूंदी पुढील ५० वर्षात होणार नाही. २) बांधकामांना परवानी घेतली नसल्याने, मिळकत कराची आकारणी जुन्या क्षेत्रफळानुसारच पुढील ५० वर्ष होत राहणार, नवीन मंजुरी खेरीज नव्याने मिळकतकर आकारणी केलीच जात नाही त्यामुळे पुढील ५० वर्ष पुणे महापालिकेला विकास कामांसाठी निधी मिळणारच नाही. ३) उलट शहरातील लोकसंख्या वाढणार ४) वाढलेल्या घरटी लोकसंख्येला – पाणी, रस्ते, ड्रेनेज व्यवस्था मोठ्या व्यासाची करावी लागणार ५) पार्कींगची समस्या वाढत राहणार- त्यातुन आज जशी भांडणे होतात, तशी पुढील ५० वर्षात भांडणांची संख्या वाढत राहणार. हमरी – तुमरी हे नित्याचेच झाले आहे. हातघाईची भांडणे आता लाठी काठी आणि पुढे बंदूकांवर येवून ठेपणार यात शंकाच नाही. ६) पुढील ५० वर्ष शहराचा विकास थांबणार.. विस्फोट होत राहणार… त्यामुळे आता तरी नियम बदला नाहीतर नियमानुसार कारवाई करा…..