Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुरेसे पाणी द्या, संतप्त महिलांचा पालकमंत्री बापटांच्या घरावर मोर्चा

girish bapat

पुणे/दि/ प्रतिनिधी/

                 शिवाजीनगर परिसरातील पोलीस वसाहतीत मागील काही दिवसांपासून एकच तास पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा पुरेसा नसल्याचे कारण देत पोलीस कुटुंबातील महिलांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा काढला.

                गिरिष बापट यांनी आंदोलक महिलांशी बोलताना सायंकाळी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले. परंतु बापट यांच्या आश्वासनाने समाधान न झाल्याने महिलांनी आपल्या लहान मुलांसह रहदारी असलेला फर्ग्युसन रस्ता रोखून धरला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलक महिलांना रस्त्याच्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलक महिला काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.

                बराच वेळ रस्ता रोखून धरल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून गुडलक चौकातून शिवाजीनगरच्या दिशेने जाणारी वाहतूक पोलिसांनी दुसर्‍या मार्गावर वळवली होती. अखेर दीड तासानंतर प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर या महिलांनी हे रास्तारोको आंदोलन मागे घेतले.

                आंदोलक महिलांनी यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाने संताप व्यक्त केला. जनतेच्या संरक्षणासाठी पोलिसांची २४ तास गरज लागते. मग त्यांच्या कुटुंबीयांना मूलभूत सुविधा का पुरवल्या जात नाहीत. पोलिसांची कुठलीही संघटना नाही, त्यामुळे त्यांनी न्याय तरी कसा मागायचा. पोलीस वसाहतीत आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्त्यावरील खांबावर लाईट नाहीत, रात्री अपरात्री अंधारात ये-जा करावी लागते. पाणी वेळेवर मिळत नाही. प्रशासनाने या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलक महिलांनी दिला आहे.