Tuesday, December 17 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि परिमंडळ एकच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे यांची कारवाई –
मोक्का ची मंडळी आज नाहीतर उद्या बाहेर येणार, परंतु गुन्हेगारांचे बोलाविते धनी कधी जेरबंद होणार…

  • अवैध धंदे करणार्‍यांविरूद्ध प्रथमच मोक्का अंतर्गत कारवाई,
  • कुटंणखान्यांवर वारंवार कारवाई करून पोलीस थकले, पण कुंटणखाने बंद होत नव्हते, आता थेटच कुंटणखाने सीलबंद केले,
  • मध्यवर्ती शहरातील छोट्या मोठ्या टोळ्यांविरूद्ध जबरी कारवाई
  • गुन्हेगारी टोळ्या सक्रिय होवून साम्राज्य वाढवित होत्या, एका टोळीतून दुसरी टोळी निर्माण होत होती, आता नव्या जुन्यांवर थेटच मोक्का – नवीन टोळी निर्माण होणार नाही अशा प्रकारची जबरी कारवाई

पुणे/दि/ प्रतिनिधी/
सन १९७४ साली प्रसिद्ध झालेला रोटी, कपडा और मकान या हिंदी चित्रपटात मनोज कुमार, अमिताभ बच्चन, शशि कपुर, मदन पुरी, प्रेमनाथ यांच्या अदाकारीने सर्वांच्या मनावर भुरळ पाडली. महँगाई मार गई हे गाणे याच चित्रपटातील…१९७२ सालचा भयाण दुष्काळ आणि १९७४ साली आलेला रोटी कपडा और मकान या चित्रपटातील कलाकारांच्या अदाकारीची नक्कल करीत अनेक छोटे मोठे गुन्हेगार आणि टोळ्या जन्माला आल्या. पुण्यात १९८० च्या दशकात प्रथमच गुन्हेगारी टोळ्यांमध्ये आपआपसात खटके आणि भडका उडत होता. पुण्यात आंदेकर आणि माळवदकर टोळीमध्ये भडका उडला होता. यानंतर पुणे शहर वाढत राहिलं. मुळशी पॅटर्नसारख्या अनेक टोळ्या निर्माण झाल्या. २००५ पर्यंत पुण्यात ३०/३५ गुन्हेगारी टोळ्या कार्यरत असल्याचा पोलीसांचा गोपनिय अहवाल होता. आता २०२१ पर्यंत ही संख्या दोनशेच्या आसपास पोहोचली असल्याचा अंदाज आहे. या विरूद्ध नुतन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त प्रिंयका नारनवरे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. १९७५ ते २०२१ या कालावधीतील सर्व गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचे अवैध धंद्याविरूद्ध रणशिंग फुंकले आहे. अवैध धंदे करणार्‍यांविरूद्ध प्रथमच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे हे विशेष आहे.

गुन्हेगारीचा उगम, उदय –
दुष्काळ- स्थलांतर- गुन्हेगारी- अवैध धंदे- राजकीय वर्चस्व =
१९६५ सालातील वरळीची दंगल (कॉंग्रेसमधील सत्तालोलूप पुढार्‍यांनी आणि सत्ताधार्‍यांनी नवीन जन्माला आलेल्या शिवसेना नावाच्या संघटनेला हाताशी धरून, मुंबईतील वरळी येथील राज्यातील, उत्तर व दक्षिण भारतातील दलित समुहांवर हल्ले करून अनेकांना जायबंदी केले होते.) आणि त्यानंतर १९७२ साली पडलेल्या दुष्काळामुळं, गावच्या गाव ओसाड पडू लागली.. गुरंढोर, पशुपक्षी मरण पावत होते. अशा परिस्थितीत मराठवाड्यातील सोलापुर, उस्मानाबाद, आत्ताचे लातूर, बीड जिल्ह्यातील हजोरोंनी गावं सोडून पुणे शहरात आले. काही पुण्यात आले तर काहींनी मुंबईकडे प्रयाण केले. काही औरंगाबादेत गेले.
