Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी विशेष मोहीम

pune-traffic

पुणे/दि/प्रतिनिधी/

                शहरातील वाहनचालकांकडून करण्यात येणा-या वाहतूक नियमभंगामुळे अनेक लहान मोठे अपघात होत असतात. या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागून अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी वाहतूक शाखेतर्फे वेळोवेळी विशेष मोहीम राबवून नियमभंग करणार्‍या चालकांवर कारवाई करण्यात येत असते.

                शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित चालण्यासाठी वाहतूक शाखा, पुणे महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन विभाग, पीएमपीएमएलयांनी एकत्र येत एक मोहीम आखली आहे. या मोहीमअंतर्गत शहरातील गर्दीचे १०० चौक निश्चित केले असून ते चौक, रस्ते नो व्हायोलेशन झोन म्हणून तयार केले आहेत. १९ ऑक्टोबरपासून या मोहिमेची अंमलबजावणी होणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस सहआयुक्त डॉ शिवाजी बोडखे, वाहतूक उपयुक्त तेजस्विनी सातपुते यांनी दिली.

                निश्चित केलेल्या चौकांमध्ये आणि रस्त्यावर पुणे महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी नियमभंग करणार्‍या वाहनचालकावर संयुक्तपणे कारवाई करणार आहेत. नो पार्कींगमध्ये उभी केलेली वाहने, फुटपाथवर उभी केलेली वाहने टेम्पो व क्रेनच्या साहाय्याने उचलली जाणार आहेत. सर्वाधिक गर्दी असलेल्या ठिकांणीवरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत त्यामुळे चौक अतिक्रमणमुक्त होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.

                तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्त्यावरील खड्डे बुजविणे, सिग्नलला अडथळा ठरणार्‍या झाडांच्या फांद्या छाटणे वगैरे बाबींची पूर्तता करण्यात येत आहे. वाहतूकीच्या नियमांचे पालन करून शहरातील वाहतुक सुरळीत करण्यात योगदान द्यावे असे आवाहनही वाहनचालकांना यावेळी करण्यात आले.