पुण्यात आल्यानंतर कुडाच्या झोपड्या टाकुन रहिवास करू लागले. पुणे स्टेशनवर आणि जिथं मिळेल तिथं मोलमजुरी करू लागले. पुण्यातील नाना, भवानी, कसबा आणि त्यानंतर येरवड्यात भाईगिरी, झोपडीदादांचा ऊत आला. झोपडपट्टी दादा ते भाई इथपर्यंत काहींनी मजल मारली. पुण्यात एका फौजदाराला कसब्यात ठार केल्यापासून तर गुन्हेगारी वाढत चालली होती. त्यातच १९७४ साली रोटी कपडा और मकान हा चित्रपट रिलिज झाला. चित्रपटातील खलनायकांचे प्रताप पाहुन अनेक भाई उदयाला आले. गुन्हेगार टोळ्या – टोळ्या करून राहु लागले. या साठी अनेकही कारणे होती. परंतु तो आजचा विषय नाही.
सन १९८० साली पुण्यात दोन टोळ्यांमध्ये भडका उडाला. इथुनच खर्‍या अर्थाने गुन्हेगारी आणि गुन्हेगारांच्या टोळीला सुरूवात झाली. २००५ पर्यंत पुणे शहरात ३० ते ३५ टोळ्या पुणे शहर व उपनगरात कार्यरत असल्यांचा पोलीसांचा अंदाज होता. आज २०२१ पर्यंत त्या गुन्हेगारी टोळ्यांची संख्या दिडशे ते २०० पर्यंत गेली आहे. याला जागतिकीकरण जरी कारण असले तरी सत्ताधारी पक्षांच्या मदतीशिवाय ते वाढू शकले नसते एवढे मात्र नक्की.
सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील राजकीय मंडळींच्या आशिर्वादाने टोळ्या जन्माला आल्या आहेत. त्यामुळे यांच्याविरूद्ध तशी फार मोठी कारवाई कधी झाली नाही. एखादया मोठ्या गुन्हेगारावर कारवाई केली ही बस्स्… एवढंच काम आजपर्यंत झालं होतं. परंतु लँड आणि रिअल इस्टेट माफिया, बिल्डर लॉबी इतकी मोठी झाली की, कोट्यधीश, अब्जाधिश झाली आहे. अशा स्थितीत गुन्हेगारांवर कारवाई करणे अवघड झाले होते.
गुन्हेगारांचे आर्थिक साम्राज्य –
गुन्हेगारी मंडळी केवळ मटका, जुगार अड्डे, गुटखा तस्करी, अवैध विदेशी मद्याची तस्करी करतात हे खरे असले तरी त्यांचे अनेकही प्रताप आहेत. आजही राजकीय पक्षांच्या आशिर्वादाने पुण्या मुंबईतील कॉल सेंटर, मॉल, मोठ्या सोसायट्या, व्हीआयपी सोसायट्या, स्थानिक स्वराज्य संस्था, बँका, यामध्ये खाजगी सुरक्षा रक्षक, हाऊस किपिंग सारखी कामे तसेच मॉल व व्यावसायिक आस्थापनेतील स्क्रॅपचे टेंडरही याच गुन्हेगारी टोळ्यांना दिले आहे. आजकाल खाजगी फायनान्स करणार्‍या कंपन्या शेकडोंनी कार्यरत आहेत. पुण्यातही अनेक खाजगी फायनान्स कंपन्यांची कार्यालये आहेत. या खाजगी फायनान्स कंपन्या, दुचाकी वाहन खरेदी, तीन चाकी वाहन, टेम्पो, ट्रक खरेदी, घर जमिन खरेदीसाठी फायनान्स पुरविते. मात्र एखादा कर्जाचा हप्ता थकला तरी ह्याच कंपन्या दिवसात चार/पाच फोन करून कर्जदारांना धमकावित असतात. त्यांची वाहने ओढुन आणतात. टोळ्या घेवून कर्जदारांच्या घरी जावुन त्यांना धमकाविण्यात येते. यामध्ये याच गुन्हेगारी टोळ्यांना शेकडो खाजगी फायनान्स कंपन्यांनी कामे देण्यात आलेली आहेत. या मागे राजकीय शक्ती आहे हे निर्विवाद आहे. प्रत्येक निवडणूकीत ह्याच गुन्हेगारी टोळ्या राजकीय पक्षांसाठी कामे करीत असतात हे देखील सर्वांना विदीत आहेच. पोलीस गुप्तचर विभागाला ही माहिती असू शकते. परंतु जनतेला देखील हे समजणे आवश्यक आहे. खरं तर मी यापूर्वी देखील ह्या बाबी प्रसारित केल्या होत्या.
पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ एक –
पुणे शहराला प्रथमच पोलीस महासंचालनालय आणि गृहमंत्रालय यांच्यातील एक दुवा असलेले अमिताभ गुप्ता सारखे पोलीस आयुक्त मिळाले आहेत. तसेच ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या प्रियंका नारनवरे ह्या देखील पुण्यात नियुक्तीवर आलेल्या आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या नियोजनबद्ध पद्धतीमुळं शहरातील गुन्हेगारी मोडण्याचे काम सुरू झालं आहे. त्यातच प्रियंका नारनवरे यांच्या धाडसी निर्णयक्षमतेमुळे देखील गुुन्हेगारांवर आणि त्यांच्या अवैध धंदयावर कारवाई सुरू आहे. गुन्हेगार हे मुळातच अवैध धंदयावर उभे आहेत. यावरच त्यांचे साम्राज्य उभे असल्याचे दिसल्याने प्रिंयका नारनवरे यांनी गुन्हेगाराचे मुळ शोधून, त्यांच्या अवैध धंद्यावर कारवाई सुरू केली.
बंडु आंदेकर सहित नंदू नाईकवर मोक्का कायदयांतर्गत कारवाई –
पुण्यातील नाना, भवानी आणि गुरूवार पेठेत आंदेकर आणि कुडले यांचे वर्चस्व असल्याने दोन टोळ्यांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणाने टोळी युद्ध भडकत होते. १०/३/२०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने नमूद केले आहे की, गणेश पेठ बांबु आळी येथे आंदेकर टोळीचे वर्चस्व कमी होण्यास ओंकार कुडले व त्याचा मित्र सुरज ठोंबरे कारणीभुत होत असल्याचे कारणांवरून व पुर्ववैमनस्यावरून चिडून जावून आंदेकर टोळी म्होरक्या बंडू आंदेकर याचे सांगण्यावरून व चिथावणीवरून याच टोळीतील आरोपी ऋषभ आंदेकर, दानिश शेख, हितेंद्र यादव, योगेश डोंगरे शितोळे,. अकोलकर, वाडेकर, प्रतिक शिंदे, यश चव्हाण, देविदास गालफाडे, वैभव शहापुरकर व इतर यांनी आपसात कट करून ओंकार कुडले याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावरून खडक पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्याविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मटका किंग नंदू नाईक विरूद्ध कारवाई –
पोलीसांना मी टपाडभर पैसे देतो, पण माझ्या धंदयावर कारवाई करू नका, अशी आरोळी ठोकणार्‍या नंदू नाईक या मटका किंग विरूद्ध देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दोन कुंटणखाने सिलबंद करण्याची प्रक्रिया –
१९७२ सालातील दुष्काळ आणि स्थलांतरामुळं, पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक महिलांनी पुण्यातील बुधवार पेठेतील रेडलाईट एरियात देहविक्री सुरू केली. ७५ पैसे, १ रुपया हा त्या काळातील देहविक्रीचा दर होता. नंतर कालांतराने धंदयात कर्नाटक, नेपाळी व बंगाली स्त्रियांनी प्रवेश केला. हळु हळु कुंटणखान्यातही दलाल एवढे वाढले की, कुठल्याही महिलांना अमिष दाखवुन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करू आपली उपजिविका करु लागले. त्यातच कुंटणखान्यावर वर्षातून १५ वेळा कारवाई केली, तरी धंदा बंद होत नव्हता. त्यामुळेच, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांनी फरासखाना हद्दीतील कुंटणखाने पूर्णतः सील करण्याबाबतच प्रस्ताव पोलीस आयुक्तांना पाठविण्यात आला. कोरेगाव पार्क व फरासखाना हद्दीतील दोन कुंटणखाने पूर्णतः सीलबंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
घायवळ टोळीविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई –
पुणे शहरातील प्रमुख उपनगर असलेल्या कोथरूड येथील घायवळ टोळीविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाने नमूद केल्यानुसार, घायवळ टोळीने संघटीत गुन्हेगारी टोळी निर्माण करून एकटयाने व संयुक्तरित्या स्वतःचे व टोहीचे वर्चस्व निर्माण करण्याकरिता व त्यातुन गैरवाजवी आर्थिक फायदा मिळविण्याकरीता गुन्हे केलेले आहेत. संघटीत गुन्हेगारी टोळीने बेकायदेशिर मार्गाने स्वतःचे टोळीचे वर्चस्व निर्माण करून खुन, खुनाचा प्रयत्न, गंभिर दुखापत, जमी करून जबरी खोरी, घातक शस्त्र बाळगणे इत्यादी सारखे गुन्हे केले आहेत.
नाना पेठेतील गुंड सुरज ठोंबरे टोळीवर मोक्का कारवाई –
मध्यवर्ती पुणे शहरातील नाना पेठेतील कुख्यात गुंड सूरज ठोंबरे व त्याचा समर्थक सोमनाथ गायकवाड हे पूर्वी कुविख्यात आंदेकर टोळीचे सदस्य होते. ते दोघेही २०१८ पासून आंदेकर टोळीपासून विभक्त झाले. २०१८ पासून आंदेकर व ठोंबरे यांच्यात वाद होत होते. टोळीचे सदस्य एकमेकांना घातक शस्त्रांनी एकमेकांवर हल्ले करीत होते. यामुळेच सुरज ठोंबरे टोळीतील कानिफनाथ महापुरे, ओंकार कुडले, राजन काळभोर, शुभन पवळे, आकाश सासवडे, नरसिंग माने, सुरज ठोंबरे, सोमनाथ गायकवाड यांच्याविरूद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
आज पुण्यात दिडशे ते २०० च्या आसपास गुन्हेगारी टोळ्या कार्यरत असल्याचा अंदाज आहे. हे पूर्वी एकत्रच होते. आता विभक्त झाले आहेत. एकमेकांविरूद्ध शस्त्र काढले जात आहे. परंतु ह्यामागे सत्ताधारी पक्षातील नगरसेवक आमदार, खासदार, मंत्री आणि विरोधी पक्षातील बलाढ्य नेते, वेगवेगळे राजकीय पक्षाचे नेते, बांधकाम व्यावसायिक, ज्वेलर्स, सोने चांदी व्यापारी, रिअल इस्टेट, खाजगी फायनान्स कंपन्या, लँड माफिया, वाळू खडी गौणखनिजांचे व्यापारी व दलाल, काही सरकारी बाबु यांच्यामुळेच एवढी गुन्हेगारी फोफावली असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ह्या गुन्हेगारांवर कारवाई करीत असतांना, त्यांचा बोलविता धनी देखील जेरबंद करणं आवश्यक आहे. अवैध धंदेवाल्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई ही प्रचंड मोठी बाब आहे. पुणे शहर पोलीसांचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे. परंतु मोक्का खालील गुन्हेगार आज नाहीतर उदया बाहेर येणार.. मग पुन्हा – पुढचे पाठ मागचे सपाट असे व्हायला नको. त्यामुळे गुन्हेगारांचे बोलविता धनी देखील इथुन पुढच्या काळात जेरबंद होणे आवश्यक आहे.